कृषी महाराष्ट्र

Onion Seed Production : शास्त्रीय पद्धतीने कांदा बीजोत्पादन कसे करावे ? वाचा सविस्तर

Onion Seed Production : शास्त्रीय पद्धतीने कांदा बीजोत्पादन कसे करावे ? वाचा सविस्तर

Onion Seed Production

बहुतांश बीज उत्पादन कंपन्या कांदा बीजोत्पादनात जास्त रस घेत नाहीत. पर्यायाने शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःचे बी तयार करून घ्यावे लागते. या बीजोत्पादनामध्ये शास्त्रीय बाजू योग्य प्रमाणे पाळणे गरजेचे असते. कांदा बीजोत्पादनातील शास्त्रीय बाजू या लेखातून समजून घेऊ.

उत्तम व मागणी असलेल्या जातीची निवड :

कांद्यांमध्ये हंगाम (Onion) आणि रंगानुसार अनेक जाती आहेत. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने भीमा डार्क रेड, भीमा रेड, भीमा राज, भीमा सुपर, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाईट रेड, भीमा शुभ्रा, भीमा श्‍वेता आणि भीमा सफेद अशा दहा जाती विकसित केल्या आहेत.

बीजोत्पादनासाठी (Onion Seed Production) उत्तम प्रतीच्या कांद्यांची निवड करणे आवश्यक असते. अनेकदा चांगले कांदे बाजारात विकले जातात आणि खराब कांदे बीजोत्पादनासाठी वापरले जातात. त्यामुळे कांद्याच्या नवीन पिढीमध्ये अनेक वैगुण्ये वाढतात. चांगला वाण टिकवून ठेवणे, सुधारणा करण्याच्या दृष्टीने बियाण्यासाठी चांगल्या कंदाची लागवड करावी.

हवामान आणि जमीन

कांदा पीक हे बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे.

-पराग सिंचनाच्या काळात तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढले, तर मधमाश्यांचा वावर कमी होऊन बीजोत्पादन कमी होते.

– बीजोत्पादनासाठी स्वच्छ सूर्यप्रकाशसुद्धा आवश्यक असतो. ढगाळ हवामान किंवा पाऊस यांमुळे रोगांचे प्रमाण वाढते. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान यामुळे फलधारणा चांगली होते.

-मध्यम ते भारी जमिनीत कांदा बीजोत्पादन चांगले होते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. चोपण किंवा क्षारयुक्त जमिनीत उत्पादन चांगले येत नाही. Onion Seed Production

-हलक्या किंवा मुरमाड जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये. अशा जमिनीत फुलांचे दांडे कमी निघतात आणि बी कमी तयार होते.

मातृकांद्यांची निवड आणि लागवड

मातृकांद्याच्या निवडीवरच तयार होणाऱ्या बीजाची शुद्धता आणि गुणवत्ता अवलंबून असते.

-चपटे किंवा जाड मानेचे कांदे लागवडीकरिता निवडू नये.

-कांद्याचा रंग आकर्षक आणि एकसारखा असावा.

-कांदे गोल, मध्यम किंवा मोठ्या आकाराचे असावेत.

-सर्वसाधारणपणे मध्यम आकाराचे (वजन ७० ते ८० ग्रॅमच्या दरम्यान, व्यास ४.५ ते ६ सें.मी.) कांदे वापरले, तर हेक्टरी २५ ते ३० क्विंटल कांदे बियाणे म्हणून लागतात.

-शक्यतोवर एका डोळ्याचे कांदे निवडावेत.

-निवडलेले कांदे चांगले सुकलेले असावेत. सालपट निघालेले, काजळी आलेले, कोंब आलेले किंवा सडलेले कांदे निवडू नयेत.

– प्रत्येक कांद्याचा वरचा एक तृतीयांश भाग कापून काढावा.

-कापून तयार केलेले कांदे कार्बोसल्फान २ मि.लि. आणि कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात अर्धा तास बुडवून नंतर लावावेत.

