Pulses Rate : तूर १०० रुपयांवरुन थेट १७५ वर ! डाळींचे भाव एवढे का वाढले ? वाचा सविस्तर
Pulses Rate : पावसाचा परिणाम आता कडधान्याच्या शेतमालावर देखील होऊ लागला आहे. आता बाजारात सर्वच खाद्य वस्तूंचे भाव वाढताना दिसत आहेत. डाळींचा देखील आता दराचा वर जाताना पाहायला मिळत आहे. लातूर बाजार समितीत तुरीची आवक कमी असल्याने दरात वाढ दिसून येत आहे.
लातूर बाजारात बारा हजार रुपये क्विंटलने आज तुरीची खरेदी झाली आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत. आज किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा १७५ रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ (Toor Dal) महाग झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी हीच डाळ १०० रुपये किलोवर होती. आता या डाळीची किमत १६० ते १७५ रुपये किलो झाली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. तसंच हे नवे दर पुढील वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.
तूरडाळ दोन महिन्यांत १०० ते ११० रुपयांवरुन १६० ते १७५ रुपयांवर गेली आहे. हरभरा, उडीद आणि मूग डाळीच्या दरात देखील वाढ झाली आहे.
दरम्यान, देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेरपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे.
source : krishijagran