कापूस बाजारभाव : आंतरराष्ट्रीय बाजारात दर तेजीत, वाचा संपूर्ण
कापूस बाजारभाव
काल आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दराने (Cotton Rate) चांगलीच झेप घेतली होती. कापूस उत्पादन कमी राहण्याच्या शक्यतेनं दरात अचानक वाढ झाल्याचं जाणकारांनी सांगितले. अमेरिकेत यंदा कापूस उत्पादन घटलेलं आहेच. आता ब्राझीलमध्येही कापूस उत्पादक भागांमध्ये पाऊस कमी आहे. तर भारतातील शेतकऱ्यांनी कापूस रोखला. यामुळं बाजारात पुरवठा मर्यादीत राहण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी दरात सुधारणा पाहायला मिळाली. काहीजण याला कृत्रिम तेजी म्हणत असले तरी शेतकऱ्यांसाठी ही तेजी फायदेशीर ठरू शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापूस दरात चांगली वाढ झाली होती. ती आजही कायम राहीली. काल कापूस बाजार ८२.५९ सेंट प्रतिपाऊंडवर उघडला होता. रुपयात हा दर १५ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्या. वायद्यांमध्ये कच्च्या कापसाचे व्यवहार होत नाहीत. तर रुईचे व्यवहार होतात.
काल बाजार उढल्यानंतर शेवटच्या टप्प्यात दराने ४ टक्क्यांनी उसळी घेत दिवसातील उच्चांकी ८५.६० सेंटची पातळी गाठली होती. म्हणजेच कापूस दर १५ हजार ६०० रुपयांवर पोचला होता. पण नंतर काहीशी घट होत कापसाने ८४ सेंट म्हणजेच १५ हजार ३५० रुपयांवर बाजार बंद झाला होता.
आजही आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील वाढ कायम होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८५.२९ सेंटवर बंद झाले. रुपयात हा दर १५ हजार ५६० रुपये होतो. तर देशातील एमसीएक्सवर कापसाचे वायदे २९ हजार ८४० रुपये प्रतिगाठीवर बंद झाले. एक कापूस गाठ १७० किलोची असते. क्विंटलमध्ये हा दर १७ हजार ५५५ रुपये होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील रुईच्या दरापेक्षा देशातील दर क्विंटलमागं जवळपास दोन हजार रुपयांनी जास्त होते. उद्योग मागील काही दिवसांपासून हीच ओरड करत आहेत. देशातील दर जास्त असल्याने उद्योग अडचणीत आल्याची तक्रार केली जाते. मात्र शेतकऱ्यांनाचं घटलेलं उत्पादन, एक क्विंटल कापूस वेचायला लागणा दीड दोन हजार रुपयांपर्यंतचा खर्च याकड कुणाचं लक्ष दिसत नाही.
सध्याची दरपातळी
बाजार समित्यांमधील, म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा दर, सरासरी ८ हजार ३०० ते ९ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. हा मागील काही दिवसांपासून टिकून आहे. या दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली. शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत.
स्थिती पूरक
पण देशातील दर आधीच आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळं देशातील कापसाचे दर वाढायचे असतील तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढणं गरजेचं आहे. ते सध्या घडताना दिसत आहे. जानेवारीत कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते. कापसाला यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.
source: agrowon.com