-सरी वरंब्यावर लागवड करताना ४५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीच्या एका बाजूवर ३० सें.मी. अंतरावर कांदे लावावेत. कंद मातीमध्ये पूर्ण झाकावेत.

-ठिबक सिंचनावर लागवड करावयाची झाल्यास ५० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. दोन सरींच्या तळाशी २० सें.मी. अंतरावर कांदे ठेवावेत. एक सर मोकळी सोडावी. कांदे ठेवलेल्या सरीचा माथा सपाट करावा. त्यामुळे सरींच्या तळाशी ठेवलेले कांदे मातीने चांगले झाकून जातात. शिवाय ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवण्यास सपाट जागा तयार होते. एका जोड ओळीसाठी एक ठिबक सिंचनाची नळी वापरता येते.

संतुलित खत व्यवस्थापन

लागवडीच्या २० दिवस आधी २५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत पसरवून नांगरट करावी. याच बरोबर १०० कि.ग्रॅ. नत्र, ५० कि.ग्रॅ. स्फुरद, ५० कि.ग्रॅ. पालाश आणि ५० कि.ग्रॅ. गंधक यांची शिफारस आहे. कांदा लागवडीआधी स्फुरद, पालाश आणि गंधक

यांच्या पूर्ण आणि नत्राची निम्मी मात्रा द्यावी. उरलेले ५० कि.ग्रॅ. नत्र दोन भागांत विभागून द्यावे. पहिला भाग कंद लावल्यानंतर ३० दिवसांनी, तर दुसरा भाग लागवडीनंतर ५० दिवसांनी द्यावा. कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगेनीज, बोरॉन आदी सूक्ष्म द्रव्यांची गरज असते. सूक्ष्म द्रव्यांच्या कमतरतेची ओळख पटल्यानंतरच त्यांची सल्फेटच्या रूपात १ ग्रॅम पावडर प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. फवारणी करताना त्यात चिकटद्रव्ये ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात घालावे. सूक्ष्म द्रव्यांची फवारणी कांदे लावल्यानंतर ५० ते ७० दिवसांच्या दरम्यान करावी. दांड्यावरील फुले उमलल्यानंतर फवारणी करू नये.

पाणी नियोजन

बीजोत्पादनासाठी कांदे लावल्यानंतर पहिले पाणी हलके द्यावे. पहिल्या पाण्यानंतर लगेच कोंब फुटून निघतात. उघडे पडलेले कांदे मातीने झाकून घ्यावेत आणि दुसरे पाणी द्यावे. कांदा बीजोत्पादन सर्वसाधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घेत असल्यामुळे दोन पाळ्यांमधील अंतर ८ ते १० दिवस ठेवावे.

प्रत्येक पाळीत नेहमी हलके पाणी द्यावे. कांदा पिकाची मुळे १५ ते २० सें.मी. खोल जातात. तेवढाच भाग ओला राहील इतकेच पाणी देणे गरजेचे असते. पाणी जास्त झाले तर कंद सडतात. हलक्या जमिनीत पाणी ६ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे. पाणी कमी पडल्यास बी वजनाने हलके राहते आणि त्याची उगवणक्षमता कमी होते. ठिबक सिंचनावर बीजोत्पादन उत्तम येते. एक मीटर अंतरावर ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवून नळीच्या दोन्ही बाजूंनी कांदा लागवड करून पाणी देता येते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची ३० ते ३५ टक्के बचत होते, पाणी देणे सुलभ होते, शिवाय तणांचे प्रमाण सुद्धा कमी राहते.

तण व्यवस्थापन

कांदा बीजोत्पादन पिकात तणांचा बंदोबस्त करणे मोठे जिकिरीचे काम असते. विशेषतः फुलांचे दांडे निघाल्यानंतर खुरपणी करतेवेळी फुलांच्या दांड्याची मोडतोड होऊन नुकसान होते. फूल येईपर्यंत एक खुरपणी करता येते. कांदे लावल्यानंतर साधारणपणे ४५ दिवसांनी खुरपणी करावी. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन ३ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे आणि लगेच पाणी द्यावे.

