कृषी महाराष्ट्र

निशिगंध लागवड संपूर्ण माहिती

निशिगंध लागवड संपूर्ण माहिती

 

निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात. हार, वेणी तयार करण्यासाठी निशिगंधाच्या फुलांना मागणी आहे. फुलदांड्याचा उपयोग फुलदाणी आणि पुष्प सजावटीसाठी केला जातो. या फुलपिकाची लागवड करणे सोपे असते. लागवड कमी खर्चात होते. वर्षभर मागणी असते, बाजारभावही चांगला मिळतो.

जमीन :

उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. हलक्‍या जमिनीत भरपूर सेंद्रिय खतांचा वापर करावा. चुनखडीयुक्त, हरळी किंवा लव्हाळ्यासारखी बहुवर्षीय तणे असलेली जमीन निवडू नये. हवामान : या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय असते तेथे निशिगंधाची यशस्वी लागवड करता येते. मात्र, अतिथंड हवामान आणि अतिपाऊस या पिकास हानिकारक ठरतो. हे पीक उष्ण व समशीतोष्ण हवामानात चांगले येते.

लागवड :

हे बहुवर्षायू पीक आहे. एकदा लागवड केल्यास त्याच जमिनीत हे पीक सतत तीन वर्षे ठेवता येते किंवा त्याची प्रत्येक वर्षी नव्याने लागवड केली जाते.
लागवडीसाठी मागील वर्षाच्या पिकातून निघालेले दर्जेदार कंद वापरावेत. मूळ मातृ कंदाभोवती लहान मोठे बरेच कंद असतात. हे कंद काढून चार-पाच आठवडे सावलीत पसरून ठेवावेत. हे कंद एकमेकांपासून वेगळे करावेत. त्यामधून एकसारख्या आकाराचे आणि वजनाचे कंद काढून लागवड करावी.
लागवडीसाठी २० ते ३० ग्रॅम वजनाचे किंवा त्याहून अधिक वजनाचे कंद वापरावे. १५ ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीसाठी वापरल्यास फुले येण्यास ६ ते ७ महिन्यांचा कालावधी लागतो.
निवडलेले कंद लागवडीपूर्वी कॅप्टन ०.३ टक्के द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लावावेत.
मशागत करून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करताना हेक्‍टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
कंदाची लागवड सपाट वाफ्यावर किंवा सरी वरंब्यावर करतात.
ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म तुषार सिंचनाची सोय असल्यास लागवड गादी वाफ्यावर करावी.
वाफ्यावर ३० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर ५ ते ७ सें.मी. खोल जमिनीत कंदाची लागवड करावी. एका ठिकाणी एकच कंद लावावा. अशा पद्धतीने हेक्‍टरी ७० ते ८० हजार कंद लागवडीसाठी लागतात.
सतत आणि भरपूर फुलांच्या उत्पादनासाठी लागवड एप्रिल-मे महिन्यात करावी.

खत व्यवस्थापन :

हे पीक खताला चांगला प्रतिसाद देते. फुलांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी हेक्‍टरी ३० टन शेणखत/ कंपोस्टखत मशागतीच्यावेळी मिसळावे.
माती परीक्षणानुसार २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी.
लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश ही खते द्यावीत. राहिलेले १५० किलो नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यांत ३०, ६०, ९० दिवसांनी द्यावे.
लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी १० किलो ॲझोटोबॅक्‍टर किंवा ॲझोस्पिरीयम १०० किलो ओलसर शेणखतात मिसळून द्यावे. जमिनीमध्ये ओलावा असताना १० किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत आणि १० किलो ट्रायकोडर्मा १०० किलो ओलसर शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

पाणी व्यवस्थापन :

लागवड उन्हाळ्यामध्ये होत असल्याने पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या पाण्याचा ताण पडू देऊ नये. लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे.
उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात आवश्‍यकतेनुसार १० ते १५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
फुलदांडे येण्यास सुरवात झाल्यानंतर पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. या वेळी पाण्याचा ताण पडल्यास त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. पावसाळ्यात जादा पाऊस झाल्यास शेतात जास्त काळ पाणी साठू देऊ नये. साठणाऱ्या पाण्याचा ताबडतोब निचरा करावा.

