Onion Crop Damage : गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या ? वाचा सविस्तर
Onion Damage : राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी वादळी पाऊस झाल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना केल्यास संभाव्य नुकसान कमी करता येईल.
कांदा पीक पुनर्लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांचे आहे. अशा रोपांची काही प्रमाणात हानी झाली असल्यास, ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच पाण्यात विरघळणारे खत १९:१९:१९ (नत्र : स्फुरद : पालाश) पाण्यातून द्यावे.
रोपे पूर्णपणे कोलमडली असल्यास, नत्र : स्फुरद : पालाश : गंधक (विद्राव्य खते) २५:२०:२०:१० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे मातीतून द्यावे. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. पुनर्लागवडीनंतर ६० ते ९० दिवसांच्या अवस्थेत रोपे असल्यास, रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता, ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. नवीन येणाऱ्या पानांवर पाण्यात विरघळणारे खत १९:१९:१९ (नत्र : स्फुरद : पालाश) १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. Onion Damage
वादळी पाऊस किंवा गारपिटीला बळी पडलेल्या आणि काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकाची त्वरित काढणी करावी. काढणी झालेल्या कांद्यांची सुकवण करून ताबडतोब विक्री करावी.
कांदा पीक माना पडण्याच्या स्थितीत असताना पावसामुळे नुकसान झाले असल्यास, शेतातून अतिरिक्त पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. शेत कोरडे झाल्यावर, ऊन पडल्यावर कांद्याची काढणी करावी. शेतामध्ये उन्हात पातीसह कांदा ३-४ दिवस सुकू द्यावा. Onion Crop Damage
जवळ जवळ २-३ सें.मी. लांबीच्या माना (नाळ) ठेवून कांदे कापावेत. कांदे निवडून सुमारे १५ दिवस ३-४ फुटांचा ढीग करून सावलीत सुकवावे. हे कांदे साठवणीत ठेवायचे असल्यास, हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणगृहात ठेवावेत.
बीजोत्पादनाकरिता लावलेल्या कांदा पिकाकरिता : कांदा बीजोत्पादनाच्या पिकाचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास, ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
पाण्यात विरघळणारे खत १९:१९:१९ (नत्र : स्फुरद : पालाश) पाण्यातून द्यावे. बोरिक आम्ल दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास बीजोत्पादनामध्ये मदत होते. लागवड केलेल्या कंदांची सड होत असल्यास त्यावर स्ट्रेप्टोमायसिन* पावडरची ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी (ड्रेंचिंग) करावी. Onion Crop Damage
वरील उपाययोजनांसोबत…
- पानांवर फवारणी करताना पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अर्धा ते १ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात चिकटद्रव्यांचा वापर करावा.
- दोन दिवसांपेक्षा सतत ढगाळ वातावरण असल्यास, पीक चांगले असले तरीही वरीलपैकी एका बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आढळल्यास, फिफ्रोनिल २ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस २ मि.लि प्रति लिटर पाणी या प्रमाणे चिकट द्रव्यांसह फवारावे.
- शेतामध्ये साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे.
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे) : ०२१३५-२२२०२६,