कृषी महाराष्ट्र

‘गवती चहा’ ची शेती ! २५० एकरवर यशस्वी प्रयोग – Lemongrass

‘गवती चहा’ ची शेती ! २५० एकरवर यशस्वी प्रयोग – Lemongrass

 

पारंपरिक शेतीला फाटा देत नंदूरबार जिल्ह्यातील 80 शेतकऱ्यांनी एकत्र येत गवती चहा (लेमन ग्रास) लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

नंदुरबार : पारंपरिक शेती करणारा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळं नेहमीच अडचणीत येतोय. मात्र, यावर उपाय शोधत पारंपरिक शेतीला फाटा देत नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील 80 शेतकऱ्यांनी एकत्र येत गवती चहा (लेमन ग्रास) लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शहादा (Shahada) तालुक्यातील 80 शेतकऱ्यांनी करार शेती करत अडीचशे एकर क्षेत्रावर लेमन ग्रास (Lemongrass) ची लागवड केली आहे. या माध्यमातून ते शाश्वत उत्पादन घेत आहेत.

मुंबईच्या कंपनीसोबत करार, लेमन ग्रासमधून शाश्वत उत्पन्न

नैसर्गिक आपत्तीमुळं पारंपारिक शेती परवडत नसल्यानं शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील किशोर देविदास पाटील यांनी पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना पर्याय म्हणून लेमन ग्रास समोर आला. या पिकाबद्दल योग्य ती माहिती घेतल्यानंतर त्यांनी डेहराडून येथून लेमन ग्रासची रोपे मागवून त्याची लागवड केली. त्यानंतर मुंबई येथील काँटो ऍग्रो वर्ल्ड प्रा. या कंपनीसोबत करार केला. त्यांच्या शेतातील लेमन ग्रास कंपनी खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करुन त्यापासून सुगंधी तेल तयार करते. त्यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकरी किशोर पाटील यांनी दिली.

कमी पाण्यात येणारं पीक असल्यानं ते शेतकऱ्यांसाठी वरदान

दोन फूट बाय एक फूट या अंतरावर लेमन ग्रास रोपांची लागवड केली आहे. एक एकर क्षेत्रासाठी 22 हजार रोपे लागतात. त्यासाठी त्यांना 60 हजार रुपयांचा खर्च आला आहे. लेमन ग्रास पिकाला कमी पाणी लागते. कमी पाण्यात येणारं पीक असल्यानं ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरु शकतं. पाटील यांच्याप्रमाणेच परिसरातील 80 शेतकऱ्यांनी लेमन ग्रासची 250 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले.

एक वेळेस लागवड केल्यानंतर सलग सहा वर्षे उत्पन्न…

लेमन ग्रास पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एक वेळेस लागवड केल्यानंतर सलग सहा वर्षे उत्पन्न मिळते. त्यामुळं यापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. लेमन ग्रासपासून तयार करण्यात आलेल्या सुगंधी तेलाला देशात आणि विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळं या शेतीला खूप वाव आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या मागे लागण्यापेक्षा नवनवीन प्रयोग करुन शाश्वत उत्पादनाची साधने निर्माण करण्याची गरज असल्याचे शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शहादा तालुक्यात लेमन ग्रासची शेती समोर येत आहे. शेतकऱ्यांनी शाश्वत दराची हमी असेल अशा पिकांची लागवड करणं आता काळाची गरज ठरली आहे..

संदर्भ :- marathi.abplive.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top