फुलांची काढणी :

लागवडीपासून ३ ते ४ महिन्यांनी फुले काढण्यासाठी येतात. निशिगंधाची लागवड प्रामुख्याने फुलदांड्याच्या उत्पादनासाठी आणि सुट्या फुलांसाठी केली जाते.
फुलदांड्यासाठी काढणी करताना दांड्यावरील सर्वांत खालची दोन किंवा तीन फुले उमलत असताना दांड्याची काढणी करावी. दांड्यासाठी काढणी करताना फुलदांडे जमिनीलगत पानाच्या वरील बाजूस कापावेत.
दांड्याच्या एक डझनाच्या जुड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून कागदाच्या खोक्‍यात भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवाव्यात.
सुट्या फुलांसाठी पूर्ण वाढलेल्या कळ्या अथवा उमललेली फुले काढावीत. फुलांची काढणी सकाळी ५ ते ८ किंवा सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान करावी.
हेक्‍टरी ८ ते १० लाख फुलदांडे मिळतात. सुट्या फुलांचे ७ ते ८ उत्पादन मिळते.
बाजारपेठेत सुट्या फुलाला भरपूर मागणी असल्याने फुले ५ ते ७ किलो क्षमतेच्या बांबू करंडी किंवा कागदाच्या खोक्‍यात भरून दूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.

जाती :

फुलांच्या पाकळ्यांची संख्या आणि पानांच्या रंगानुसार सिंगल, डबल, सेमी डबल आणि व्हेरिगेटेड असे चार प्रकार पडतात.
सिंगल प्रकारात फुले रजनी, स्थानिक सिंगल, शुंगार, प्रज्वल या जाती आहेत. त्यांचा उपयोग सुट्ट्या फुलांच्या उत्पादनासाठी करतात.
डबल प्रकारात स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव या जाती आहेत. यांचा उपयोग फुलदांड्यासाठी करतात.

दर्जेदार फुलांसाठी : फुले रजनी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले रजनी ही निशिगंधाची जात सुट्या फुलांच्या उत्पादनासाठी तसेच फुलदांड्याच्या उत्पादनासाठी चांगली आहे.
पांढऱ्या शुभ्र रंगाची फुले, इतर जातीच्या तुलनेत सुवासिक.
लागवडीपासून ८० ते ९० दिवसांत फुलावर येते.
फुलदांडे ७० ते ८० सें.मी. लांब. फुलदांड्यावर ४० ते ५० फुले लागतात. ही फुले क्रमाक्रमाने खालून शेंड्याकडे उमलतात.
कळी अवस्थेत कळीवर फिक्कट हिरव्या रंगाची छटा असते. पूर्ण उमललेले फुल पांढऱ्या रंगाचे असते.
एका झाडापासून वर्षभरात सर्वसाधारण कमीत कमी ७ ते ८ फुलदांडे मिळतात, तसेच लहान-मोठे ३० ते ३५ कंदाचे उत्पादन मिळते.

रोग नियंत्रण :

करपा रोगाची सुरवात पानांवर ठिपके पडून होते. तपकिरी रंगाचे हे ठिपके कालांतराने मोठे होऊन संपूर्ण पान करपते. पान टोकाकडून बुंध्याकडे कपरत जाते. निशिगंध लागवड

नियंत्रण :

मॅंकोझेब ०.२५ टक्के किंवा क्‍लोरोथॅलोनील ०.२० टक्के या पैकी एका बुरशीनाशकाची दर १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून २ ते ३ वेळा फवारणी करावी.

खोडकूज :

हा रोग बुरशीजन्य आहे. या रोगाची लागण झाडाच्या खालच्या बाजूस होते.
सुरवातीला झाडाच्या खालील पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. नंतर हे ठिपके पडून पाने गळतात. रोगट झाडावर बुरशीची वाढ झाल्याची दिसते. पोषक वातावरणाच संपूर्ण पाने गळतात. यामुळे फुलांच्या उत्पादनात घट होते. निशिगंध लागवड निशिगंध लागवड 

नियंत्रण

वाफ्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. पीक फेरपालट करावी.
रोगट पाने तसेच झाडे गोळा करून जाळून नष्ट करावीत.
लागवड करताना दोन झाडातील अंतर योग्य ठेवावे.
रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कॅप्टन ०.२५ टक्के या बुरशीनाशकाची फवारणी करावी. प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या बुंध्याजवळ शिफारशीत मात्रेत बुरशीनाशक ओतावे.
लागवड करताना कंद ट्रायकोडर्मा या जैविक घटकाच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लागवड करावी. यासाठी ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या मिसळावे.
ट्रायकोडर्मा व्हिरीडी १० ग्रॅम प्रति किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रति १० चौरस मीटर क्षेत्राच्या मातीत मिसळावी.

संपर्क : डॉ. सतीश जाधव, बळवंत पवार, ०२०- २५६९३७५० (लेखक अखिल भारतीय समन्वयीत पुष्पसुधार प्रकल्प, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे कार्यरत आहेत.)

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top