कृषी महाराष्ट्र

गहू दरात झाली विक्रमी वाढ : वाचा संपूर्ण माहिती

गहू दरात झाली विक्रमी वाढ : वाचा संपूर्ण माहिती

 

पुणे : देशातील बाजारात सध्या गव्हाच्या दराने (Wheat Rate) विक्रमी पातळी गाठली. गव्हाचा भाव ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

सरकार (Government) खुल्या बाजारात गहू (Wheat) विकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर दरात झपाट्याने वाढ झाली. तर सध्या उत्तर भारतातील काही बाजारात गव्हाचा तुटवडा जाणवत असल्याचे व्यापारी आणि उद्योगाच्या सुत्रांनी स्पष्ट केले.

केंद्राकडे सध्या गव्हाचा कमी साठा आहे. त्यामुळे सराकरने खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळं अनेक बाजारांमध्ये गव्हाचा तुटवडा जाणवत आहे.

सरकारनेही पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी गहू देणं बंद केलं. त्यामुळं खुल्या बाजारातील गव्हाची मागणी वाढली. पूर्व भारतात गव्हाची मोठी टंचाई असल्याचं उद्योगांनी सांगितलं.

देशात गहू उत्पादनात उत्तर प्रदेश हे महत्वाचे राज्य आहे. मात्र उत्तर प्रदेशातही गव्हाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथे गव्हाचे दर रोजच वाढत आहेत.

सध्या उत्तर प्रदेशात गव्हाचे दर सरासरी ३ हजार ५० रुपयांवर पोचले. तर राजस्थानमधील सरासरी दरपातळी २ हजार ८०० रुपयांवर पोचली. उत्तर प्रदेशात सध्या गुजरातमधून गव्हाची आयात केली जात आहे.

केंद्राने मागील हंगामात गव्हासाठी २ हजार १५ रुपये हमीभाव दिला. तर २०२३ साठी २ हजार १२५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या बाजारातील दर हमीभावापेक्षा खूपच जास्त आहेत.

तसेच मागीलवर्षीच्या तुलनेतही जास्त आहेत. देशात ८ जानेवारीला गव्हाची सरासरी दरपातळी २ हजार ७८८ रुपयांवर होती. हा दर मागीलवर्षी याच तारखेला असलेल्या भावपातळीच्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक आहे. तर किरकोळ दर यंदा १६ टक्क्यांनी वाढून ३१ रुपयांवर पोचले.

दर आणखी वाढणार

देशात सध्या गव्हाची तुटवडा आहे. त्यामुळे गव्हाचे दर पुढील काळातही वाढू शकतात. देशातील गव्हाची दरपातळी ३ हजार ३०० रुपयांपर्यंत वाढू शकते. गुजरातमध्ये मार्चच्या सुरुवातीला बाजारात गहू येईल तोपर्यंत गव्हाचे हे दर कायम राहू शकतात.

उत्तर प्रदेश आणि उत्तरेतील राज्यांमधील गहू मार्च महिन्याच्या शेवटी बाजारात येईल. बाजारातील आवक वाढल्याशिवाय दर नियंत्रण शक्य नाही, असंही बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं.

साठा निच्चांकी पातळीवर

मागीलवर्षी उष्णतेमुळे गव्हाचे उत्पादन घटले. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने निर्यातही वाढली. त्यामुळं खुल्या बाजारात गव्हाचे दर वाढले. परिणामी भारतीय अन्न महामंडळाला अर्थात एफसीआयला आधीच्या हंगामाच्या तुलनेत निम्मीच खरेदी करता आली.

सध्या भारतीय अन्न महामंडळाकडे सहा वर्षांतील निच्चांकी गहू साठा आहे. सध्या एफसीआयच्या गोदांमध्ये १७१ लाख टन गहू असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top