कृषी सल्ला : वेगवेगळ्या पिकातील व्यवस्थापन
कृषी सल्ला
पूर्व हंगामी उसाची लागवड जमिनीमध्ये वापसा आल्यावर करावी.
– महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार पूर्व हंगामी उसाची लागवड (Sugarcane Cultivation) जमिनीमध्ये वापसा आल्यावर करावी. लागवडीसाठी को ८६०३२, को एम ०२६५, एम एस १०००१, को ९४०१२, कोसी ६७१ या जातींची निवड करावी.
– बागायती हरभरा (Chana) १० नोव्हेंबर पर्यंत पेरल्यास चांगले उत्पादन मिळते. पेरणी करिता विजय, विशाल, दिग्विजय आणि फुले विक्रम वाणांची तर काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पिकेव्ही २, पिकेव्ही ४ आणि कृपा या वाणांची निवड करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.
– गहू पेरणीसाठी जमिनीची मशागत करावी. खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० सेंमी खोलीवर नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २० ते २५ बैलगाड्या शेणखत टाकावे. पूर्वीच्या पिकाची धसकटे व इतर काडी, कचरा वेचून त्याचा वापर कंपोस्ट साठी करावा.
वेळेवर बागायती गव्हाची पेरणी करण्याकरिता योग्य वाणाची निवड करून १ ते १५ नोव्हेंबर पर्यंत बीज प्रक्रिया करून पेरणी करावी.
करडई पिकाच्या उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करणे आवश्यक आहे. विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावीत. दोन रोपातील अंतर २० सेंमी ठेवावे.
मिरची पिकात पानावरील ठिपके दिसताच कॉपरऑक्झिक्लोराईड किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मर रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड १० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति झाडास ५० मिली या प्रमाणे जिरवावे.
उन्हाळी कांद्याची लागवड ८ ते १० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरून करावी. लागवडीसाठी एन २-४-१, अरका निकेतन, भीमा किरण या सुधारित वाणांचा वापर करावा. कृषी सल्ला