कृषी महाराष्ट्र

शेळीपालन व्यवसाय व त्या बद्दल सर्व माहिती !

शेळीपालन व्यवसाय व त्या बद्दल सर्व माहिती !

 

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे. शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप साऱ्या शेळ्या पाळत असतात. परंतु सद्यस्थितीत शेळ्या चरायला घेऊन जाणे अशक्य होऊन बसले आहे. शेळीपालन करताना शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध प्रश्न भेडसावत असतात, ज्यांची ना मिळाल्या मुळे शेळीपालन पासून ते दूर चालले आहेत. असे कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया.

  • शेळीपालन करताना पडलेले प्रश्न
    १-जास्त संख्येने शेळीपालन कसे करायचे ?
    २-बंदिस्त शेळीपालन कसे करायचे ?
    ३-व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेळीपालन मधून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल ?
    ४=सुरुवातीला कोणती जात निवडायची ?

असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. या सर्व गोष्टींचा आपण या लेखात व या पुढील लेखांमध्ये सविस्तर अभ्यास करूया.

शेळी पालनाचे उद्दिष्ट

-शेळीपालन करताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्चित करणे. बरेचशे शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदासीसाठीच विक्री करायची असा उद्दिष्ट ठेवतात. बऱ्याचदा योग्य दर न मिळाल्यास नाराजी वाढते. असा उद्दिष्ट ठेवायला काही हरकत नाही मग त्यासाठी खूप जास्त मागणी असणाऱ्या शेळ्यांच्या जातीची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरु करावा लागतो. सुरुवातीला स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालन पेक्षा अश्या प्रकारात जास्त गुंतवणूक असते.
-आपल्या गोठ्यातील शेळी हि स्थानिक जातीची असली तरी तिला चांगला जातिवंत जास्त वाढ असलेल्या जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांची पैदास होऊ शकते व अश्या प्रकारचे बोकड हे कमीत कमी वयात जास्त वजन देणारे असतात. म्हणून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारे बोकड तयार करणे हे देखील चांगले उद्दिष्ट असू शकते व त्यातुन नफा मिळवता येईल.

उस्मानाबादी बोकड

-आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या स्थानिक शेळ्यांपासून सुरुवात करणे फायद्याचे व कमी खर्चातील सहज सोपे असते. सुरुवातीला आपल्याकडील शेळीला उस्मानाबादी बोकड वापरला जावा, त्यांच्या संकरातून तयार होणाऱ्या शेळीला सिरोही किंवा जमुनापरी सारखे बोकड वापरले जावेत. जेणेकरून जन्माला करडे हि जन्मतः जास्त वजनाची वेगाने वजन वाढनारी असतिल.

-थोडक्यात काय तर उस्मानाबादी शेळ्यांमधील 3 करडे होण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती व सिरोही शेळ्यांमधील वजनवाढीची ताकद, दूध देण्याची क्षमता ग गोष्टी त्यांच्या संकरातून होणाऱ्या करडांमध्ये दिसून येतात. अशा प्रकारे पुढील पिढ्यांमध्ये पुन्हा आपण जमुनापरी, बीटल , बोअर अशा जातीच्या बोकडांचा वापर करून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारी शेळ्यांची करडे तयार करू शकतो. आपल्याकडे असणारया स्थानिक शेळीला उस्मानाबादी, जमुनापरी, सिरोही, बीटल, बोअर, किंवा एखादी उपलब्ध असलेली जातिवंत शेळीची जात वापरून सुधारित बोकडांची निमिर्ती करता येऊ शकते, अश्या प्रकारे या बोकडांमधून स्थानिक मार्केटमध्ये पण चांगला नफा मिळतो.

शेळीपालनासाठी करावयाचे नियोजन

-शेळीपालन करताना बंदिस्त गोठ्याचे नियोजन, चाऱ्याचे नियोजन, किंवा व्यवस्थापन या सर्व गोष्टीना फक्त उपयुक्त आणि सुधारित शेळीच्या असण्यामुळेच महत्व प्राप्त होते. अश्या प्रकारे संकरन करून तयार केलेल्या शेळ्यांना त्यानंतर तितक्याच चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक ठरतात.
-बंदिस्त पद्धतीचा गोठा यामध्ये प्रत्येक शेळीस कमीत कमी 15 ते 20 sq ft जागा दिली जाते. व गोठ्यामध्ये वयोगटानुसार कप्पे केले जातात . त्यामुळे सर्व व्यवस्थापन करणे सोपे जाते व शेळीला आपण कळपात असल्यासारखे वाटते.

