मका लागवड संपूर्ण माहिती तंत्रज्ञान – Maize Planting
मका लागवड
मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे.पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1928 किलो प्रती हेक्टर व उत्पादन 13.65 लक्ष टन आहे.
लागवडीसाठी जमीन कशी असावी
तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात या पिकांनंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरीता होतो.
हवामान
1. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे.
2. समुद्र सपाटीपासून ते २७०० मीटर उंचीच्या ठिकाणी देखील मका लागवड करता येते.
3. परंतू पीक वाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्या समानवत नाही4. मका उगवणीसाठी १८ डिग्री सेल्सियस तापमान योग्य असून, त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसर पणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन पीकाच्या उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो.
5. मका पिकाची योग्य वाढीसाठी २५ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान चांगले असते परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ डिग्री सेल्सियस) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो.6. ३५ डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान असल्यास पीक उत्पादनात घट येते. परागीभावानाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आद्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते.
जमीन
1. मक्यासाठी मध्यम तेभारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन चांगली.
2. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते.
3. परंतु अधिक आम्ल ( सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त ( ८.५पेक्षा अधिक सामू) जमिनीत मका घेऊ नये.
4. तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी.
5. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
पूर्वमशागत
1. जमिनीची खोल ( १५ते२०सें. मी.) नांगरट करावी. पिकाची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाइल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो.
2. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
3. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी १० ते १२ टन (२५ ते३० गाडया) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.
सुधारित वाण :
1. सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते.
2. मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात.
3. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी.
पेरणीची वेळ
1. मका हे खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतलेजाते.
2. खरिप हंगाम : जून ते जुलै २ रा आठवडा खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही.
3. रब्बी हंगाम : १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर
4. उन्हाळी हंगाम : जानेवारी ते फेब्रुवारी २ रा आठवडा
5. धान्य पीकासाठी १५-२० किलो बियाणे प्रती हेक्टरी
6. चारा पीकासाठी 75 किलो बियाणे प्रती हेक्टरी
पेरणीची पद्धत
1. टोकण पद्धतीने पेरणी करावी.
2. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेऊन पेरणी करावी.
3. उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर टोकण करावी.
4. लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी.
5. रब्बी हंगामात मक्याची पेरणी ६० सें. मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एका बाजूला २० सें. मी. अंतरावर २ बिया ४-५ सें. मी. खोल टोकण करून करावी.
6. एक हेक्टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते.
7. अश्याप्रकारे काढणीच्या वेळी प्रति हेक्टरी ९०,००० रोप संख्या मिळते व परिणामी अधिक उत्पन्न मिळते.
आंतरपीक पद्धती
1. खरिप हंगामात मक्याच्या दोन ओळीत असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये उडीद, मुग, चवळी आणि तेलबिया (भुईमुग, सोयाबीन) हि आंतरपिके यशस्वीरित्या घेता येतात.
2. आंतरपीक पद्धतीत ६ : ३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे.
3. मक्यात भुईमुग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते.
4. रब्बी हंगामात मक्यामध्ये करडई, कोथिंबीर आणि मेथी हि आंतरपिके भाजीपाल्यासाठी घेणे फायदेशीर आहे.
5. मक्याची लवकर येणारा वाण ऊस व हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून घेता येते परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येते. त्यासाठी मुख्य पिकास व अंतर पिकास शिफारशीत खतमात्रा देणे गरजेचे आहे.
6. मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात.
बीजप्रक्रीया
1. पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे, म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते.
2. तसेच अझोटोबक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम किंवा 100 मिली प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.
खते
1. तूर पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 75 किलो नत्र व 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश द्यावे.
2. पेरणीनंतर एक महिन्याने 75 किलो नत्र द्यावे.
3. जस्ताची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलोग्रॅम झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे.
आंतरमशागत
अ) पक्षी राखण :
1. खरिप हंगामात पेरणीनंतर उगवण ५-६ दिवसात तर रब्बी हंगामात ८ ते १० दिवसात होते.
2. पीक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसापर्यंत पक्ष्यापासून राखण करणे अत्यंत महत्वाचे आहे.
3. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अश्यावेळी देखील पक्षी राखण आवश्यक असते.
ब) नांग्या भरणे/ विरळणी करणे :
मका उगवणीनंतर ८-१० दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.
क) पिकात ज्यादा पाणी किंवा दलदल नसावी :
मक्याची रोपावस्था ज्यादा पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस खूपच संवेदनशील आहे म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.ड) तणनियंत्रण / भर देणे:
1. तण नियंत्रणासाठी अट्राटाप ५० टक्के हेक्टरी २ ते २.५ किलो पेरणी संपताच ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे
2. तसेच तणांच्या प्रादुर्भावानुसार मका वाढीच्या सुरवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून ताटाना आधारासाठी माती चढवावी. गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात.
सिंचन:
1. मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे.
2. खरिप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात मका पिक जिरायती खाली घेता येते
3. मका पीक पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरिप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे.
4. पाण्याची एकूण गरज ४०-४५(सें. मी.) व पाण्याच्या एकूण ४ पाळ्या
महत्वाच्या अवस्था
मका पिकाच्या महत्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे.
1. रोप अवस्था (२५-३० दिवसांनी),
2. पिक वाढीची अवस्था – हा काळ साधारणपणे पीकाचे उगवणीनंतर ३०-४५ दिवसाचा असतो.वाणाच्या गुणधर्मानूसार मक्यास साधारणपणे १५-२० पाने येतात ही क्रिया झाडावरतूरा येईपर्यंत सुरू राहते.
3. तुरा बाहेर पडताना (४५-५० दिवसांनी) – तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया साधारणत: १५ दिवसापर्यंत सुरू राहते.
4. फुलोऱ्यात असताना (६०-६५ दिवसांनी) – कणसे उमलण्याचा कालावधी:- मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर २-३ दिवसात झाडाच्या एकूण पानापैकी मधल्या प्रथम पानातुन कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसर बाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे ५० ते ७० दिवस पर्यतचा असतो.
5. दुधाळ अवस्था :- हा काळ साधारणतः ४ ते ५ आठवड्याचा असतो.
6. दाणे भरणेचेवेळी (७५-८० दिवसांनी). दाणे पक्व होण्याचा काळ :- दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता १५ ते २० दिवसलागतात.
रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १०-१२ दिवसाच्या अंतराने, तर उन्हाळी हंगामात ८-१० दिवसाच्या अंतराने पाणी दयावे.
किड नियंत्रण
1. खोडकिड :
अ) शास्त्रीय नाव : कायलो पार्टेलस
ब) किडीची वैशिष्ठे :
i. अळीच्या पाठीवर काळ्या ठिपक्यांचे पट्टे.
ii. डोक्यावर गडद तपकिरी रंग.
iii. पानावर समान रेषेत छिद्रे.
iv. पोंगा पूर्ण वाळतो.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : रोपावस्था
ड) भौतिक नियंत्रण :
i. वाळलेल्या सुरळ्या अळ्या सहित उपटून जाळून टाकाव्यात.
ii. शेत स्वच्छ ठेवावे.
iii. प्रकाश सापळा वापरावा
इ) रासायनिक नियंत्रण :
i. कार्बारील ८५% डब्ल्यूपी १७६४ ग्रॅम/हेक्टरी ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारावे.
ii. किंवा फोरेट १० जी. १० ते १२ किग्रॅ/हेक्टरी प्रमाणे जमिनीत मिसळावे.
iii. किंवा डायामिथोयेट ३० ईसी. १.२ मिली. १ पाण्यातून फवारावे.
ई) जैविक कीड नियंत्रण :
i. ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.
ii. निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे.
2. गुलाबी अळी :
अ) शास्त्रीय नाव : सेसामिया.कहबनु.४च इंफेरंस
ब) किडीची वैशिष्ठे :
i. अळी गुलाबी रंगाची असते.
ii. डोके फिकट तपकिरी रंगाचे.
iii. पानावर लांब निमुळते छिद्र पडते.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : सर्व अवस्था
ड) भौतिक नियंत्रण :
i. पूर्ण वाळलेली सुरळी उपटून नष्ट करावी.
ii. शेत स्वच्छ ठेवावे.
iii. प्रकाश सापळा
इ) जैविक कीड नियंत्रण : ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.
