कृषी महाराष्ट्र

Market Update : दोन दिवसांपासून कापूस दरात सुधारणा ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Market Update : दोन दिवसांपासून कापूस दरात सुधारणा ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

 

१) सोयाबीनच्या दरात चढ- उतार सुरु

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ- उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १४.०६ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. तर सोयापेंड ४१० डाॅलरवर होते. देशात आज काही बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा झाली. सोयाबीनला आज सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार १०० रुपये क्विंटल भाव मिळाला. खाद्यतेल दरातील सुधारणा आणि अमेरिकेतील कापसाची स्थिती यामुळे सोयाबीनला आधार मिळत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

२) निर्यातीसाठी जिऱ्याला मोठी मागणी

जिऱ्याची बाजारातील आवक कमी झाली आहे. त्यातच निर्यातीसाठी जिऱ्याला मोठी मागणी आहे. परिणामी जिऱ्याचे भाव तेजीत आहेत. वायद्यांमध्ये जिऱ्याचे भाव मागील ११ वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. वायद्यांनी ६२ हजार रुपयांचा टप्पा गाठला. तर बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला सरासरी ५४ हजार ते ५६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. जिऱ्याचे भाव नव्या हंगामापर्यंत तेजीतच राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

३) टोमॅटोच्या भावातील तेजी टिकून

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर चढे आहेत. त्याता आता पावसामुळे टोमॅटो पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील तेजी टिकून आहे. आजही टोमॅटोला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ते ८ हजार रुपये भाव मिळाला. चांगल्या क्वालिटीच्या मालाचे दर जास्त आहेत. बाजारातील आणखी काही दिवस टोमॅटोची आवक मर्यादीत राहू शकते. आवक वाढेपर्यंत दरातील तेजी टिकून राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

४) बाजारात भाजीपाल्याची आवक कमी

सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे भाव वाढलेत. ढोबळी मिरचीची आवकही कमी असून मागणी मात्र चांगली आहे. त्यामुळे ढोबळी मिरचीच्या दरात सुधारणा झाली. ढोबळी मिरचीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपये भाव मिळत आहे. नवा माल येईपर्यंत बाजारातील आवक कमी राहील. त्यामुळे ढोबळी मिरचीचे भाव कायम राहण्याचा अंदाज आहे, असे जाणकारांनी सांगितले.

५) कापसाचे भाव क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांनी वाढले

मागील काही दिवसांपासून उद्योगांमध्ये मंदीचे वातावरण होते. पण पुढील काळ आता सणांचा आहे. त्यामुळे कापड आणि सुताला मागणी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण सणासुदीच्या काळात सुताला मागणी वाढेल, असा विश्वास सुतगिरण्यांना आहे. त्यामुळे उत्तर भारतात खूप दिवसांनंतर सुताच्या दरात वाढ झाली.

३० काऊंट कापूस धाग्याची किंमत २५७ ते २६७ रुपये प्रतिकिलो होती. तर २० ते २५ काऊंटचा धागा २४६ ते २५१ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. उत्तर भारतातील अनके बाजारांमध्ये ही सुधारणा दिसून आली. देशाच्या इतर भागातही सुताचे भाव वाढू शकतात, असा अंदाज आहे. यामुळे कापसाच्या भावालाही आधार मिळाला. त्यातच बाजारातील कापूस आवकही कमी झाली.

जूनच्या शेवटी पाऊस वाढल्यानंतर अनेक भागातील शेतकऱ्यांनी कापूस विकला. त्यामुळे सध्या आवक कमी आहे. त्याचाही परिणाम दरावर झालाय. देशात दोन दिवसांमध्ये कापसाचे भाव क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. यापुढील काळात कापसाची आवक आणखी कमी होईल. त्यामुळे दरवाढीसाठी पोषक स्थिती आहे. पण दरात चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source : agrowon

Market Update

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top