कृषी महाराष्ट्र

Market Update : तुरीच्या दरात पुन्हा वाढ ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Market Update : तुरीच्या दरात पुन्हा वाढ ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

 

१) सोयाबीन दरात नरमाई

देशातील बाजारात आज सोयाबीन दरात नरमाई आली होती. सोयाबीनचे भाव आज ५ हजारांपेक्षाही कमी झाले होते. आज सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतार सुरु आहेत. आज सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे एक टक्क्याने वाढले होते. देशातील सोयाबीन बाजारावर आणखी दिवस दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस बाजारात काहीसे चढ उतार

कापूस बाजारात सध्या काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापूस दरात आजही काही बाजारांमध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे. आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपये भाव मिळाला. कापसाची आवक आताही सरासरीपेक्षा जास्तच आहे. कापसाला मागील तीन महिन्यांपासून याच पातळीच्या दरम्यान दर आहेत. कापूस दर पुढील काही दिवस याच पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हळदीच्या दरातील तेजी

चालू हंगामात हळदीच्या लागवडीत सध्या घट दिसून आहे. तसेच बाजारातील हळदीची आवकही कमी आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरातील तेजी वाढली आहे. बाजार समित्यांमध्येही हळदीच्या भावाने आता १० हजारांचा टप्पा गाठला. सध्या बाजारात हळदीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये भाव मिळत आहे. हळदीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) भाजीपाल्याला काही दिवस तेजी

बाजारात सध्या सर्वच भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. वांगी दरातही सुधारणा झाल्याचे दिसत आहे. बाजारातील वांगी आवक कमी असून मागणी मात्र चांगली दिसत आहे. त्यामुळे वांग्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील वांगी आवक लगेच वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे वांगी भाव आणखी काही दिवस तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) तूरीच्या दरात वाढ

देशात तुरीचे भाव वाढलेले आहेत. आता सणांचा काळ सुरु होणार आहे. तूर डाळीचे भावही महागल्याने सरकार बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सणांच्या काळात तूर डाळीचे भाव वाढल्यास सरकार स्टाॅकमधील तूर मिलर्सना विकू शकते. सरकारने काही राज्यांमध्ये स्टाॅकमधील तूर विकण्यास सुरुवातही केली आहे. नाफेडने महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास ३ हजार टन तुरीची विक्री केली. तर कर्नाटकात नाफेडकडून १३ हजार टनांची विक्री झाली. गुजरातमध्येही १४ टन तूर विकण्यात आली. म्हणजेच नाफेडने आतापर्यंत १६ हजार टनांपेक्षा अधिक तुरीची विक्री केली. सरकारकडे सध्या तुरीचा सव्वा लाख टनांच्या दरम्यान स्टाॅक असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुढील महिन्यापासून आफ्रिकेतील बाजारात नवी तूर येईल. त्यानंतर भारतात आयात वाढू शकते. पण ही तूर कोणत्या भावात येईल, हे आताच सांगता येणार नाही. आफ्रिकेतील देशांमधून भारताला ५ ते ६ लाख टन तूर मिळते. त्यामुळे सणांच्या काळात तुरीचा पुरवठा वाढू शकतो. पण बाजारभाव देशातील पिकाची स्थिती कशी राहते यावर अवलंबून राहतील. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. हा भाव पुढील काही काळ कायम राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source : agrowon

Market Update

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top