कृषी महाराष्ट्र

Cotton Cultivation : शेतकऱ्यांचा उसाला पर्याय म्हणून कापसाकडे जास्त कल

Cotton Cultivation : शेतकऱ्यांचा उसाला पर्याय म्हणून कापसाकडे जास्त कल

 

Cotton Cultivation : शिरूर तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासून शेतीमध्ये ऊस व कांदा पिकानंतर कापूस हे पीक बळ धरीत आहे. वर्षानुवर्षे दुष्काळी असणारा तालुका आता ऊस पिकाबरोबर कापूस पिकासाठी प्रसिद्ध होऊ लागला आहे. या वर्षी तालुक्यामध्ये १ हजार २२२ एकरांमध्ये कापसाची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली.

उसाला पर्यायी पीक म्हणून शिरूर तालुक्यातील शेतकरी कापूस पिकाकडे वळू लागला आहे. भीमानदी पट्ट्यातील तांदळी, मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला व बाभुळसर बुद्रुक, वडगाव रासाई, इनामगाव, शिरसगाव काटा या भागांतील जमिनींमध्ये कापसाचे पीक वरदान ठरले आहे.

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील टाकळी हाजी परिसरातही कापसाचे पीक शेतकरी घेऊ लागले आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत तालुक्यात प्रथमच तब्बल दोन हजार दोनशे टक्के कापसाचे क्षेत्र वाढले आहे. Cotton Cultivation

शिरूर तालुक्यात २०२२-२३ या वर्षात सुमारे २३९ हेक्टर क्षेत्रांवर कापसाची लागवड झाली होती.२०२३-२४ या वर्षात कापसाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ होत तब्बल ४८९.१ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. खरिपामध्ये शिरूरला कापसाचे सरासरी २२ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, यंदा ४८९.१० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली आहे.

यंदा सर्वत्रच पर्जन्यमान कमी असल्याने खरिपाच्या पेरण्या अत्यल्प झाल्या आहेत. कापूस हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. जिरायती भागामध्ये कापसाची लागवड होत असली तरी यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने बागायती परिसरातील शेतकरी देखील पाण्याची उपलब्धता लक्षात घेत उसाचे पीक टाळून कापसाची लागवड करीत आहेत.

जमीन चोपण असल्यामुळे शिरूर भागात उसापेक्षा कापसाचे पीक चांगले येत आहे. एकरी कापसाचे उत्पादन सरासरी १५ क्विंटलपर्यंत जाते. पाच महिन्यांच्या पिकानंतर उरलेल्या अवशेषांचे चोपण जमिनीमध्ये हिरवळीचे खत म्हणून वापरता येते. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढत आहे.
– संजय पोपट गदादे, शेतकरी, तांदळी, ता. शिरूर

कापसाचे एकरी सरासरी १४ ते १७ क्विंटल उत्पादन निघते आहे. चोपण जमिनीसाठी हे पीक योग्य ठरत आहे. तसेच ऊस लागवडी टाळून कापसाची लागवड करणारे शेतकरी ही वाढू लागले आहेत.
– महादेव गदादे, कृषी सहायक, मांडवगण फराटा

Cotton Cultivation

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top