Rabi Crop Market : कोणत्या पिकाला रब्बीत राहील मार्केट ? रब्बीत कोणत्या पिकाची लागवड करावी ?
Rabi Crop Market : पुणे : रब्बीची पेरणी आता वेगाने सुरु आहे. पण सध्या शेतकऱ्यांना दोन प्रकारची चिंता आहे. पहिली चिंता आहे ती पाण्याची आणि दुसरी चिंता आहे की कोणतं पीक यंदा फायदेशीर ठरू शकतं. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांसाठी गहू पीक फायदेशीर ठरू शकतं. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी आहे त्या शेतकऱ्यांना हरभरा आणि ज्वारी चांगला पर्याय आहे.
रब्बीत कमी पाण्यात येणारं पीक म्हणजे हरभरा. हरभऱ्याला चांगला भाव मिळू शकतो. आता तुम्ही म्हणालं रब्बीत तर हरभरा पेरणी वाढेल. मग भाव कसा मिळेल. याच कारण फक्त हरभरा नाही तर एकूणच कडधान्य बाजारात आहे. आता हेच पाहा. मागच्या हंगामात हरभरा उत्पादन वाढलं होतं.
पण नंतरच्या टप्प्यात भाव वाढलेच ना. कारण तूर आणि उडदाचे भाव वाढले होते. यंदा तर हरभरा उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. कारण यंदा दुष्काळ आहे.
तसंही पुढील वर्षभर तरी हरभरा बाजाराला तूर आणि उडदाचा आधार मिळू शकतो. कारण तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. त्यातच उडदाचं यंदा उत्पादन घटलं. तुरीची लागवड यंदा ५ टक्क्यांनी कमीच झाली. त्यातही दुष्काळामुळं पिकाचं काही खरं नाही. Rabi Crop Market
म्हणजे यंदाही तुरीचं उत्पादन कमी राहून भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे. तूर आणि उडदाचे भाव तेजीत राहीले करी हरभऱ्याला मागणी वाढून हरभऱ्याचेही भाव वाढतात. हा अनुभव सध्या आपल्याला येतच आहे.
गव्हाचा पर्याय चांगलाज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांसाठी गव्हाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. कारण देशात गव्हाचे भाव वाढतच आहे. गव्हाला वाणानुसार ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतोय. देशात मागील सलग दोन वर्षे उत्पादन घटले होते. त्यामुळे देशात मागील काही महिन्यांपासून गव्हाचे भाव वाढत आहेत.
सरकारने निर्यातबंदी केली, स्टाॅक लिमिट लावले, व्यापाऱ्यांवर दबाव आणला. तरीही गव्हाचे भाव कमी होण्याचे नाव घेईना. यंदा तर गहू उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. कारण देशात यंदा पाऊसमान कमी आहे. त्यामुळे धरणं आणि जलाशयांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी असून गव्हाला पाण्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यामुळे गव्हाचे भाव चांगलेच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. Rabi Crop Market
ज्वारीला उठाव कायम
याशिवाय रब्बीचा ज्वारीचाही चांगला पर्याय आहे. कारण ज्वारीला मागील काही वर्षांपासून मागणी वाढत आहे. कोरनानंतर लोक गव्हाऐवजी ज्वारीला पसंती देत आहेत. त्यामुळे देशात ज्वारीचा पुरवठा कमी राहून चांगला भाव मिळत आहे.
सध्या ज्वारीचे भाव चांगले आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. या स्थितीत ज्वारीलाही चांगला भाव राहू शकतो.
सरकार काय करेल ?
आता उत्पादन घटून भाव वाढले तर सरकार शांत बसणार नाही. भाव पाडण्याचा प्रयत्न करणारचं. कारण ही पीक जेव्हा बाजारात येतील तेव्हा देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल असेल. पण गव्हाच्या बाबतीत सरकारकडे पर्याय नसेल. कारण जे काय करता येईल ते सरकारने करून झालं आणि करतंय.
हरभऱ्याबाबतीत सरकार आयातशुल्क कमी करून आयात वाढवू शकते. पण पुन्हा तेच भारतानं आयात वाढवली तर निर्यातदार देशही भाव वाढवतात. याचा अनुभव आता आपल्याला तूर आणि उडदाच्या बाबतीत येतच आहे. या धोरणांचा बाजारवर काही प्रमाणात परिणाम होतच असतो. पण टंचाई असल्यास बाजारात पुन्हा भाव वाढत असतात.