कृषी महाराष्ट्र

लाळ्या खुरकूत रोगाचे भीषण वास्तव : वाचा संपूर्ण माहिती

लाळ्या खुरकूत रोगाचे भीषण वास्तव : वाचा संपूर्ण माहिती 

 

राज्यात आता बऱ्यापैकी थंडी पडत आहे. त्यातच साखर कारखान्यांचा गळीत हंगामदेखील सुरू झाला आहे. त्यातच या वर्षी लाळ्या खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही फेऱ्याही झाल्या नाहीत. अशावेळी हा घातक रोग डोके वर काढू शकतो.

लाळ्या खुरकूत (Foot And Mouth Disease) अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या-मेंढ्या यासह डुकरांमध्ये (Animal Disease) हा रोग प्रामुख्याने आढळतो. जंगलातील हरिण, काळवीट अशा दुभंगलेल्या खूर असणाऱ्या प्राण्यांना देखील हा रोग होतो. या रोगामुळे दूध उत्पादनामध्ये (Milk Production) घट येते. जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. यासह बैलांची कार्य करण्याची शक्ती कमी होते. सोबत लहान वासरे, रेडके यांच्यात मोठ्या प्रमाणात मरतुक होत असल्यामुळे दोन-चार जनावरे असणाऱ्या पशुपालकांचे या रोगामुळे प्रचंड नुकसान होते.

‘पिकोर्ना हिरिडी’ या कुळातील ‘अप्थो व्हायरस’ या विषाणूमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यांचे बरेच उपप्रकार आहेत. हा विषाणू सामान्य निर्जंतुकीकरण द्रावणास दाद देत नाही. कमी तापमानात अनेक दिवस जिवंत राहतो. त्याचा प्रसार प्रामुख्याने हवेमधून, दूध, शेण, लघवी, वीर्य, पाणी पिण्याच्या जागा, गोठ्यात वापरत असलेली भांडी त्याचबरोबर बाधित जनावरांचा संपर्क येऊ शकणाऱ्या जागा म्हणजे जनावरांचे बाजार, यात्रा, पशू प्रदर्शने, साखर कारखान्याचे हंगाम त्याचबरोबर स्थलांतरित पक्षीदेखील या रोगाचा प्रसार करू शकतात.

बाधित जनावरातील लाळ इतर सर्व स्रावातून या विषाणूचा प्रसार होतो. रोगाचा संक्रमण कालावधी दोन ते सहा दिवस काही वेळेला पंधरा दिवसापर्यंत असतो. मरतुकीचे प्रमाणसुद्धा विषाणूच्या तीव्रतेवर अवलंबून असते. २० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत मरतूक होऊ शकते. रोगाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे काही ठिकाणी शंभर टक्के जनावरे बाधित होताना दिसतात.

ज्या प्रकाराने किंवा उपप्रकाराने रोग झाला आहे त्या प्रकाराविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती बाधित जनावरांमध्ये निर्माण होते. त्यामुळे जोपर्यंत रोगप्रतिकारशक्ती अबाधित असते तोपर्यंत त्या प्रकाराने रोगाचा प्रादुर्भाव त्या जनावरात होत नाही. पण इतर प्रकारामुळे हा रोग होऊ शकतो, याचाच अर्थ इतर उपप्रकारासाठी ही रोगप्रतिकारशक्ती उपयुक्त ठरत नाही. विशेष म्हणजे नैसर्गिक प्रादुर्भावानंतर सुमारे एक वर्ष जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाची बाधा होत नाही. त्याचबरोबर या रोगात आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही.

एखाद्या गावातील या रोगासाठी ची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झाल्यास त्या गावात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जर वारंवार एकाच गावात रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर एकापेक्षा अधिक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारांनी पशुधन बाधित होते असे गृहीत आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याच्या क्षमतेमुळे (उतपरिवर्तन) नवीन उपप्रकार तयार होतात, त्यांची रोगकारक क्षमता व तीव्रता वेगवेगळी असते तथापि जनावरातील लक्षणे मात्र एकसारखी असतात.