3. कणसे पोखरणारी अळी :
अ) शास्त्रीय नाव : हेलीकोव्हरपा आर्मिजेरा
ब) किडीची वैशिष्ठे : सुरवातीला कणसाचे स्त्रीकेसर खाते. त्यानंतर कणसाच्या आत शिरून दाणे खाते.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था : केशर अवस्था
i. एक मादी सुमारे ३५० अंडी किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते.
ii. अंड्यातुन ४-५ दिवसात अळ्या बाहेर येतात.
iii. अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये १५ ते ३५ दिवसात होते.
ई) जैविक कीड नियंत्रण :
i. ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले ८ कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.
ii. निंबोळी अर्क ५% उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारावे.
4. मावा :
अ) शास्त्रीय नाव : ओपोलोसिफम मेडिस
ब) किडीची वैशिष्ठे : लहान माव्याच्या असंख्य किडी पानावर आढळून येतात.पानावर चिकट सतरावा आढळतो.
क) किडीस बळी पडणारी पिकाची अवस्था :
ड) भौतिक नियंत्रण :
इ) रासायनिक नियंत्रण :
ई) जैविक कीड नियंत्रण : क्रायसोपा कार्निया परोपजीवीचे ५००० अंडी प्रती हेक्टरी सोडावेत.
5. अमेरीकन लष्करी अळी :
अ) उगम व प्रसार :
i. अमरीकन लष्करी अळी (Spodoptera frugiperda) ही मूळ अमरिकेतील कीड आहे.
ii. अमरीकेच्या उष्ण व समशितोष्ण कटिबधात ही कीड आढळते.
iii. या किडीची अळी मका, भात, ज्वारी, ऊस, भाजीपाला व कपाशी सारखी 80 पेक्षा जास्त पिकावर प्रादुर्भाव आढळुन येतो.
iv. सन 2016 मध्य या किडीचा अफ्रीका खंडात सर्वप्रथम प्रादुर्भावदिसून आला.
v.जानेवारी 2018 पर्यंत ही कीड सर्व साधारणपणे संपुर्ण आफ्रीका खंडात परसली होती. तसेच नजीकच्या इजिप्त व लिबीया या खंडातही कीड आढळून आली.
vi. सन 2018 मध्य ही किड भारत व श्रीलंकेत आढळून आली आहे.
ब) किडीची ओळख व प्रादुर्भावाची लक्षणे किडीच्या चार अवस्था आहेत :
i. अंडी (2 ते 3 दिवस)
ii. अळी (12 ते 20 दिवस) : (सहा अवस्था)
iii. कोष (12 ते 14 दिवस)
iv. पतंग (14 ते 21 दिवस)
किडीच्या वाढीचा कालावधी हवामान व इतर घटकांवर अवलंबून आहे.
1. पहिली अवस्था : अंडी
i. अंडी (2 ते 3 दिवस)
ii. अंडीसमुहात पानावर किंवा खोडावर सुद्धा घातलीजातात,
iii. परंतू सर्वसाधारणपणे पानाच्या खालच्या बाजुने खोडाजवळ घातली जातात.
iv. त्यावर पतंगाच्या पांढ-या केसांचा थर दिला जातो.
2. दुसरी अवस्था : अळी
i. अळी(12 ते 20 दिवस) – (सहा अवस्था),
ii. पहिल्या अवस्थेतील अळी पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते. त्यामुळे पानांवर पारदर्शक / पांढरा पॅच दिसतो त्यास विंडो (खिडकी) असे म्हणतात.
iii. प्रथम अवस्थेतील अळी पानाच्या खाली चिकट धाग्याच्या सहाय्याने लोंबकळते व वा-याने उडून नजीकच्या झाडावर पोहचते.त्यास Ballooning असे म्हणतात.
iv. अळीच्या डोक्यावर उलटा Y आकाराचे चिन्ह दिसते व शेपटाकडील शेवटून दुस-या भागावर काळ ठिपके समान अंतरावर (चौरसासारखे) दिसतात.
