Kharif Vegetable Cultivation : खरिपातील भाजीपाला पिकांचे नियोजन कसे करावे ? वाचा सविस्तर
टोमॅटो :
Kharif Vegetable : वाण : भाग्यश्री, धनश्री, राजश्री, फुले राजा (संकरित) इ.
जमिनीची मशागत करताना २० टन प्रति हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्या, लव्हाळा गाठी वेचून जाळून टाकाव्यात. ९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत. लागवड करतेवेळी दोन रोपांतील अंतर ३० सेंमी ठेवावे. लागवडीसाठी ३.६० मी. × ३ मी. आकारमानाचे वाफे तयार करावेत. Kharif Vegetable Cultivation
रोपांची लागवड करताना :
१) टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थितीत वाफे आणावेत.
२) लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच रोपांची लागवड करावी.
३) मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगग्रस्त रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत.
४) लागवडीपूर्वी रोपे कार्बोसल्फान १० मिलि व कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत.
५) रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. अन्यथा नाजूक खोड पिचल्यामुळे अशी रोपे नंतर मरतात.
६) लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे.
७) लागवडीनंतर १० दिवसांमध्ये एकदा सर्वेक्षण करून मेलेल्या रोपांच्या जागी नांग्या भरून घ्याव्यात.
वांगे :
महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागामध्ये वांगी पिकाच्या रंग आणि आकारानुसार अनेक जातींची लागवड केली जाते.
सुधारित जाती – मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी.के.एम. १.
जमीन – चांगली निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी चांगली असते.
बियांचे प्रमाण – सुधारित जातीसाठी हेक्टरी ४०० ते ५०० ग्रॅम बी लागते. संकरित जातीसाठी हेक्टरी १२० ते १५० ग्रॅम बी पुरेसे असते.
रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करून (हेक्टरी ३० ते ४० टन) शेणखत मिसळून द्यावे.
लागवड अंतर –
१) जमिनीच्या प्रकारानुसार, अ) हलकी जमीन -७५ × ७५ सें.मी., ब) भारी जमिनीसाठी १२० × ९० सें.मी.
२) जातीनुसार, अ) संकरित जातीसाठी – ९० × ९० सें.मी., ब) कमी वाढणाऱ्या जातीसाठी/ मध्यम जमिनीत – ९० × ७५ सें.मी.
मिरची :
पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भारी ते मध्यम प्रकारची जमीन आवश्यक असते. खरीप पिकाची लागवड जून-जुलै महिन्यांत, तसेच उशिरा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करतात.
सुधारित जाती –
अ) हिरव्या मिरचीसाठी – परभणी तेजस, ज्वाला, जी- ४, पंत सी.१, मुसळवाडी सिलेक्शन, फुले ज्योती, फुले मुक्ता.
ब) लाल मिरचीसाठी – जी- ४, पुसा ज्वाला, एन- ५९ इ.
बियाण्याचे प्रमाण-
रोपे तयार करण्यासाठी चांगली उगवणक्षमता असलेले, उत्कृष्ट दर्जाचे खात्रीशीर बियाणे वापरावे. हेक्टरी १ ते १.५ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी १ किलो बियाण्यास २ ते ३ ग्रॅम थायरम चोळावे.
लागवड –
मिरची लागवड सरी-वरंब्यावर करावी. उंच व पसरट रोपांची लागवड ६० × ६० सें.मी. अंतरावर व बुटक्या जातींची लागवड ६० × ४५ सें.मी. अंतरावर करावी. भारी जमिनीसाठी अंतर जास्त ठेवावे. लागवडीपूर्वी रोपे (विशेषतः पानाचा भाग) ५ मिनिटांसाठी पुढील द्रावणामध्ये बुडवून काढावीत.
क्लोरपायरिफॉस १२ मि.लि. अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम अधिक पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी. (ॲग्रेस्को
शिफारस)
भेंडी :
जमीन – मध्यम काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत भेंडीची वाढ चांगली होते. हलक्या जमिनीमध्ये पिकाची वाढ जोमदार होते नसल्याने उत्पादन व दर्जामध्ये विपरीत परिणाम जाणवतो. त्यासाठी अशा जमिनीत जास्तीत – जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. जमिनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असावा.
जाती :
१) अर्का अनामिका – आय. आय. एच. आर. बंगलोर येथे विकसित या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामांत लागवडीस योग्य आहे.
२) परभणी क्रांती – फळे व ८ ते १० सेंमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामांत लागवडीस योग्य जात आहे.
३) अर्का अभय – अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून, दोन बहर मिळतात.
४) पुसा सावनी – भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसित जातीची फळे १० ते १५ सेंमी लांब असून, झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा असते. खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य अशा या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून, फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते. Kharif Vegetable Cultivation
लागवड : नांगरट केल्यानंतर ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर उभ्या-आडव्या दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर प्रति हेक्टर २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. लागवड करताना ६० सें.मी. अंतरावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंस टोकण पद्धतीने ३० १५ सें.मी. अंतरावर भेंडीची लागवड करावी. लागवडीसाठी प्रति हेक्टरी १५ किलो बियाणे वापरावे. मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम अथवा कार्बेन्डाझिम किंवा पावडर स्वरूपातील ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे.
इतर भाजीपाला :-
भाजीपाला — वाण — बियाण्याचे प्रमाण प्रति एकर — लागवडीचे अंतर
वाल — कोकण भूषण, अर्का विजय — ४ किलो — ४५ बाय ३० सेंमी
चवळी — पुसा दो फसली, पुसा बरसती, पुसा कोमल — ८ किलो — सपाट वाफा ६० बाय ४५, ४५ बाय ३० सेंमी
गवार — पुसा नवबहार, पुसा सदाबहार — २.५ ते ३ किलो — सपाट वाफा ६० बाय ३० सेंमी
पालक — ऑलग्रीन, पुसा ज्योती, जोबनेर ग्रीन — १२ ते १६ किलो — सपाट वाफा बी पेरून २०-३० सेंमी ओळीत
काकडी — हिमांगी, शीतल, पुणे खिरा, फुले शुभांगी, फुले प्राची — १ किलो — सपाट वाफा, दंडाच्या बाजूस बी टोकून १ बाय १ मीटर
कारली — कोइमतूर लाँग, अर्का हरित, हिरकणी, कोकण तारा — १.५ ते २ किलो — सपाट वाफा, दंडाच्या बाजूस बी टोकून १ बाय १ मीटर
ढेमसे — अर्का टिंडा — १ ते १.५ किलो — सपाट वाफा, दंडाच्या बाजूस बी टोकून १ बाय १ मीटर
दुधी भोपळा — सम्राट, पुसा मेघदूत, पुसा नवीन, अर्का बहार — १ ते २ किलो — दांडाच्या काठाने लहान आळे करून त्यात बी टोकून लावावे. ३ बाय १.५ मीटर
कोहळा (लाल भोपळा) — अर्का सूर्यमुखी, अर्का चंदन — २ ते २.५ किलो — दांडाच्या काठाने लहान आळे करून २.५ ते ३ बाय २ ते २.५ मीटर
चोपडा दोडका — पुसा चिकणी, पुसा सुप्रिया — १ ते १.५ किलो — दांडाच्या काठाने लहान आळ्यात बी टोकून १.५ बाय १ मीटर
शिरी दोडका — पुसा नसदार, कोकण हरित, फुले सुचिता — १.५ ते २ किलो — दांडाच्या काठाने लहान आळ्यात बी टोकून १.५ ते २ मीटर बाय १ ते १.५ मीटर
गजानन तुपकर, ८२७५४१२०६४
(विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)