कृषी महाराष्ट्र

द्राक्ष खरडछाटणी काळातील खत व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

द्राक्ष खरडछाटणी काळातील खत व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

खत व्यवस्थापन

Grape Production : सध्या फळकाढणी संपून बऱ्याच बागेत खरडछाटणीची सुरू झाली असावी. या वेळी प्रत्येक ठिकाणी वातावरणामध्ये काही बदल दिसून येत आहेत. काही ठिकाणी पाऊस किंवा त्याचे अंदाज आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त टिकून तापमानात घट होते आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढते.

ही परिस्थिती काही दिवसांपर्यंत आढळून येते. या बदलत्या वातावरणामुळे फळकाढणीपर्यंतच्या बागेत फायदा होईल. मात्र फळकाढणीनंतर चांगल्या प्रतीच्या द्राक्ष उत्पादनासाठी आपल्याला या खरडछाटणीपासूनच उपाययोजना करणे गरजेचे समजले पाहिजे.

चांगल्या द्राक्ष उत्पादनात खरडछाटणी हा एक पाया आहे. तो मजबूत होण्यासाठी आपल्याला बागेतील सद्यःस्थिती समजून योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे असेल.

माती आणि पाणी परीक्षण महत्त्वाचे

खरडछाटणीच्या पंधरा दिवस आधी माती आणि पाणी परीक्षण करून घ्यावे. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण दोन वेलीच्या मध्ये जी चारी घेतो, त्यात अन्नद्रव्ये किती वापरावीत, हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडत असतो. त्यातच दरवर्षी वाढत चाललेल्या खतांच्या किमतीमुळे एकूण उत्पादनखर्चात वाढ होत आहे.

मात्र त्या तुलनेमध्ये द्राक्षाच्या किमतीमध्ये तितकी वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे खतांचा वापर अत्यंत काटेकोरपणे केल्यास खर्चात बचत साधू शकते. खतांची एक बॅग जास्त वापरण्यापेक्षा माती व परीक्षणाची किंमत नक्कीच स्वस्त पडेल. Grape Fertilizer Management

द्राक्ष लागवडीखाली असलेल्या बऱ्याच जमिनीमध्ये चुनखडीचे कमी- अधिक (३ ते २२ टक्क्यांपर्यंत) प्रमाण दिसून येते. त्याच प्रमाणे बहुतांश बागांमध्ये सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये विहीर किंवा बोअरवेल हेच पाण्याचे महत्त्वाचे स्रोत असल्याचे दिसून येते.

या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण अनेक वेळा शंभर पीपीएमपेक्षा जास्त दिसून येतात. अशा स्थितीमध्ये जमिनीचे व्यवस्थापन करताना खालील काळजी घ्याव्यात.

-चुनखडी तीन टक्क्यांपर्यंत असल्यास, तर रूट स्टॉक तग धरून राहतो.

-चुनखडी तीन ते पाच टक्के असल्यास, २५ किलो सल्फर प्रति एकर प्रमाणात वापरावे.

-चुनखडी पाच ते आठ टक्के असल्यास, ५० किलो सल्फर प्रति एकर द्यावे.

-चुनखडी ८ ते १५ टक्के असल्यास, ८० ते १०० किलो सल्फर प्रति एकर द्यावे.

-चुनखडी १५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, १०० ते १२० किलो सल्फर प्रति एकर द्यावे.

-सल्फरचा वापर करतेवेळी चारीमध्ये शेणखतासोबत चांगले मिसळून टाकले पाहिजे. असे केल्यामुळे चुनखडीच्या उदासिनीकरणाला (न्युट्रलायझेशन) मदत होईल. त्यासोबत जमिनीचा सामूही कमी होईल.

-जर माती जमिनीमध्ये १०० पीपीएमपेक्षा अधिक सोडिअम असल्यास त्याचे प्रमाण कमी करणे गरजेचे असेल. त्यासाठी जिप्सम १५० किलो प्रति एकर प्रमाणे खरडछाटणीच्या १५ ते २० दिवस आधी जमिनीत व्यवस्थित मिसळून घ्यावे.

-सोडिअम आणि चुनखडी असलेल्या जमिनी आणि सिंचनाच्या पाण्यातही क्षार असलेल्या ठिकाणी जमिनीचा सामू ७.४ पेक्षा अधिक असेल. काही ठिकाणी तर ८.५ पर्यंतही दिसून येईल. अशा प्रकारच्या जमिनीत खतांचा वापर फारच महत्त्वाचा असेल.

या परिस्थितीत खतांचा वापर करताना आम्लता निर्माण करण्याची क्षमता असलेली खते वापरावीत. यामुळे जमिनीचा सामू काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. नत्रयुक्त खतांमध्ये यावेळी अमोनिअम सल्फेटचा वापर करता येईल.

