कृषी महाराष्ट्र

उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन : संपूर्ण माहिती

उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजन : संपूर्ण माहिती

 

उन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी, उन्हाळी हंगामातील लागवड जानेवारीचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा यादरम्यान पूर्ण करावी. पिवळ्या रंगाच्या आकर्षक टपोरे सूर्यफूल या पिकाचे मूलस्थान दक्षिण अमेरिकेमध्ये, त्यातही मेक्सिकोमध्ये झाला असल्याचे मानले जाते सूर्यफूल हे जागतिक पातळीवर तेलबिया पिकांतील तिसरे महत्त्वाचे पीक आहे. भारतात कर्नाटक हे राज्य सूर्यफूल उत्पादनात अग्रेसर आहे. ( sunflower planting )

सूर्यफूल (sunflower) हे पीक महाराष्ट्रात वर्षभर घेतले जात असले तरी त्याचे उत्पादन रब्बी हंगामामध्ये अधिक मिळते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नगर तर विदर्भातील बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांत सूर्यफूल पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जमीन :
पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. सामू ६.५ ते ८ असल्यास रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

पूर्वमशागत :
जमिनीची खोल नांगरणी करून शेतातील काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे, नांगरणीनंतर २-३ आडव्या उभ्या कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीवेळीच ४-५ गाड्या कुजलेले शेणखत मिसळावे. पेरणीवेळी जमिनीमध्ये चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. कारण सूर्यफूल बियांच्या वरील आवरण जाड असून, त्यात पाणी हळू शोषले जाते.

वाण :
मॉर्डेन, भानू, ज्वालामुखी, फुले भास्कर, फुले रविराज, एल.एस.एफ.एच. १७१, बी.एस.एच.१, एम.एस.एफ.एच. ८, एस.एस.५६, एल.एस.११, एम.एस.एफ.एच.१७.

बियाणे प्रमाण :
◆प्रति हेक्टरी : ५ ते ७.५ किलो बियाण्यांची शिफारस आहे.
◆सुधारित वाण : ८ ते १० किलो प्रति हेक्टरी.
◆संकरित वाण : ५ ते ६ किलो प्रति हेक्टरी
◆पेरणीनंतर १५ ते १८ दिवसांनी दोन रोपांतील अंतर ३० सेंमी ठेवून विरळणी करावी.

आंतरपीक :
भूईमूग सूर्यफूल (३:१) या प्रमाणात केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होते.

बीजप्रक्रिया :
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थतील बुरशीचा बियाण्याला होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया महत्त्वाची ठरते.
◆कॅप्टन ३ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो.
◆त्यानंतर ॲझोस्पिरिलम व पी.एस.बी. या जिवाणू खताची २० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणी :
◆खरीप हंगाम : जुलैचा पहिला पंधरवाडा
◆रब्बी हंगाम : ऑक्टोबरचा दुसरा आठवडा
◆उन्हाळी हंगाम : जानेवारीचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा.
◆पेरणी करताना उंच वाढणाऱ्या वाणामध्ये (संकरित) ६० x ६० सेंमी अंतर ठेवावे. तर कमी उंचीच्या वाणामध्ये (मध्यम व खोल जमिनीत) ४५ x ३० सेंमी अंतर ठेवावे.
◆बियाणे पेरताना ३ ते ७ सेंमी खोलीपर्यंत पेरावे.

परागीकरण महत्त्वाचे :
१) अलीकडे परागीकरणासाठी मधमाश्यांची संख्या कमी झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट येत आहे. शक्य असल्यास प्रति हेक्टरी पाच मधपेट्या ठेवाव्यात.
२) मधमाश्या शेताकडे याव्यात, यासाठी पिकांमध्ये फुलोरा अवस्थेमध्ये कोणत्याही तीव्र कीडनाशकाची फवारणी टाळावी. अत्यंत आवश्यकता असल्यास वनस्पतिजन्य कीडनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करता येईल.
३) पिकाच्या फुलोरा अवस्थेत सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळूवार हात फिरवावा. यामुळे कृत्रिम परागीभवन होऊन सूर्यफुलामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. परिणामी उत्पादनात वाढ होते.

खत व्यवस्थापन :
◆पिकास प्रति हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे.
◆महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद, २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे.
◆बागायती पिकास हेक्टरी ६०:६०:४० किलो खतांची शिफारस आहे. यापैकी अर्धे (३० किलो) नत्र व संपूर्ण स्फुरद, पालाश पेरणीच्यावेळी व उर्वरित (३० किलो) नत्र पेरणीनंतर एका महिन्याने द्यावे.
◆जमिनीत गंधकाची कमतरता असल्यास २० ते २५ किलो प्रति हेक्टर गंधक पेरणीच्या वेळी द्यावे.
◆गंधकामुळे बियांतील तेल प्रमाणामध्ये वाढ होते.
◆फुलोरा अवस्थेत बोरॉन (०.२ टक्का) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.

तण व्यवस्थापन :
◆पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक खुरपणी २० व ३५-४० दिवसांनी कोळपणी कराव्यात.
◆किंवा कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तणनाशकांचा शिफारस केलेल्या वेळेत व मात्रेत वापर करावा.

पाणी व्यवस्थापन :
सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिशय संवेदनशील पीक आहे. पिकाच्या पाण्यासाठी संवेदनशील अवस्था पुढील प्रमाणे फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था. या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये. या अवस्थांमध्ये ताण पडल्यास दाणे पोकळ बनतात. उत्पादनात घट होते.

पीक संरक्षण :
◆विषाणूजन्य रोग तसेच बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. विषाणूजन्य रोग हे कीटकांमार्फत पसरतात.
◆फुलकिडे या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ०.२ मिलि प्रति लिटर पाण्यातून १५ ते २० दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारणी करावी.
◆केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत

उत्पादन (हेक्टरी) :
१) कोरडवाहू : ८ ते १० क्विंटल
२) संकरित वाण : १२ ते १५ क्विंटल
३) बागायती : १८ ते २० क्विंटल

Source : krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top