v. उर्वरीत शरिरावरील ठिपके अनुक्रमे दोन जवळ व नंतरचे दोन दुर असे असतात.
vi. अळी कोवळी पाने पोंग्यात शिरून खाते. त्यामुळ पाने कुरतडल्या सारखी दिसतात.अळीची विष्ठा पोंग्यात मोठ्या प्रमाणात दिसून यत. वाळलेली विष्ठा लाकडाच्या भुश्यासारखी दिसते.
vii. पिकाच्या वाढीच्या नंतरच्या कालावधीत अळी कणसाभोवतीची कोवळी पाने खाते व त्यानंतर कोवळे दाणेखाते.
3. तिसरी अवस्था : कोष
i.कोष (12 ते 14 दिवस)
ii. सहाव्या अवस्थेतील अळी त्यानंतर पीकावरून जमीनीवर पडते व जमीनीखाली कोषात जाते.
iii. जमीन घट्ट असेल तर जमीनीवर पीकांचे अवशेष लपेटून तेथेच कोषात जाते.
iv. कणसातील अळी कणसातच कोषात जाऊ शकते.
v. जमीनीतील अळी कोषा भोवती मातीचा थर लपेटून घेते.
vi. कोष सर्वसाधारणपणे 15 मिमी लांबीचा असतो व मातीच्या आवरणासहीत 20 ते 25 मिमी लांबीचा असतो.
4. चौथी अवस्था : पतंग
i. पतंग (14 ते 21 दिवस)
ii. पतंग रात्री सक्रीय असतात व दिवसा लपून बसतात. दिवसा पीकाच्या पानांच्या मध्ये पतंग लपून बसलेले असू शकतात.
iii. पतंग एका रात्रीत 100 किमी पर्यत उडत जाऊ शकतो.
iv. मादी पुंजक्यात अंडी घालते एका पुंजक्यात 100 ते 200 अंडी असू शकतात.
v. मादी पतंग 6 ते 10 पुंजक्यात अंडी घालते.
vi. एक मादी 2 ते 3 आठवड्यात सर्वसाधारणपणे 1500 ते 2000 अंडी घालते.
एकात्मिक किड नियंत्रण
1. पिक पद्धती :
अ) आंतरपीक : किडीला सलग मका पिकावर अंडी घालावयास आवडते. किडीस बळी न पडणा-या आंतरपिकाचा वापर केल्यास उपद्रव टाळता येऊ शकतो.
ब) फेरपालट : एकाच शेतावर सलग हंगामात किडीला बळी पडणारी पिक घेणे टाळावे. मका पिक सलग (खरीप- रबी-उन्हाळी) हंगामात घेणे टाळावे. एकदल व द्विदल पीकाची फेरपालट करावी.
2. मशागत :
अ) खोल नांगरणी
i. कीड जमीनी खाली 2 ते8 सेमी खोल कोषावस्थत जाते.
ii. हा कोष नांगरीने जमीनीवर आल्यास परभक्षी किटक व पक्षी कीडीचे कोष खाऊ टाकतात. त्यामुळे कीड नष्ट होते.
ब) पिकाचे अवशेष नष्ट करणे :
i. ज्या ठिकाणी जमीन घट्ट असेल व कीड जमीनीत शिरू शकत नाही तेव्हा अळी जमीनीवर पिकाचे अवशेष (पान) स्वत:भोवती गुंडाळून कोषावस्थत जाते.
ii. तसेच कणासातील अळी कणसातच कोषावस्थत जाते. त्यामुळे काढणीनंतर लगेच पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
3. पेरणी :
अ) पेरणीची वेळ :
i. एकाच क्षेत्रावर वेगवेगळ्या वेळी पेरणी केल्यास कीडीला सलग कोवळी पिक मिळते त्यामुळे उपद्रव वाढतो.
ii. एकाच क्षेत्रावर (गावात) ऐकाच वेळी पेरणी केल्यास कीडीचा उपद्रव कमी होतो.
iii. तसेच उशिराने पेरणी केल्यास कीडीचा उपद्रव जास्त होण्याची शक्यता असते.
iv. त्यामुळे उशिराने पेरणी करू नये तसेच एका गावात शक्यतो एकाच वेळी पेरणी करावी.