छाटणी करण्यापूर्वी चारीमध्ये वापरण्यात येणाऱ्या खतांमध्ये विद्राव्य खतांचा वापर टाळावा. विद्राव्य खतांचा वापर डोळे फुटल्यानंतर (तीन पाने आल्यानंतर) ठिबकद्वारे करता येईल.

जास्त तापमान असलेल्या परिस्थितीत (४० अंश सेल्सिअसपर्यंत) जमिनीत वाफसा राहील, अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन करावे. एक मि.लि. बाष्पीभवनाकरिता ४२०० लिटर पाणी प्रति हेक्टर अशी वेलीची गरज असेल. असा विचार करता एप्रिल महिन्यामध्ये

साधारणपणे ४० अंशांपेक्षा तापमान गेल्यास जवळपास १० मि.लि. बाष्पीभवन होते, त्या वेळी १८ हजार लिटर पाणी प्रति एकर प्रमाणे द्यावे. हलकी जमीन असलेल्या स्थितीमध्ये शेणखताचा वापर चारीमध्ये जास्त प्रमाणात करणे गरजेचे समजावे.

सुमारे १० टन शेणखत प्रति एकर प्रमाणे द्यावे. यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढेल. बोदामध्ये उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून वेलींची प्रतिकारक्षमताही वाढते. परिणामी, संभाव्य रोग नियंत्रणही सोपे होईल.

ठिबकनळ्यांचा वापर करतेवेळी कमी क्षमतेचे ड्रीपर (चार लिटर प्रति तास) फायद्याचे राहतील. अशा क्षमतेने जास्त काळ पाण्याचा वापर केल्यास वेलींच्या मुळांच्या कक्षेत जास्त वेळ पाणी उपलब्ध राहील.

भारी जमिनीत ड्रीपरच्या क्षमतेवर फारसा परिणाम होत नसला तरीही कमी क्षमतेचे ड्रीपर तिथेही फायद्याचे राहू शकतात.

स्फुरदचा वापर सिंगल सुपर फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये करणार असल्यास खरडछाटणीच्या पूर्वी १५ दिवस आधी चारीमध्ये शेणखतासोबत मिसळून करावा. विद्राव्य खतांच्या स्वरूपात उपलब्ध स्फुरद चारीमध्ये वापरणे टाळावे. त्याचा वापर डोळे फुटल्यानंतरच करता येईल. Grape Fertilizer Management

२) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही डोळे फुटल्यानंतरच करावा. खरडछाटणीच्या साधारणतः १५ दिवसांनंतर डोळे फुटण्यास सुरुवात होते. त्यानंतर तीन ते पाच पानांच्या अवस्थेपासून सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वेलीला करावी.

फुटीचे पान जसजसे वाढते, तसतसे अन्नद्रव्ये उचलण्याची वेलीची क्षमता वाढते. सोर्स सिंक संबंध या वेळी प्रस्थापित होतो. तेव्हा फुटीच्या या अवस्थेत सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक सल्फेट १० किलो, फेरस सल्फेट १० किलो, बोरॉन एक किलो प्रति एकरप्रमाणे बोदामध्ये मिसळून घ्यावे.

यासोबत मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो प्रति एकर या प्रमाणे वापर करता येईल. बऱ्याचशा बागेत सबकेनकरिता शेंडा पिंचिंग झाल्यानंतर निघालेली बगलफूट पिवळसर व अशक्त दिसून येते.

तेव्हा पहिला सबकेन झाल्यानंतर झिंक सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी, बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटर आणि फेरस सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्वतंत्र फवारण्या करून घ्याव्यात.

पानांमध्ये हरितद्रव्य वाढविण्याच्या दृष्टीने मॅग्नेशिअम सल्फेट २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. या वेळी तापमान कमी होऊन आर्द्रतेमध्ये थोडी वाढ झालेली दिसून येते. त्याचा फायदा पानांद्वारे अन्नद्रव्ये शोषण्यासाठी होईल.

दुसरी सबकेन झाल्यानंतर बागेत पुन्हा वेलीच्या वाढीवर काही अनिष्ट परिणाम दिसून येतील. या वेळी कॅल्शिअम क्लोराइड किंवा कॅल्शिअम नायट्रेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी.

या वेळी फुटीच्या वाढीचा जोम लक्षात घेऊन व तसेच पाण्यात नायट्रेटचे प्रमाण किती आहे, याचा अंदाज घेऊन जमिनीतून नत्राचा पुरवठा करावा. अमोनिअम सल्फेट ७० किलो प्रति एकर या प्रमाणे दोन दिवसाच्या अंतराने सात वेळा विभागून द्यावे.

जमिनीत चुनखडी व क्षार असलेल्या परिस्थितीत पालाश ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी. त्या सोबत ०-०-५० हे खत १५ किलो प्रति एकर या प्रमाणे दोन ते तीन वेळा विभागून जमिनीतून द्यावे. पालाशयुक्त खतांचा वापर मात्र वेलीच्या वाढीचा जोम लक्षात घेऊनच करावा.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top