अमरवेल तणाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती
अमरवेल
Weed Management : अमरवेल हे कंदमूळ वर्गातील पर्णहीन, पिवळसर रंगाचे तण आहे. या तणाच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण संपूर्ण परोपजीवी असून, द्विदल वनस्पतींवर अवलंबून राहते. परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकासोबत द्विदल तणावर (तरोटा, रेशीमकाटा, गोखुरू, हजारदानी, बावची इ.) देखील स्वत:चे जीवनचक्र पूर्ण करते.
सद्य:स्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. सोयाबीन पिकातील विविध तणांच्या व्यवस्थापनासाठी तणनाशकांचा वापर प्रभावी ठरत आहे.
मात्र तरीही मागील काही वर्षांत अमरवेल किंवा अधरवेल या परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव द्विदलवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाल्यावस्थेत हा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिटकतो व जमिनीपासून वेगळा होतो.
त्यानंतर सूक्ष्म दातासारख्या तंतूच्या मदतीने त्या वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. परिणामी उत्पादनात मोठी घट येते.
ओळख :
– अमरवेलाचे बी २० वर्षांहून अधिक काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
– या तणाच्या बीला उगवणीसाठी अनुकूल १५ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान मिळताच त्याची उगवण होते.
– बी आकाराने १ ते दीड सेंमी इतके असते. वेल पूर्णत: मूळरहित असून पिवळसर, नारिंगी व पानेविरहित दोऱ्यासारखा दिसतो.
– मुख्यत: त्याच्या उगवण स्थानापासून २.५ ते ५ सेंमी दूरवरील द्विदल वनस्पतीवर चिकटतो. परंतु परिसरात द्विदल वनस्पती नसली तरी रोप ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकते.
– एक अमरवेल प्रतिदिन साधारण ७ सेंमीपर्यंत वाढून जवळपास ३ चौ.मी. क्षेत्र व्यापतो.
– साधारणत: ६० व्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची क्रिया सुरू होते.
– या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे १०० टक्क्यांपर्यंत देखील नुकसान होऊ शकते. मूग व उडीद ३१ ते ३४ टक्के, टोमॅटो ७२ टक्के, हरभरा ८५.७ टक्के व मिरची पिकात ६० ते ६५ टक्के उत्पादनात घट आढळून आली आहे. Amarvel Weed
व्यवस्थापन :
अमरवेल या तणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामूहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनिक पद्धतींचा वापर प्रभावी तणनियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो.
अ) प्रतिबंधात्मक उपाय :
– पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणविरहित बियाण्यांचा वापर करावा.
– पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
– विशेषत: शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून किंवा जाळून नष्ट करावे. कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहतो.
– प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ करूनच त्यांचा पुन्हा वापर करावा.
ब) निवारणात्मक उपाय
१) मशागतीय पद्धत :
– जमिनीची खोल नांगरणी करावी. कारण बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने ८ सेंमी पलीकडे अमरवेलीची उगवण होत नाही.
– जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. नियमित डवरणी व निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.
– पिकांची फेरपालट करावी. प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तृणवर्गीय पिकांची लागवड करावी.
– अमरवेल ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे यजमान पिकांची लागवड तणनियंत्रण पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी करावी.
रासायनिक नियंत्रण : (प्रमाण : प्रति १० लिटर पाणी)
– सोयाबीन, भुईमूग, कापूस, तूर, कांदा, मिरची या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक
पेंन्डीमिथॅलीन (३८.७ टक्के सीएस) ३० ते ३५ मिलि प्रति १० लिटर पाणी (एकरी ७०० मिलि प्रति २०० लिटर पाणी) याप्रमाणे
पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी.
– तणनाशक फवारणीनंतर वखराची हलकी पाळी अवश्य द्यावी.
(टीप : लेबलक्लेम आहेत.)
– डॉ. विकास गौड, ८६३७७०७६४५
(सहायक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)