कृषी महाराष्ट्र

Pulses Market : यंदा तूर, मूग, उडदासाठी चांगला भाव मिळण्याची शक्यता ! वाचा सविस्तर

Pulses Market : यंदा तूर, मूग, उडदासाठी चांगला भाव मिळण्याची शक्यता ! वाचा सविस्तर

 

Pulses Market : पुणे : खरिपात कडधान्याची म्हणजेच तूर, उडीद आणि मुगाची लागवड घटली. त्यामुळं भाव चांगलेच वाढले. पण तुम्ही म्हणालं, आता तर आमच्याकडं ना तूर आहे ना उडीद. मग या तेजीचा आम्हाला काय फायदा? आमच्याकडं माल असतो तेव्हा भाव कमी असतो. आम्ही माल विकला की भाव वाढतो. पण यंदा शेतकऱ्यांनाही तूर, मूग आणि उडदाला चांगला भाव मिळू शकतो. मी हे जे काही मी सांगतो त्याला तीन घटकांचा आधार आहे. ते म्हणजे आयातीवरील मर्यादा, कमी पेरणी आणि दुष्काळ.

पहीला मुद्दा म्हणजे कडधान्याच्या आयातीवर सरकारला मर्यादा आहेत. सरकारचं धोरण तुम्हाला माहीतच आहे. की वाढले भाव की कर आयात. पण सर्वच शेतीमालाच्या बाबतीत असं करता येत नाही. विशेषतः तूर आणि उडीद. जागतिक बाजारात तूर आणि उडदाचा पुरवठा एवढाही नसतो की त्यातून भारताची गरज पूर्ण होईल. का नसतो तर तूर आणि उडीद उत्पादन घेणारा आणि वापर करणारा भारतच सर्वात मोठा देश आहे.

मग आपलच उत्पादन घटलं तर आपली गरज कोण पूर्ण करणार ? याचा अनुभव आपल्याला मागील सहा महिन्यांपासून येतच आहे. सरकारने तूर आणि उडदाची आयात वाढवायला किती कसरत केली. पण ना आयात वाढली ना भाव कमी झाले. यापुढील काळातही असच होऊ शकतं. Pulses Market

दुसरा मुद्दा आहे पेरणीचा. देशातील कडधान्य लागवड जवळपास ८ टक्क्यांनी कमी आहे. यात यंदा शेतकऱ्यांनी तुरीची लागवड ५ टक्क्यांनी कमी केली. मागील हंगामात तुरीसाठी शेतकऱ्यांना हमीभावही मिळाला नाही. त्यामुळं यंदा शेतकरी लागवड कमी करतील, असं आधीपासूनच वाटत होतं. उडदाची लागवड सर्वाधिक १४ टक्क्यांनी घटली. तर मुगाचा पेरा ८ टक्क्यांनी घटला. मागील हंगामात शेतकऱ्यांना मिळालेला कमी भाव आणि कमी पाऊस यामुळं पेरणी कमी केल्याचं शेतकरी सांगतात.

तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायची गरजच नाही. याचा अनुभव आपल्याला येतच आहे. सध्या आपल्याकडं पाऊस नाही. एक महिन्यापासून आपण पावसाची वाट पाहतोय. तसंच देशातील इतर तूर, मूग आणि उडीद उत्पादक राज्यांमध्येही पाऊस नाही. यामुळं खरिपात पेरलेल्या या पिकांचं नुकसान होताना दिसतं.

आपल्याकडं पिकांनी अजूनही जमिनच सोडलेली दिसत नाही. काही भागात तर शेतकऱ्यांनी पीक वखरून टाकलं. त्यामुळं नुकसान मोठं आहे. पावसाचं बोलायचं झालं तर आपल्या राज्यात सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस आहे. तसचं कर्नाटकात ७४ टक्के कमी पाऊस पडला. राजस्थान, गुजरात आणि तेलंगणातही ७० ते ८० टक्के कमी पाऊस आहे. आणि ही राज्ये खरिपात कडधान्य उत्पादनासाठी महत्वाची आहेत.

म्हणजेच आयातीवरील मर्यादा, कमी पेरणी आणि दुष्काळ याचा परिणाम काय झाला, तर तूर, हरभरा, मूग आणि उडदाचे भाव चांगलेच वाढले. सध्या आपल्याकडं तूर, मूग, उडीद किंवा हरभरा नाही. म्हणजेच बाजारातील आवक कमी आहे. परिणामी भावात मोठी तेजी आली. तुम्हाला माहीत आहे की तुरीचे भाव मागच्या पाच महिन्यात जवळपास दुप्पट झाले.

शेतकऱ्यांची तूर बाजारात येत होती तेव्हा ६ हजारांचाही भाव मिळाला नाही. पण आता भावानं काही ठिकाणी १२ हजारांचाही टप्पा गाठला. मुगाचा आणि उडदाचाही भाव काही बाजारांमध्ये १० हजारांवर पोचला. डाळीचेही भाव तेजीत आहेत. तूर, मूग आणि उडदाचे भाव वाढल्यानंतर हरभराही मागं कसा राहणार? हरभऱ्याच्या भावात मागील महिनाभरात क्विंटलमागं एक हजारांची वाढ झाली. हरभरा आता मोठ्या बाजारांमध्ये सरासरा ६ हजारांवर पोचला. सणासुदीच्या काळात सर्वच डाळींच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला तरी उत्पादन घटणार आहेच अंदाज आहे. पण जर सप्टेंबरमध्ये पाऊस कमी राहीला तर रब्बीतील महत्वाच्या हरभऱ्याचेही उत्पादन घटेल. यामुले तूर, हरभरा, मूग आणि उडदाचे भाव चांगलेच वाढतील, हा ही मुद्दा महत्वाचा आहे. कमी पावसामुळं खरिपातील तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन घटणारच आहे. पण हाती आलेल्या या मालाला चांगला भाव मिळाला आणि उत्पादन खर्च भरून निघावा, हीच आपली अपेक्षा आहे.

source : agrowon

Pulses Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top