-शेळ्या खरेदी करण्यापूर्वी त्यांना महत्वची लागणारी ओली वैरण, सुका चारा, व खुराक यांचे नियोजन असणे महत्वाचे आहे. ओल्या वैरणीत शेळ्यांना सुबाभूळ, शेवरी, दशरथ अशा प्रकारचा झाडपाला पण देणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर चीकातील मका, निसवलेले ज्वारीचे कडवाळाचा मुरघास बनवनेही फार फायद्याचे ठरते.
-दर 3 महिन्याला जंताचे औषध व त्याचबरोबर पी पी आर , आंत्रविषार सारख्या रोगांचे लसीकरण तयार केलेल्या सुधारित शेळ्यांना किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्यांना करणे फार गरजेचे असते. गाभण शेळ्यांनाही जंताचे औषध दिले जावे

-बोकडांचे वजन दररोज वाढत असते अशा वेळेस कोणत्याही गोष्टीमुळे तणाव आल्यास वजनवाढ होणार नाही, यामुळे गोठ्यातील वातावरण , पाणी , चारा नियोजन, बसण्याची जागा या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे तरच तणावमुक्त वातावरणात शेळ्यांची चांगली वाढ होईल.
-संकरिकरन करून किंवा विशिष्ठ जातीच्या शेळ्या पाळून आपल्याला कमीतकमी दिवसात जास्त वजन हे उद्दिष्ट गाठायचे आहे व त्यासाठीच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तरच आपल्या शेळीपालन व्यवसायाची सुरुवात चांगली होईल.

शेळीच्या आहारातील जीवनसत्वे

शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वय, वजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर आवलंबून असते. वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्त्वाची गरज पूर्णपणे वेगळी असते. जीवनसत्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पाणी,हे घटक येतात.

शेळीच्या आहारातील विविधता

फार पूर्वीपासून शेळीपालन करणारा शेतकरी शेळ्यांना रानात चरायला घेऊन जात आहे. अशा प्रकारच्या फिरून खाण्याच्या पद्धतीमुळे एकाच प्रकारचा चारा शेळ्यांना मिळत नाही त्या विविध प्रकारचा चारा खातात. आपणही जेव्हा बंदिस्त शेळीपालन करतो त्या वेळेस शेळीच्या आहारात विविधता ठेवणे फार महत्वाचे आहे. शेळीचे सुरुवातीचे दूध (चीक) पहिल्या एका तासात पिलांना पाजावे. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. लहान पिल्लाना प्रथिनांची व ऊर्जेची आवश्यकता जास्त असते. कोणत्याही वयोगटातल्या शेळीला चारा किव्हा खुराक देताना तिची उत्पादनातील अवस्था लक्षात घेणे गरजेचे असते. जसे लहान वयातील पिल्लाना वजनवाढीच्या खुरकाचे नियोजन करावे लागते.दूध देणाऱ्या गटातील शेळ्या व लहान पिल्ले यांची जीवनसत्त्वाची गरज खूप जास्त असते, या सर्व गोष्टींमुळे शेळीपालन करताना आहाराचे व्यवस्थापन फार महत्वाचे आहे.

चारा बदल करताना लक्षात ठेवा-

चाऱ्यातील बदल हा अचानकपणे करू नये. चारा सावकाश बदलावा.
नवीन चारा चालू करताना 20 ते 25 टक्के नवीन चारा व 75 टक्के जुना चारा याप्रमाणे चाऱ्याचे प्रमाण हळू हळू वाढवत जावे. पोटातील उपयुक्त जिवाणूंना हा बदल स्वीकारण्यास वेळ लागतो.
चाऱ्याची रोजची वेळ कधीच बदलू नये. व चाऱ्यामध्ये विविधता असावी.

शेळ्यांचा आहाराची उद्दिष्ट
उत्पादन – वजनवाढ, दूध, गाभनावस्था, पैदास

शेळ्यांची ऊर्जेची गरज हि कर्बोदके व फॅट यातून भागवली जाते. मिनरल्स हि शारीरिक प्रक्रियांसाठी फार महत्वाची असतात. वजनवाढी साठी व दुधउत्पादनासाठी लागणारी कॅलशिअम सारख्या मिनरल्स ची मात्रा पण वेगळी असू शकते.
शेळ्यांना द्यावयाच्या आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा, व खुराक असे चाऱ्याचे वर्गीकरण होते. व यातूनच सर्व महत्वाची जीवनसत्वे दिली जातात. एकूण आहारामधील कोरडा भाग (ड्राय मॅटर) हा खूप महत्वाचा असतो.

चाऱ्यामधील सर्व पाणी काढून घेतल्यानंतर राहिलेल्या भागाला कोरडा भाग असे म्हंटले जाते. जीवनसत्व हि कोरड्या भागात साठवलेली असतात. या कोरड्या भागाचे प्रमाण हे प्रत्येक प्रकारच्या चाऱ्या मध्ये वेगळे असते, जसा कि लुसलुशीत हिरव्या चाऱ्यामध्ये 80 ते 90 टक्के पाणी असते त्यात कोरडा भाग 10 ते 20 टक्के असतो. तर सुक्या चाऱ्यामध्ये फक्त 10 टक्के पाणी असते व कोरडा भाग जवळपास 90 टक्के असतो, शरीराच्या सर्व गरजा या चाऱ्यातील कोरड्या भागावर अवलंबून असतात. त्यानुसारच आहाराचे व्यवस्थापन करावे लागते.

शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थानुसार कोरड्या भागाचे प्रमाण बदलत असते. वजनाच्या 5 ते 7 टक्के कोरडा भाग आहारात दिला जावा. परंतु काही वेळेस 3 ते 4 टक्के एवढे प्रमाणही द्यावे लागते. म्हणून आपल्या गोठ्यातील सर्व शेळ्यांचे वजन माहित असणे फार महत्वाचे आहे. गोठ्याचा आहार ठरवताना सरासरी चाऱ्याच्या गरजेचा अंदाज बांधण्यासाठी शेळ्यांचे वजन व सरासरी कोरड्या भागाचे प्रमाण माहित असणे गरजेचे आहे.

शेळ्यांना सर्वात जास्त झाडपाला या प्रकारचा चारा आवडतो. मग कोणत्या प्रकारचा झाडपाला आपण लागवड करून शेळ्यांना पुरवू शकतो हे देखील शिकणे महत्वाचे आहे. शेवरी, सुबाभूळ, दशरथ यांची लागवड बाग पद्धतीने केल्यास कायमस्वरूपी किमान एका वेळेस शेळ्यांना त्यांच्या जास्त आवडीच्या चाऱ्याचा पुरवठा करता येईल. यापैकी सुबाभूळ या चाऱ्याचे नवीन वाण देखील बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात बीया नसतात. व झाडपाल्याची गुणवत्ता कोणत्याही मोसमात बदलत नाही.

पारंपरिक पद्धतीच्या चाऱ्यामध्ये मका, ज्वारी त्याचबरोबर लसूण घास ( लुसर्न) हा देखील खूप पौष्टिक आहे. हायब्रीड नेपियर, गिनी गवत , पॅरा गवत हे देखील हिरव्या चाऱ्याचे चांगले स्रोत आहेत.
सुका चारा म्हणून मका व ज्वारीचा कडबा , सोयाबीनचे भुसकाट, किंवा प्रक्रिया केलेला इतर सुका चारा वापरता येतो.
मुरघास- चांगल्या प्रतीचा हिरवा चारा हवाबंद करून कमीत कमी 45 दिवस साठवून ठेवल्यास त्याचा पौष्टीक मुरघास तयार होतो व तो आपल्याला शेळ्यांसाठी वर्षभर वापरता येतो. दुष्काळी परिस्थितीत मुरघासाचा खूप चांगला उपयोग होतो. यासाठी मका या पिकाचा जास्त वापर केला जातो.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी. शेळ्यांना पिण्यासाठी मुबलक व स्वच्छ पाणी असले पाहिजे. बंदिस्त पद्धतीच्या गोठ्यामध्ये तहान लागल्यावर शेळ्यांना मुबलक पाणी पिता येते.

हायड्रोपॉनिक्स

या पद्धतीने मकेच्या दाण्यापासून 7 ते 9 दिवसात तयार झालेला हिरवा चारा फार लुसलुशीत असतो व शेळ्या अशा प्रकारचा चारा आवडीने खातात. दुष्काळी परिस्थितीत शेळ्यांना हिरवा चारा पुरविण्यासाठी हि पद्धत फार उपयोगी ठरते.
दिवसभराच्या वैरणीच्या नियोजनामध्ये झाडपाला,हिरवा चारा व सुका चारा यांचे व्यवस्थित नियोजन केल्यास शेळ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाणे शक्य होईल.

शेळ्यांना खुराक देताना शक्यतो दिवसभरातून 2 वेळेस द्यावा. खुराकामध्ये शेळ्यांसाठी मिळणारे खाद्य हि उपलब्ध आहे. विशेष करून खाद्य वापरात नसलेल्या गोठ्यावर मका, सरकी , खपरी पेंड याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. शेळ्यांची पेंड असो किंवा तयार केलेला खुराक यामध्ये खनिजतत्वाचे मिश्रण टाकणे फार गरजेचे असते, शरीराच्या सर्व महत्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी (खनिजतत्वे)मिनरल्स लागतात. दररोज मिनरल्स वापरल्याने शेळी वेळेवर माजावर येणे, गाभण राहण्याचे प्रमाण वाढणे, वजन वाढीस मदद होणे, त्वचा चमकदार राहणे, असे वेगवेगळे फायदे होतात.

आपण देत असलेला आहार हा सर्व जीवनसत्त्वांचा मिळून तयार झालेला असला पाहिजे. त्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबरच दररोज खनिजतत्वाचे मिश्रण देऊन आपला आहार परिपूर्ण बनवूया. कोणत्याही प्रकारच्या चाऱ्यातील कोरडा भाग जाणून घेऊन त्यानुसार आहाराचे नियोजन करणे हि शेळीपालन व्यवसायातील महत्वाची गरज बनली आहे .

-डॉ. शैलेश मदने

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top