Market Update : टोमॅटोचे भाव वाढल्याने बाजारातील आवक वाढली ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या
१) बाजारात कापूस दरात आज सुधारणा
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात आज सुधारणा पाहायला मिळाली. आज सीबाॅटवर कापसाचे वायदे काहीसे वाढून ८२.९१ सेंट प्रतिपाऊंडवर गेले. तर देशातील वायदे १६० रुपयांनी सुधारले होते. वायद्यांनी दुपारपर्यंत ५६ हजार ९४० रुपयांचा टप्पा गाठला होता. बाजार समित्यांमध्येही काही ठिकाणी कापसाच्या भावात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ झाली होती. कापसाला आज ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या दरातील सुधारणा काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे वाढले
सोयाबीनच्या बाजारात आज संमिश्र स्थिती दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे वाढले होते. सोयाबीन वायद्यांमध्ये आज एक टक्का वाढ होऊन ते १३.८६ डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४१३ रुपयांचा पातळी गाठली. देशात मात्र सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरातील वाढ टिकून राहिल्यास देशातही भाव सुधारतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. Market Update
३) उडदाला काही दिवसांपासून टिकून
उडदाचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. सध्या उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. उडदाचे भाव तेजीत राहण्याची पुरवठ्यातील तूट कारणीभूत आहे. उडादाचा पुरवठा कमी आणि मागणी कायम असल्याने दरात तेजी आली आहे. उडदाच्या दरातील तेजी चालू हंगामातही कायम दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
४) ज्वारीला ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव
देशातील बाजारात ज्वारीची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरात वाढ झालेली आहे. बाजारातील ज्वारीची आवक सरासरीपेक्षा जवळपास ३० टक्क्यांनी कमी दिसते. तर मागणी वाढलेली आहे. त्यामुळे ज्वारीला व्हरायटीनुसार प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ज्वारीचेही दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. Market Update
५) टोमॅटोच्या दरातील नवनवीन उच्चांक
टोमॅटोच्या दरातील तेजी बाजारात नवनवीन उच्चांक गाठत आहे. टोमॅटोच्या भावात झालेली वाढ केवळ टिकूनच नाही तर दरात सतत वाढ दिसून येत आहे. टोमॅटोची आवक कमी असल्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सध्या बाजारात होणारी आवक सरासरीपेक्षा केवळ ३० टक्क्यांपर्यंत असल्याचं व्यापारी सांगतात. म्हणजेच टोमॅटोची आवक तब्बल ७० टक्क्यांनी कमी आहे. दुसरीकडे टोमॅटोची मागणी कायम आहे. टोमॅटोने देशातील बहुतांशी किरकोळ बाजारांमध्ये आता १५० रुपयांचा टप्पा पार केला. काही ठिकाणी तर २५० रुपयांनी टोमॅटो विकला गेला.
शेतकऱ्यांनाही सध्या चांगला भाव मिळत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोला सध्या प्रतिकिलो ५० रुपये ते ७० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारात टोमॅटोला प्रतिनुसार कमीजास्त भाव मिळत आहे. सध्या सुरु असेलेल्या पावसाचा परिणाम पिकाच्या गुणवत्तेवर होत आहे. चांगल्या गुणवत्तेच्या मालाला कमाल भाव मिळत आहे. सध्या टोमॅटो लागवडी वाढत असल्या तरी माल बाजारात येण्यास बरेच दिवस लागतील. तोपर्यंत बाजारातील टोमॅटो आवक कमीच राहून दरातील तेजीही कायम राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
source : agrowon