कृषी महाराष्ट्र

Market Update : तुरीच्या दरात तेजी कायम ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Market Update : तुरीच्या दरात तेजी कायम ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

 

1. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाबमध्ये कापूस लागवड घटली

देशातील बाजारात कापसाचे दर दबावातच आहेत. त्यातच काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली. दुसरीकडे सध्या देशातील कापूस लागवड पिछाडीवर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब या महत्वाच्या राज्यांमध्ये कापूस लागवड कमी दिसते. तर सध्या कापसाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळतोय. पुढील काळात कापसाचे भाव लागवड आणि पिकाची स्थिती यानुसार बदलू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Market Bulletin

2. तुरीचे भाव तेजीच राहण्याचा अंदाज

देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहेत. पुढील महिन्यात आफ्रिकेतील तूर बाजारात येईल. पण देशातील तूर लागवडीचे चित्र सध्या तरी सकारात्मक नाही. देशात तूर लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. देशात पुरेशी लागवड होऊन पिकाची स्थिती चांगली राहत नाही तोवर बाजारातही तुरीचे भाव तेजीच राहण्याचा अंदाज आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. हे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. हरभरा भाव दबावातच

देशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. आजही हरभरा हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. दुसरीकडे बाजारातील आवक कमी झाली. गुणवत्तापूर्ण मालाची टंचाईसुध्दा जाणवत आहे. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाली. पण सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सरकारकडे यंदा मोठ्या प्रमाणात हरभरा स्टाॅक आहे. तसेच सरकार हा स्टाॅक बाजारात विकत आहे. त्यामुळे हरभरा दरात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही, असेही जाणकारांनी सांगितले. Market Bulletin

4. भाजीपाल्याप्रमाणे हिरव्या मिरचीचेही दर तेजीत

देशातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटली आहे. इतर भाजीपाल्याप्रमाणे हिरव्या मिरचीचेही दर तेजीत आहेत. देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा निम्म्याने कमी दिसते. त्यामुळे हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीची आवक लेगच वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मिरचीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

5. सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालपासून सुधारणा सुरु आहे. आज वायदेबाजारातील आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने दरात जास्त चढ उतार दिसत आहेत. मागील अनेक आठवड्यांमध्ये ही स्थिती पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे १३.७३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी आज ४०२ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता. आठवड्याचा शेवट असल्याने बाजारात किती वाढ होते आणि ती टिकते का? हे पाहावे लागेल. तर देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिरच आहेत. सोयाबीनची बाजारातील आवकही चांगली आहे. त्यातच सोयातेलाकडून सोयाबीनला आधार मिळत नाही. सोयापेंडचे भावही दबावात आहेत. यामुळे सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये भाव मिळत आहे. सरकारचे खाद्यतेल धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती पाहता सोयाबीन स्थिर राहण्याचा अंदाज आहे. पण यंदा देशातील अनेक सोयाबीन उत्पादन भागात पुरेसा पाऊस नाही.

सोयाबीनची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. तर मध्य प्रदेशातील पेराही कमी आहे. पेरणीचा काळही आता संपल्यात जमा आहे. परिणामी यंदा सोयाबीनची लागवड कमीच राहील, असे संकेत मिळत आहेत. उत्पादनाबाबतही निश्चित सांगता येत नाही. पण देशातील लागवड कमी राहीली आणि पाऊसमानही कमी राहील्यास सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source:agrowon

Market Update

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top