कृषी महाराष्ट्र

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर कसा करावा ? वाचा सविस्तर

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर कसा करावा ? वाचा सविस्तर

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

Fungal Diseases : अनेक पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा वापर केला जातो. विविध भाजीपाला आणि फळभाजी पिकांचे बोर्डो मिश्रणाच्या वापराने प्रभावी रोगनियंत्रण होते.

वांगी, मिरची, बटाटा, टोमॅटो, भोपळावर्गीय भाज्या, कोबी, वाटाणा, इ. पिकांवरील करपा, काळा करपा, पानांवरील ठिपके, केवडा, भुरी, जिवाणूजन्य करपा अशा विविध रोगांच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्रावणाची तीव्रता ठरवावी.

भाजीपाला पिकांसाठी साधारणतः ०.५ ते ०.६ टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य असते. जमिनीतील बुरशीमुळे होणारे मर, मूळकुज, खोडकुज इ. रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण (१ टक्का) याप्रमाणे वापर करावा.

पीकनिहाय रोग नियंत्रणासाठी वापर

पीक—रोग—बोर्डो मिश्रणाची तीव्रता (टक्के)

१) आंबा—करपा—०.८ टक्का

००–फांदीमर—१.० टक्का

२) द्राक्ष—करपा, केवडा—पिकाच्या अवस्थेनुसार ०.२ ते १.० टक्का

३) केळी—पानांवरील ठिपके ०.८ टक्का

४) डाळिंब—पानांवरील काळे डाग—०.८ टक्का

००—खोडावरील काळे डाग—१.० टक्का

५) पपई—पानावरील ठिपके—१.० टक्का

६) संत्रा, मोसंबी व लिंबूवर्गीय पिके—पानांवरील काळे डाग, शेंडामर—१.० टक्का

७) सीताफळ—फळ, कुजव्या रोग—१.० टक्का

८) नारळ—करपा—१.० टक्का

९) सुपारी—करपा—१.० टक्का

१०) काजू—-करपा—१.० टक्का Fungal Diseases

एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धती

– गर्द निळ्या रंगाचे १ किलो मोरचूद घेऊन त्याची बारीक पूड करावी. प्लॅस्टिक, माती किंवा लाकडी भांड्यामध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यात बारीक केलेली मोरचूद पूड टाकावी. जेणेकरून ती चांगली विरघळेल.

– उच्च प्रतीचा चांगला १ किलो कळीचा चुना घ्यावा. प्लॅस्टिक अथवा मातीच्या अथवा लाकडी भांड्यामध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यात चुना विरघळण्यास टाकावा. चुना पाण्यात टाकल्यानंतर पाणी गरम होईल व चुना विरघळण्यास सुरुवात होईल. चांगल्या प्रकारे विरघळण्यासाठी मिश्रण काठीने ढवळावे. चुन्याचे द्रावण थंड होऊ द्यावे.

– मोरचूद द्रावण वस्त्रगाळ करून वेगळ्या लाकडी किंवा प्लॅस्टिक ड्रम (१०० लिटरपेक्षा जास्त क्षमतेचा)मध्ये ओतावे. नंतर चुन्याची निवळी वस्त्रगाळ करून हळूहळू सामू ७.० इतका येईपर्यंत मोरचुदाच्या द्रावणात मिसळावी.

– अशाप्रकारे उदासीन (७.०) सामूचे मिश्रण तयार झाल्यावर त्यात पाणी टाकून एकूण १०० लिटर द्रावण तयार करावे.

– बोर्डो मिश्रण तयार केल्यापासून साधारण १२ तासांच्या आत वापरावे.

बोर्डो मिश्रणाची योग्यता तपासण्यासाठी चाचणी

मिश्रणात जास्त मोरचूद असल्यास कोवळ्या पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच सामू अधिक आम्लधर्मीय किंवा विम्लधर्मीय असल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणून पिकावर फवारणी करण्यापूर्वी बोर्डो मिश्रण फवारणीस योग्य आहे की नाही याची चाचणी घेणे आवश्यक असते.

१) पी.एच. पट्टी

सामू तपासणीसाठी बाजारात पिवळसर रंगाच्या पी.एच. पट्ट्या उपलब्ध आहेत. या पट्ट्यांबरोबर वेगवेगळ्या रंगछटा असलेली १ ते १४ पर्यंत सामू दर्शविणारी पट्टी मिळते. तयार बोर्डो मिश्रणामध्ये पिवळी पट्टी सामू तपासणीसाठी बुडवावी.

त्यास आलेली रंगछटा सामूदर्शक पट्टीवरील कोणत्या रंगास जुळते ते पाहावे. ज्या रंगास ती जुळते तो मिश्रणाचा सामू आहे असे समजावे. सामू ७ पेक्षा कमी असल्यास, मिश्रणात चुन्याचे द्रावण अगदी थोडे थोडे मिसळत ढवळावे. उदासीन द्रावणासाठी असलेला सामूचा रंग येताच चुन्याचे द्रावण टाकणे बंद करावे.

