Market Update : कापसाला साडेसहा ते ७ हजार ४०० रुपये दर ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या
१) कापसाला साडेसहा ते ७ हजार ४०० रुपये दर
आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी कापूस वायद्यांमध्ये नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे ८४.२४ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५८ हजार ८६० रुपयांवर बंद झाले. बाजार समित्यांमधील दरही अनेक बाजारात काहीसा कमी झाला होता. पण सरासरी दरपातळी टिकून होती. आजही कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळला. देशातील बाजारात कापूस दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. पण बाजारातील चढ उतारही कायम राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Market Update
२) सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आण सोयापेंडच्या वायद्यांमध्ये घट दिसून आली. सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे १३.८२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४०७ रुपयांचा टप्पा गाठला होता. सोयातेलाचे भाव मात्र ६२.३० सेंटवर कायम होते. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात मात्र काहीशी सुधारणा झाली. आज सोयाबीनची दरपातळी ४ हजार ६०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारातही आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे बदल दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
३) हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल साडे तीन हजार भाव
राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक अद्यापही कमीच आहे. राज्यातील बहुतांशी भाजीपाला उत्पादक भागांमध्ये मागील तीन आठवड्यांमध्ये चांगला पाऊस झाला. त्याचाही परिणाम मिरची आवकेवर झाला. तर दुसरीकडे मिरचीला उठाव चांगला आहे. यामुळे दरही तेजीत आहेत. हिरव्या मिरचीला सध्या प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. मिरचीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. Market Update
४) टोमॅटोची आवक कमीच
देशातील बाजारात टोमॅटोची आवक कमीच आहे. त्यातच पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसानही होत आहे. यामुळे बाजारातील आवकेवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला मागणी चांगली आहे. परिणामी टोमॅटोच्या भावाला चांगला आधार मिळाला. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोची आवक पुढील महिनाभर कमीच राहण्याचा अंदाज आहे. यामुळे टोमॅटोच्या दरातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
५) तुरीच्या दरातील तेजी कायम
देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. आजही बाजारातील आवक कमीच होती. बाजारातील आवक वाढीसाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. त्यात आयात मुक्त केली, स्टाॅक लिमिट लावले, स्वतात इतर डाळ विक्री सुरु केली. पण तुरीच्या बाजारावर याचा परिणाम होताना दिसत नाही. तुरीचे भाव गेल्या सहा महिन्यांपासून तेजीत आहेत. सरकारने यंदा तुरीची लागवड वाढावी यासाठीही प्रयत्न केले. सरकारने तुरीच्या हमीभावात वाढ केली, सरकारला हमीभावाने २५ टक्के तूर विक्रीची मर्यादा काढून टाकली. म्हणजेच शेतकरी सर्वच तूर सरकारला विकू शकतात. पण सरकारच्या या मनसुब्यावर पावसाने पाणी फेरले. देशातील तूर लागवड अजूनही १६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.
देशात आतापर्यंत ३१ लाख ५१ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली. यामुळे तुरीच्या बाजाराला आधार मिळाला. ऑगस्टपासून आफ्रिकेतील बाजारात तुरीची आवक सुरु होईल. त्यानंतर देशातही आयात होईल. म्हणजेच पुरवठा वाढेल. पण देशात लागवडीतील घट कायम राहील्यास तूर आयात सुरु झाली तरी बाजारावर फारसा परिणाम दिसेल असं वाटत नाही, असं जाणकारांनी सांगितलं. सध्या तुरीला सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
source : agrowon