कृषी महाराष्ट्र

Sugarcane Management : अतिवृष्टिबाधित ऊस पिकात कोणत्या उपाययोजना कराव्या ? वाचा सविस्तर

Sugarcane Management : अतिवृष्टिबाधित ऊस पिकात कोणत्या उपाययोजना कराव्या ? वाचा सविस्तर

 

Sugarcane Management : अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलेल्या उसाच्या शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावेत. पंपाच्या साह्याने पाणी शेताबाहेर काढावे. उसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. जेणेकरून हवा खेळती राहण्यास मदत होईल.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या हंगामात दरवर्षी साधारणतः ८ ते १० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. मागील ३ ते ४ वर्षांत, वातावरणात होणाऱ्या अचानक बदलांचा परिणाम विविध पिकांसह ऊस लागवडीवर देखील दिसून येतो आहे. मागील काही वर्षांत जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे प्रमुख ऊस उत्पादक जिल्ह्यांतील उसाखालील शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्यामुळे ऊस पिकामध्ये विविध समस्या निर्माण होऊन मोठे नुकसान होते. अशा स्थितीमध्ये पूरग्रस्त भागातील ऊस पिकामध्ये संभाव्य उपाययोजना करून नुकसान टाळता येईल.

पूरग्रस्त परिस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान :

– जमिनीतील ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊन पाने पिवळी पडतात व वाढ खुंटते.
– मुळांची कार्यक्षमता घटल्याने पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण योग्यप्रकारे होत नाही. तसेच बाष्पीभवन व कर्बग्रहण क्रिया मंदावते.
– पूर्ण पाण्यात बुडालेल्या उसाच्या शेंड्यात माती व पाण्याचा शिरकाव झाल्याने कोंब कुजतो व पांगश्या फुटतात.
– एका आठवड्यापेक्षा जास्त काळ ऊस पीक पाण्यात राहिल्यास पाने वाळतात. ऊस कुजू लागतो.
– नवीन लागवडीत ७ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी राहिल्यास, बहुसंख्य डोळे कुजतात. परिणामी उगवण कमी होते.
– पूरग्रस्त क्षेत्रात प्रवाही पाण्याच्या भागात ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते.
– पूरग्रस्त उसामध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. Sugarcane Management

करावयाच्या उपाययोजना :

अंशतः पाण्याखाली बुडालेल्या उसामध्ये खालील उपाययोजना कराव्यात.

– ऊस पीक ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली बुडून कुजलेल्या शेतामध्ये वापसा आल्यानंतर ऊस काढून टाकावा. त्याचा उपयोग कंपोस्ट निर्मितीसाठी करता येतो. त्यानंतर जमिनीची नांगरट करून फेरपालटीची पीक म्हणून ताग, धैंचा अशा हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. तसेच गहू, हरभरा, मका इत्यादी पिके घ्यावीत. त्यानंतर ऊस लागवड करावी.
– शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावेत. किंवा पंपाच्या साह्याने पाणी शेताबाहेर काढावे.
– उसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. जेणेकरून हवा खेळती राहण्यास मदत होईल.
– ज्या ठिकाणी ऊस अंशतः वाळलेला आहे अशा पिकाचा खोडवा घ्यावा. त्यासाठी जमिनीलगत छाटणी करावी. खोडवा मशागतीची कामे, कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी तसेच खतांचा संतुलित वापर करून त्वरित हलकी भरणी करावी. एक महिन्यात तुटाळ भरावी. Sugarcane Management
– पूरग्रस्त शेतातील उसाची वाढ पुन्हा चांगल्याप्रकारे होण्यासाठी हेक्टरी नत्र ६० किलो (युरिया १३० किलो), पालाश ४० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ६६ किलो) आणि
व्हीएसआय निर्मित मायक्रोसोल १२.५ किलो प्रमाणे वापर करावा.
– डीएपी (२ टक्के) २० ग्रॅम अधिक युरिया (१ टक्का) १० ग्रॅम अधिक पालाश (०.५ टक्का) ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी वापर करावा. त्यामुळे पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.

– नत्र स्थिर करणाऱ्या व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूंचा हेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात वापर करावा.
– पानांवरील तांबेरा, पोक्का बोंग व तपकिरी ठिपके या रोगांच्या नियंत्रणाकरिता, मॅन्कोझेब (०.३ टक्का) ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
– कांडी कीड नियंत्रणासाठी, हेक्टरी १५ ट्रायकोकार्ड पानांवर
टोचावेत. किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल ३.७५ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
– गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळल्यास, संध्याकाळच्या वेळी उसाच्या हिरव्या पानांचे किंवा ओल्या बारदानाचे ढीग करून शेतात ठेवावेत. दुसऱ्या दिवशी बारदानावर गोळा झालेल्या गोगलगायी नष्ट कराव्यात. गोगलगायग्रस्त शेतात मेटाल्डिहाइड (२.५ टक्के) युक्त आमिषाचा ५ किलो प्रति हेक्टरी प्रमाणे वापर करावा.
– पुराचे पाणी ओसरल्यानंतर कुजलेला ऊस शेतातून काढून हुमणी प्रादुर्भावग्रस्त शेतात उभी व आडवी नांगरट करावी.
अशा प्रकारच्या काही उपाययोजनांचा अवलंब केल्यास, पूरबाधित ऊस पिकाची पुन्हा चांगली वाढ होऊन उत्पादनात फारशी घट येणार नाही.

– डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१
– डॉ. गणेश पवार, ९६६५९ ६२६१७
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), जि. पुणे)

Sugarcane Management

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top