ब) बीज प्रक्रीया :
i. उगवणीनंतर लगेच किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.
ii. हे नुकसान कीडनाशकाची व बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया केल्यास टाळता येऊ शकते.
iii. त्यामुळे बियाण्यास किटकनाशकाची व बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया करूनच पेरणी करावी.
4. किडीचे नियंत्रण : किडीचा प्रादुर्भाव वेळेत रोखा व किडीचा प्रसार थांबवा
i. वनस्पतीजन्य कीडनाशके-निंबोळी अर्क
ii. अंडी व अळ्या वेचून नष्ट करा .
iii. पक्षी थांबे : पक्षी कीडीच्या अळ्या व कोष खातात. पक्ष्यासाठी पिकात पक्षी थांबे उभे करा.
iv. परभक्षी कीटक : उदा. Earwigs, Ladybird beetles, Ground beetles, Ants, Birds and bats
v. परोपजीवी कीटक Telenomusremus, Chelonus insularis, Cotesiamarginiventris, Trichogramma (T. pretiosum and T. atopovirilia), Archytas, Winthemia and Lespesia
vi. जैविक कीडनाशक
• विषाणू (Viruses) : Nuclear Polyhedrosis Virus (NPVs) such as the Spodoptera Frugi perda Multicapsid Nucleopolyhedrovirus (SEMNPV)
• बुरशी (Fungi) : Metarhizium anisopliae, Metarhiziumrileyi, Beauveriabassiana
• जिवाणू (Bacteria) : Bacillus thuringiensis (Bt)
• Nematodes
• Protozoa
vii .कामगंध सापळा
• किडीच्या पूर्वसचनेसाठी एकरी एका कामगध सापळ्याचा वापर करा.
• सापळ्यात अमेरीकन लष्करी अळीसाठीच्या कामगंध ल्युरचाच (गोळी) वापर करा.
• सापळ्यात अडकलेले पतंग नष्ट करा व सापळा स्वच्छ ठेवा.
• विहीत कालावधीनंतर सापळ्यातील ल्युर (गोळी) बदला.
viii. रासायनीक कीडनाशक :
कीड आर्थीक नुकसान पातळीवर पोहचल्यानंतर शिफारशीनुसार रासायनीक किडनाशकांची फवारणी करावी.
रोग नियंत्रण
1. फुलोऱ्यापूर्वीचा खोड कुजव्या रोग :
अ) कारणीभूत जीव : पिथीयम अफॅनीडरमॅटम | इर्विनिया क्रीसांथेम.
ब) अनुकूल हवामान : अधिक उष्णता व अधिक आद्रता युक्त हवामान.
क) लक्षणे :
i. पिथीयम खोडकुजव्या रोगामध्ये लागण झालेला खोडाचा भाग तपकिरी रंगाचा, आकसलेला, मऊ झाल्याचे दिसून येते.
ii. तसेच जमीन व पहिल्या पेराच्या ठिकाणी पीळ बसून झाड कोलमडते.
iii. याविरुद्ध, जीवाणूजन्य खोडकुजव्या रोगामध्ये रोगाची लागण झाडाच्या कोणत्याही पेरात होऊन त्या ठीकाणचा रंग गडद तपकिरी होतो. तसेच पानाचा देठ व खोडयांवर चिरा दिसून येतात व तद्ननंतर झाड ताबडतोब खाली पडून शेतामध्ये विखुरलेले आढळते.
iv. रोगग्रस्त खोड मधून उभे चिरले असता आतमध्ये रंगहीन तसेच पेराच्या ठिकाणी मऊ झाल्याचे निदर्शनास येईल. तसेच मऊ पडलेल्या उतींमधून दुर्गंधी येते.
v. तसेच रोगग्रस्त झाडाचा शेंडा झाडापासून सहज वेगळा करता येतो.
ड) रोगाची लागण न होणेसाठी घ्यावयाची काळजी : उत्तम निचऱ्याची जमीन मका लागवडीसाठी निवडावी, पेरणी योग्य वेळत करावी व प्रती हेक्टरी झाडांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी.