पाणी देण्यास ३-४ तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास तणनाशकाची परिणामकारकता कमी होते. तणनाशकाचा परिणाम साधारणपणे ४५ दिवसांपर्यंत राहतो. त्यानंतर पाण्यासोबत किंवा हवेसोबत वाहून येणारे गवताचे बी रुजू लागते आणि तण परत वाढते. अशा वेळी ४५ दिवसांनी दुसऱ्यांदा पेंडीमिथॅलीनची फवारणी केली, तर तणाचा उपद्रव बराच कमी करता येतो.

विलगीकरण आणि पूरक पराग सिंचन

कांदा पिकात परपरागीभवनाद्वारे फलधारणा होते. मधमाश्‍या मध आणि पराग कण गोळा करण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर भ्रमण करत सुमारे दीड कि.मी. परिसरात फिरतात. त्यामुळे बीजोत्पादनासाठी दोन जाती दीड कि.मी.च्या आत लावल्या, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही.

बियाण्यांमध्ये भेसळ होऊ नये आणि गुणवत्ता टिकून राहावी म्हणून कांदा बीजोत्पादनासाठी किमान दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे आवश्यक आहे. फुले उमलल्यानंतर नैसर्गिकरीत्या मधमाश्‍या फुलांवर येऊ लागतात. मात्र जंगलतोड आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मधमाश्यांची कमतरता जाणवत असल्यास एकरी दोन ते तीन मधमाशी पेट्या शेतात फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात. शेतात मधमाश्‍यांची संख्या व कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी कांद्याची फुले उमलल्यानंतर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये.

पीक संरक्षण :

१) कांदा बीजोत्पादनाच्या पिकावर फुलकिडे आणि लाल कोळी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. कांदा लागवडीवेळी हेक्टरी ३५ किलो कार्बोफ्युरान मातीत मिसळल्यास सुमारे एक महिन्यापर्यंत पिकाचे किडीपासून संरक्षण होते. त्यानंतर गरजेनुसार दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने डायमिथोएट १ मि.ली., प्रोफेनोफॉस १.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन १ मि.लि. प्रति लिटर पाणी चिकट द्रव्यासोबत मिसळून आलटून-पालटून फवारावीत.

२) जांभळा करपा आणि तपकिरी करपा या बुरशीजन्य तसेच आयरिश येलो स्पॉट व्हायरस आणि ॲस्टर येलो ड्वार्फ व्हायरस या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे रोगाच्या तीव्रतेनुसार दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

३) रोग आणि किडीच्या बंदोबस्ताकरिता बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची एकत्र फवारणी करावी.

४) वरील फवारणी केवळ फुले उमलेपर्यंतच करावी. फुले उमलल्यानंतर फवारणी करू नये. अन्यथा, मधमाश्यांचा वावर कमी होऊन परागसिंचन आणि फलधारणेवर विपरीत परिणाम होतो.

काढणी आणि सुकवण

-कांद्याच्या गोंड्यातील सर्व बी एकाचवेळी पक्व होत नाही. बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो आणि बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. सामान्यतः ३ ते ४ वेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते.

-काढणी सकाळी वातावरणात आर्द्रता असताना करावी. गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असल्याने बी गळून पडण्याची भीती कमी राहते.

-गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत.

-गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे.

-चांगल्या सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू मारून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे.

– हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या साह्याने किंवा प्रतवारी यंत्राने वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे.

साठवण

मळणी केलेल्या बियांत १० ते १२ टक्के आर्द्रता असते. स्वच्छतेनंतर पुन्हा पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. असे बियाणे एक ते दीड वर्ष टिकते. कांदा बी जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी आर्द्रतारोधक पिशव्यांचा वापर करावा. सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले, तर ते जास्त दिवस टिकू शकते.

अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने कांदा बीजोत्पादन करावे.

– डॉ. शैलेंद्र शं. गाडगे, ९९२२४९०४८३
(वरिष्ठ शास्त्रज्ञ – कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

श्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top