कृषी महाराष्ट्र

खरीप पेरण्यांसाठी घाई करू नका ! कृषी विभागाचा सल्ला : वाचा सविस्तर

खरीप पेरण्यांसाठी घाई करू नका ! कृषी विभागाचा सल्ला : वाचा सविस्तर

कृषी विभागाचा सल्ला

सध्या राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. यामुळे पाऊस कधी पडणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे. राज्यात अनेक भागांत यंदा वळवाचे पाऊस झालेले नाहीत.

तसेच मृगापासून पेरण्या सुरू होतात. मात्र ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर एक आठवडा उलटला तरीही मॉन्सून फिरकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.राज्यात ९ जूनअखेर ३५५ तालुक्यांपैकी २९९ तालुक्यांमध्ये मृग कोरडा गेलेला आहे. त्यामुळे आता सर्व भीस्त आर्दा नक्षत्रावर आहे.

२२ जूनपासून आर्दा नक्षत्र सुरू होत आहे. मात्र आर्दात जूनअखेरदेखील हीच स्थिती राहिल्यास कडधान्याच्या पेऱ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. २५ ते ३० मिलिमीटर क्षमतेचे कमीत कमी ४-५ पाऊस झाल्यानंतर पेरण्यांसाठी योग्य स्थिती तयार होईल. साधारणतः एकूण १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर ओल पुरेशी खोलवर जाते.

त्यामुळे पेरा केल्यानंतर बियाणे उगवण्यास अडचण येत नाही. राज्यभर पुरेसे बियाणे उपलब्ध आहे. मात्र उगवण चाचणी केल्यानंतरच बियाण्यांचा उपयोग करणे गरजेचे आहे.’’गेल्या वर्षी वळीव व मृगाच्या पावसाच्या जोरावर जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या सुरू झाल्या होत्या. जवळपास साडेचार लाख हेक्टरचा पेरा गेल्या वर्षी ९ जूनपर्यंत झालेला होता.

पाऊस लांबलेला असला तरी मूग, उडीद वगळता बहुतेक भागात जुलैपर्यंत पेरण्या करण्यास संधी उपलब्ध असेल. कपाशीचा पेरादेखील यंदा उशिरा होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत केवळ साडेपाच मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यामुळे चिंता वाढली आहे. अर्थात, गेल्या वर्षीदेखील याच कालावधीत पाऊस १० मिलिमीटर झालेला होता.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top