इ) उपाय :
रोगाची लक्षणे दिसून येताच ७५% कॅप्टन १२ ग्रॅम प्रती१००लिटर पाणी प्रमाणात जमिनीतून दिल्यास पिथीयम खोडकुजव्या रोगाचे नियंत्रण करणे शक्य होते.
2. फुलोन्यानंतरचा खोड कुजव्या रोग :
अ) कारणीभूत जीव : फ्युजारियममोनिलीफॉर्म। मॅक्रोफोमिन्काऊजिओलिना
ब) लक्षणे :
i. पिक फुलोऱ्यात येताना या रोगाची लागण होते.
ii. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मूळ, शेंडा आणि खालील पेरे यांच्यावर होतो.
iii. खोदाचा उभा छेद घेतल्यास आतील भाग गुलाबी-जांभळा किंवा काळ्या रंगाचा झाल्याचे दिसून येईल.
क) रोगाची लागण न होणेसाठी घ्यावयाची काळजी:
i. पिक फुलोऱ्यात असताना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
ii. नत्र, स्फुरद व पालाश यांचा शिफारशीत योग्य वापर करावा .
iii. पिकांची फेरपालट करावी.
ड) उपाय :
रोगाची लक्षणे दिसून येताच १० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी १ किलो शेणखत या प्रमाणात मिसळून मिश्रण १० दिवसांनी सरी-वरंब्या मध्ये टाकावे.
3. टर्सिकम पर्ण करपा :
अ) कारणीभूत जीव : एक्सेरोहिलम टर्सिकम
ब) अनुकूल हवामान : थंड व अधिक आद्रतायुक्त हवामान.
क) लक्षणे :
i. पानांवर लांब अंडाकृती, करड्या-हिरव्या रंगाच्या २.५ ते १५ सेमी. चिरा दिसून येतात
ii. सुरवातीस याचा प्रादुर्भाव झाडाच्या खालील पानांवर दिसून येतो व नंतर वरपर्यंत पसरत जातो.
ड) उपाय : रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात ८-१० दिवसांच्या अंतराने फवारावे.
4. मेडिस पर्ण करपा :
अ) कारणीभूत जीव : ड्रेस्क्लेरा मेडिस
ब) अनुकूल हवामान : उष्ण दमट, थंड हवामान.
क) लक्षणे : पानांच्या शिरांमध्ये लांबट तपकिरी किंवा गडद लालसर-तपकिरी रंगाच्या चिरा दिसून येतात.
ड) उपाय: रोगाची लक्षणे दिसून येताच आवश्यकतेनुसार मॅन्कोझेब | झायनेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
काढणी, मळणी व साठवणूक
i. धान्यासाठी मका पिकाची काढणी कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर करावी.
ii. त्यासाठी ताटे न कापता प्रथम कणसे सोलून खुडून घ्यावीत आणि सोललेली कणसे दोन तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत.
iii. त्यानंतर कणसातील दाणे काढण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर करावा.
iv.सोलणी यंत्राने दाणे काढल्यानंतर मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्के इतके होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होत नाही.
v. मका काढणी पीक पूर्ण पक्व होण्यापूर्वी म्हणजे दाण्यात २५-३० टक्के पर्यंत ओलाव्याचे प्रमाण( फिजिओलोजिकल मच्यूरिटी) असताना करता येते.
vi. अशी काढणीची अवस्था पीक पूर्ण पक्व होण्याच्या १०-१५ दिवस अगोदर येते.
vii.अशी काढणी केल्यामुळे उत्पन्नात घट येत नाही मात्र कणसे चांगली वाळवावी लागतात. तसेच अश्या प्रकारच्या काढणीमुळे हिरवी ताटे जनावरांना खाण्यास वापरता येतात.
उत्पादन
सर्वसाधारणपणे संमिश्रवाणांपासून हेक्टरी ५० क्विटल व संकरीत वाणांपासून हेक्टरी ९५- ते १०० क्विटल उत्पादन मिळते.
मका लागवड मका लागवड मका लागवड मका लागवड मका लागवड मका लागवड मका लागवड मका लागवड मका लागवड मका लागवड
source : agrowone.in