चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखावी ? सविस्तर माहिती
चुनखडीयुक्त जमीन
महाराष्ट्रात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी (Limestone Soil) आढळतात.
विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसच बेसाल्ट (Basalt) खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी- अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते.
वेड्यावाकड्या खड्यांच्या स्वरूपात आणि भुकटी स्वरूपात असे जमिनीत मुक्त चुन्याचे दोन प्रकार आढळून येतात.
अशा जमिनी चुन्यामुळे पांढऱ्या, भुरकट रंगाच्या दिसून येतात.खड्याच्या स्वरूपात असलेल्या चुन्यापेक्षा भुकटी स्वरूपातील चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो.
चुनखडीयुक्त जमीन कशी ओळखायची याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
जमिनीचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो.
जमिनीची घनता वाढते.म्हणजेच जमिनीची घडण कडक बनते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.
पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते.
जमिनीतील मातीचा सामू विम्लधर्मीय म्हणजेच सामू ८.० पेक्षा जास्त, तर क्षारांचे प्रमाण कमी असत.
मातीत मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असते. हेच प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकांना, फळपिकांना हानिकारक ठरते. (Soil Management)
उपलब्ध मुख्य अन्नद्रव्यांची म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश ची उपलब्धता कमी होते.
उपलब्ध दुय्यम अन्नद्रव्यांची म्हणजेच मॅग्नेशिअम, गंधकाची उपलब्धता कमी होते.
लोह, जस्त, बोरॉन यासारख्या उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते.
लोहाच्या कमतरतेमुळे पिकांची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या राहतात. हीच पाने पुढे पिवळी पडतात व नंतर वाळतात. पिकांची वाढ खुंटते. यालाच इंग्रजीमध्ये ‘लाइम इन्ड्यूस क्लोरोसिस’ असे म्हणतात. शेतकरी याला ‘केवडा पडला’ असे म्हणतात.
कोरडवाहू क्षेत्रात गावातील गावठाण जागेत अशा पांढऱ्या चुनखडीयुक्त जमिनी आढळून येतात.
चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने वाळवी, हुमणी, सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
Source : agrowon.com