Market Update : कांद्याचे भाव वाढतील का ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या
१) कापसाच्या भावात चढ उतार
देशातील बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. वायद्यांमध्येही कालपासून मोठे चढउतार दिसत आहेत. सायंकाळपर्यंत वायद्यांमध्ये झालेली वाढ कमी होऊन बाजार कमी पातळीवर बंद होत आहे. आज दुपारी वायदे ५८ हजार ३२० रुपयांवर होते. बाजार समित्यांमधील भाव आजही ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता दरात चढ उतार दिसू शकतात, असे अभ्यासकांनी सांगितले. Market Update
२) सोयाबीन वायद्यांमध्ये दोन दिवसांमध्ये मोठी घट
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यांमध्ये दोन दिवसांमध्ये मोठी घट दिसली. सोयाबीनच्या वायद्यांनी काल महिनाभरातील निचांकी भाव पाहिला होता. देशात मात्र सोयाबीन दर काहीसे टिकून आहेत. एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवर सोयाबीनला ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु असल्याने देशातील भावपातळी स्थिर दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) हळदीला प्रतिक्विंटल ११ ते १२ हजार रुपयांचा भाव
हळदीच्या भावातील तेजी आजही कायम होती. हळदीला बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल ११ ते १२ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हळदीची कमी झालेली लागवड आणि मागणी कायम असल्याने चांगला भाव मिळत आहे. हळदीची लागवड कमी असून जुलैच्या पावसाचाही फटका काही भागातील पिकाला बसला. त्यामुळे उत्पादन कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसचे हळदीच्या दरातील तेजी किमान ४ ते ५ महिने कायम राहू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. Market Update
४) मेथीला सध्या प्रतिजुडी ५० पैशांपासून ५ रुपयांपर्यंत भाव
बाजारातील आवक वाढल्याने अगदी दोन आठवड्यांपूर्वी तेजीत असलेली मेथी शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याची ठरत आहे. दोन आठवड्यांपूर्वी मेथीचे भाव प्रतिजुडी १० ते १२ रुपये प्रतिजुडीच्या दरम्यान होते. पण मागील आठवडाभरापासून बाजारातील आवक वाढली आहे. त्यामुळे मेथीचे भाव खूपच दबावात आले. मेथीला सध्या प्रतिजुडी ५० पैशांपासून ५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मेथीचे भाव दबावात आल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. मेथीचे भाव आवक जास्त आहे तोपर्यंत दबावातच दिसू शकतात, असे व्यापारी सांगत आहेत.
५) कांदा दरात काहीशी सुधारणा
देशातील बाजारात मागील तीन आठवड्यांपासून कांद्याचा बाजार स्थिर दिसतो. जून महिन्यापासून कांदा दरात काहीशी सुधारणा दिसली होती. पण जुलै महिन्यात कांद्याची आवक वाढलेली दिसली. जुलै महिन्यात अनेक कांदा उत्पादक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. परिणामी काही ठिकाणी कांदा पिकाला पाणी लागले. कांद्याला पाणी किंवा ओल लागल्याने बाजारातील आवक वाढत केली. दुसरीकडे चालू हंगामात कांदा पिकाला वाढलेली उष्णता आणि अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे कांद्याची गुणवत्ता कमी झाली. यंदा जास्त काळ टिकून राहील, अशा कांद्याचे प्रमाण कमी झाले. जुलै महिन्यातही कांद्याची विक्री वाढली, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या कांद्याचा भाव देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याचा सरासरी भाव १ हजार ते १ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर केरळ, तमिळनाडू आदी राज्यांमध्ये कांदा २ हजारांच्या पुढे दिसतो. येणाऱ्या काळात देशात कांद्याचा पुरवठा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चांगली वाढ दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
source : agrowon