कृषी महाराष्ट्र

खपली गहू लागवडीचे तंत्र

खपली गहू लागवडीचे तंत्र

 

भारतात वेगवेगळ्या तीन प्रकारचे गहू (Wheat) घेतले जाते. ब्रेड चपाती किंवा शरबती बन्सी गहू व खपली गहू यांना व्यापारी दृष्ट्या महत्त्व आहे. यापैकी ९५ टक्के वाटा हा शरबती गव्हाचा आहे. खपली गहू काही प्रमाणात गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये घेतला जातो. पूर्वी ६० ते ७० च्या दशकात खपली गहू नदीच्या खोऱ्यात गाळाच्या आणि भारी जमिनीत कोरडवाहू मध्ये घेतला जात होता. परंतु कमी उत्पादन, काढणी व मळणीच्या अडचणीमुळे मागील तीन ते चार दशकात खपली गव्हाचे उत्पादन कमी झाले होते. परंतु मागील काही वर्षांमध्ये खपली गव्हातील उपयुक्त घटक उदाहरणार्थ पाचक पदार्थ, प्रथिने व कार्बोदके व ग्लायसेमिक इंडेक्स जो की मधुमेही रुग्णांसाठी अपायकारक असतो तो कमी असल्यामुळे पश्चिमात्य देशांमध्ये खपली गव्हाला महत्व प्राप्त झाले आहे. खपली गव्हापासून उत्कृष्ट प्रतीचा रवा, शेवया, पास्ता बनविता येतो. खपली गव्हाचे पदार्थ चविष्ट व मऊ बनतात. खपली गव्हाचा पेरा पश्चिम महाराष्ट्रात फलटण परिसरात वाढत आहे. महाराष्ट्रातील वातावरणातील अनुकूलता आणि मागील इतिहास बघता खपली गहू पेरणीस काही हरकत नाही. गव्हाला जे वातावरण लागते तेच खपली गव्हासाठी अनुकूल आहे. कर्नाटकातील धारवाड येथे झालेल्या संशोधनावरुन अधिक उत्पादन घेण्यासाठी पुढील तंत्राने गव्हाची पेरणी करावी.

खपली गव्हाचे वाण

पेरणीसाठी एमपी २००, डी.डी.के – १००१, डी.डी.के – १००९, डी.डी.के – १०२५, डी.डी.के – १०२९, एमएसीएस – २९७१, एच. डब्लू – १०९८ यापैकी वाणाची निवड करावी.

पेरणीचा कालावधी

गव्हाची पेरणी १ ते २० नोव्हेंबर दरम्यान करावी. थंडी वाढल्यास म्हणजे १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान झाले की पेरणी करावी.

पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यावर ३ ग्रॅम थायरम आणि अझॅटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून प्रक्रिया करावी.

बीयाणे प्रमाण आणि पेरणीतील अंतर

बागायती पेरणीसाठी १०० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. बागायती पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर २२.५ सेंमी ठेवून पेरणी करावी. पेरणी करताना ५ ते ६ सेंमी पेक्षा जास्त खोल बियाणे पडणार नाही याची काळजी घ्यावी.

खत व्यवस्थापन

जमिन तयार करताना २५ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणी करताना नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी ५० किलो, खत मात्रा द्यावी व उर्वरीत अर्धी नत्र मात्रा म्हणजे ५० नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

पाणी व्यवस्थापन

जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५ ते २० दिवसाच्या अंतराने संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. मुकूटमुळे फुटण्याची अवस्था, फुटवे जास्तीत जास्त येण्याची अवस्था, कांडी धरण्याची अवस्था, पीक फुलात असतानाचा काळ, दाण्यात दुधाळ चीक अवस्था तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top