कृषी महाराष्ट्र

शेततळे, रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान : वाचा संपूर्ण माहिती

शेततळे, रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान : वाचा संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत भाजीपाला रोपवाटिका आणि शेततळे अस्तरीकरणासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (National Agriculture Development Scheme) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत (Nursery Scheme) भाजीपाला रोपवाटिका (Vegetable Nursery) आणि शेततळे अस्तरीकरणासाठी (Farm Pond Scheme) शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ५० टक्के अनुदानावर या दोन्ही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

रोपवाटिका योजनेचा जिल्ह्यातील ४६ शेतकऱ्यांना लाभ मिळेल. त्यासाठी १२७.८८ लाख रुपये मिळाले आहेत. रोपवाटिका प्रकल्प उभारणीसाठी मूल्य रक्कम ५.५५ लाख रुपये ग्राह्य धरुन २ लाख ७७ हजार ५०० (५० टक्के याप्रमाणे) अनुदान देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची ०.४० हेक्टर जमीन व रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.

महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट व महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य राहील. तसेच भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी करणे आवश्यक आहे.

शेततळे अस्तरीकरण

याच योजनेतंर्गत शेततळे अस्तरीकरणासाठीही जिल्ह्यातील ६५४ शेतकऱ्यांना शेततळे प्लास्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अथवा जास्तीत-जास्त ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असावा, शेतकरी समुहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. या दोन्ही योजनांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले.

श्रोत :- agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top