२) लिटमस पेपर चाचणी

निळा लिटमस पेपर मिश्रणात बुडविल्यानंतर तो लाल झाल्यास मिश्रणात मोरचूद अधिक असून, ते आम्लधर्मीय म्हणजेच फवारण्यास अयोग्य आहे, असे समजावे. अशावेळी चुन्याची निवळी मिश्रणात थोडी थोडी घालून ते ढवळावे. लिटमस पेपर निळा होईपर्यंत द्रावणात टाकावे.

३) लोखंडी सळई किंवा चाकूचे पाते

लोखंडी सळई किंवा चाकूचे पाते घेऊन द्रावणात ५ मिनिटे बुडवावे. त्यावर जर तांबूस किंवा गंजासारखा थर जमा झाला नाही, तर द्रावण फवारणीस योग्य आहे असे समजावे.

४) पीएच मीटर

सध्या बाजारात शर्टच्या खिशात बसतील अशाप्रकारचे पीएच मीटर उपलब्ध आहेत. यांच्या मदतीने अचूकपणे मिश्रणाचा सामू मोजता येतो. त्यामुळे बोर्डो मिश्रण तयार करताना पीएच मीटर वापरावा.

वेगवेगळ्या तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक सामग्री

बोर्डो मिश्रण तीव्रता (टक्के)—मोरचूद (ग्रॅम)—कळीचा चुना (ग्रॅम)—पाणी (लिटर)

१.००—१०००—१०००—१००

०.८०—८००—८००—१००

०.६०—६००—६००—१००

०.४०—४००—४००—१००

०.२०—२००—२००—१००

०.१०—१००—१००—१०० Fungal Diseases

घ्यावयाची काळजी

– कळीचा चुना वापरताना तो दगडविरहित, उत्तम प्रतीचा, विरी न गेलेला असावा. विरजताना फसफसणारा असावा. मोरचुदाचे गर्द, निळ्या रंगाचे स्फटिकासमान लहान खडे निवडावेत.

– मिश्रण मातीच्या, लाकडाच्या किंवा प्लॅस्टिकच्या टाकीत तयार करावे. धातूच्या टाकीचा वापर टाळावा. कारण, या मिश्रणामुळे टाकीवर गंज चढतो.

– वापरलेल्या सामग्रीची गुणवत्ता निकृष्ट असेल तर मिश्रण आम्लीय होऊ शकते. मिश्रण आम्लीय झाल्यास, त्यातील मुक्त तांबे झाडांसाठी अत्यंत विषारी ठरते. त्यामुळे झाडे जळतात.

– मिश्रण बनविण्यासाठी क्षारयुक्त पाणी वापरू नये.

– मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचा वापर करावा.

– फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे. जेणेकरून फवारणी करताना पंपाच्या तोटीत कण अडकणार नाहीत. पावसाळ्यात मिश्रणामध्ये चिकट द्रव (स्टिकर) मिसळून नंतर वापरावे.

– फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे.

– तयार मिश्रणाचा त्याच दिवशी वापर करावा.

– बोर्डो मिश्रणात कोणतेही बुरशीनाशक किंवा कीटकनाशके मिसळू नयेत.

– जास्त वेळ साठवून ठेवता येत नाही.

– मिश्रणाचा सामू आम्लधर्मीय अथवा विम्लधर्मीय झाल्यास पाने व फळांवर डाग पडतात.

– काही पिकांत हिरवेपणा वाढतो तर काही पिकांमध्ये परिपक्वतेचा कालावधी थोडासा वाढू शकतो.

– उष्ण हवामानात वापर केल्यास पाने जळण्याची शक्यता असते.

बोर्डो मिश्रणाचे फायदे

– इतर बुरशीनाशकापेक्षा बोर्डो मिश्रण तयार करण्यास कमी खर्च येतो.

– शेतकरी स्वतः तयार करू शकतात.

– बोर्डो मिश्रणासाठी आवश्यक मोरचूद आणि चुना हे बाजारात सहज उपलब्ध होते.

– बोर्डो मिश्रण इतर व्यावसायिक बुरशीनाशकांच्या तुलनेत कमी विषारी असून, हाताळण्यासाठी सुरक्षित आहे.

– अनेक पिकांवरील रोगांचे व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.

– पानांना चिटकून राहण्याची क्षमता जास्त आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावबुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

(टीप : उपरोक्त माहिती राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठांनी केलेल्या शिफारशींवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारशींची परिणामकारकता ही विविध भागांत भिन्न असू शकते.)

डॉ. युवराज बालगुडे, ९८९०३८०६५४, (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

Bordeaux mixture

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top