Market Update : कांद्याची आवक कमी होऊनही दरात सुधारणा ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या
१) कांद्याच्या दरात १०० रुपयांपर्यंत सुधारणा
कापूस वायद्यांमध्ये आज चांगली सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आज दुपारपर्यंत ८४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदेही ५७ हजार ६४० रुपये प्रतिखंडीवर पोचले. वायद्यांमध्ये आज ३६० रुपयांची वाढ झाली होती. बाजार समित्यांमध्येही काही ठिकाणी १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. आज कापसाला प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. कापूस दरात आणखी काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीनला ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे आज जळपास एक टक्क्यांनी वाढून १४.१५ डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४१८ डाॅलरचा टप्पा पार केला. देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनला आजही ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा टिकून राहिल्यास देशातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) डाळींबाचे दर टिकून
राज्यातील अनेक बाजारांमध्ये डाळिंबाची आवक काहीशी वाढलेली दिसली. मात्र डाळिंबाला चांगला उठाव असल्याने दर टिकून आहेत. डाळिंबाला आज प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ९ हजार रुपये दर मिळाला. मोठ्या आकाराच्या गुणवत्तापूर्ण फळांना प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांपर्यंत भाव होता. बाजारातील डाळिंबाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) गाजराला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये भाव
गाजराला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. आज राज्यातील केवळ मुंबई, पुणे, नागपूर आणि अमरावती बाजारात गाजराची आवक काहीशी अधिक दिसते. पण आवक सरासरीपेक्षा कमीच होती. त्यामुळे गाजराला आज प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये भाव मिळला. गाजराचा हा बाजार पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच
देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. आज महाराष्ट्रातील आवक जास्त होती. त्यातही पिंपळगाव बसवंत बाजारातील आवक सर्वाधिक म्हणजेच ३३ हजार क्विंटल होती. त्यानंतर मध्य प्रदेशातील बाजारात आवक झाली. मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात आज सर्वाधिक ३६ हजार क्विंटलची आवक होती. देशातील बाजारात आज कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ३०० ते १ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला.
केरळ राज्यात आवक कमी असल्याने भावही सरासरी १ हजार ८०० रुपये होते. कांदा उत्पादन होत नसलेल्या इतर राज्यांमध्येही यादरम्यान भाव होता. पण महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यातील भाव कमीच होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मागील तीन दिवसांपासून कांदा उत्पादक पट्ट्यातील बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कांदा चाळीत पाणी शिरले. तर काही भागांमध्ये कांद्याला पाणी लागल्याचे शेतकरी सांगत आहे.
पावसाचा जोर वाढत असल्याने साठवणुकीची पक्की व्यवस्था नसलेले शेतकरी कांदा विकत आहेत. तरीही सध्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. बाजारातील कांदा आवक कमी होत असून दरात सुधारणा होत आहे. मागील महिनाभरात कांदा दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाली. पुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
source : agrowon