लक्षणांमध्ये वैरण –

पशुखाद्य न खाणे, दूध उत्पादन घटणे, १०४ ते १०५ अंश फॅरेनहाइटपर्यंत ताप येऊन तोंडात पुरळ व फोड येतात, नंतर ते फुटतात. पायातील खुरांच्या बेचक्यात, कासेवर देखील फोड येतात. ते फुटतात व जखमा होतात. त्वचा निस्तेज होते, वजन घटते, कासेवरील फोड, जखमा यामुळे वासरांना रेडकांना बाधा होऊ शकते. त्यांच्यात मरतुकदेखील होते. बरी झालेली जनावरे अशक्त होतात, दूध कमी देतात. हृदय व फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते, जनावरे धापा टाकतात. जनावरे गाभडतात अनेक वेळा जनावरांमध्ये वंध्यत्व येते. मग अशी अनुत्पादित किंवा कमी उत्पादन देणारी जनावरे हे पशुपालकांना पोसण्याशिवाय पर्याय राहत नाही.

उपचाराचा भाग म्हणून प्रतिजैविके, ४ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट किंवा २ ते ४ टक्के सोडिअम बायकार्बोनेट किंवा १ ते २ टक्के तुरटीच्या द्रावणाने तोंड, पायातील जखमा धुणे सोबत बोरो ग्लिसरीन, तेल हळद, तोंडातील जखमाला लावणे तसेच पातळ पेंड, कांजी, गूळ व पीठ यांचे मिश्रण, मऊ हिरवे गवत, २४ तास स्वच्छ पाणी देणे, तसेच ताण कमी करणारी औषधे व जीवनसत्त्वाची इंजेक्शन किंवा पातळ पावडर स्वरूपात खाद्यातून देणे, सलाइन देणे असे सर्व करावे लागते.

या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘उपचारापेक्षा प्रतिबंध बरा’ म्हणून लसीकरण हा एकमेव उपाय उरतो. या रोगाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व खूप आहे. या रोगाच्या प्रादुर्भावावर प्राणिजन्य पदार्थाची आयात निर्यात अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ज्या प्रकारे पशुपालकांच्या खिशाला चाट बसते त्याप्रमाणे देशाच्या आर्थिक उलाढालीवर दूरगामी परिणाम करणारा हा भयंकर रोग आहे. जगातील प्रत्येक देशाचे या रोगाच्या प्रादुर्भावावर लक्ष असते. त्यामुळे अशा रोगाच्या बाधित देशातील जनावरे, प्राणिजन्य उत्पादने इतर देश आपल्या देशात आयात करायला धजावत नाहीत, किंबहुना करत नाहीत. त्यासाठी लसीकरण करून या रोगाचे समूळ उच्चाटन करण्याकरिता सातत्याने फार मोठे प्रयत्न करावे लागतात.

आपल्या देशात देखील ‘लसीकरण’ या एकमेव उपायावर जोर देण्यात आला आहे. लसीकरणामुळे लाळ्या खुरकूत रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. ती वर्षभर टिकावी म्हणून दर सहा महिन्यांनी त्याला बूस्टर लसीकरण करावे लागते. त्यासाठी ट्रायव्हॅलंट लसीचा वापर ज्यामध्ये विषाणूचे तीन मुख्य प्रकार आहेत अशी लस वापरली जाते. चार ते पाच महिन्यांच्या वासरापासून सर्व वयाच्या जनावरांना प्रत्येक सहा महिन्यांनी एक मात्रा अशा प्रकारच्या फेऱ्यांमध्ये नियमित लसीकरण करणे आवश्यक असते. ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर दूध, मांस, मांसजन्य पदार्थ याचे उत्पादन अबाधित राहून पशुपालकासह देशाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.

देशात १९८७ मध्ये एनडीडीबीने केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यातील अकरा जिल्ह्यात ‘लाळ्या खुरकूत नियंत्रण योजना’ प्रायोगिक तत्त्वावर राबवली. नियोजनबद्ध लसीकरण कार्यक्रमामुळे लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव शून्यावर आणता येतो, हे यातून सिद्ध झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रभाव असणाऱ्या या रोगाविरुद्ध लढण्यासाठी २००३ मध्ये ‘लाळ्या खुरकूत नियंत्रण कार्यक्रम’ (एफएमडीसीपी) केंद्र शासनाकडून राबवण्यास सुरुवात झाली.

श्रोत :- agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top