कृषी महाराष्ट्र

यशोगाथा : अर्धबंदिस्त कोंबडीपालन, उत्पन्नाचा भक्कम आधार

यशोगाथा : अर्धबंदिस्त कोंबडीपालन, उत्पन्नाचा भक्कम आधार

 

जालना जिल्ह्यातील खणेपुरी येथील २६ वर्षीय प्रभू राम गाडे या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने अर्धबंदिस्त पद्धतीचे कोंबडीपालन व त्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करून उत्पन्नाचा भक्कम आधार तयार केला आहे.

मुक्त संचाररूपी अर्धबंदिस्त कोंबडीपालन (Poultry Farming) व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, तसेच कोरडवाहू व फळबाग शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकतो. सुरुवातीला मर्यादित संख्येत कोंबड्या पाळून वर्षभरात मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन घेता येते.

शिवाय वर्षभरात दोन वेळा पिले तयार केली व तीन ते चार महिने सांभाळ करून बाजारात मांसल कोंबड्या म्हणून विक्री केली तर नफा वाढवता येतो. जालना जिल्ह्यातील खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात अर्धबंदिस्त कोंबडीपालनाच्या ‘मॉडेल’मध्ये अशा कोंबड्या हमखास ग्राहकांना उपलब्ध असतात. भागातील शेतकऱ्यांकडेही अशी मॉडेल्स पाहण्यास मिळतात.

गाडे यांचे कोंबडीपालन

जालना जिल्ह्यातील खणेपुरी येथील २६ वर्षीय प्रभू राम गाडे या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने अर्धबंदिस्त मुक्त संचार कोंबडी पालनाचे मॉडेल आपल्या शेतात उभे केले आहे. गाडे यांनी एमए कला विषयातील पदविका घेतली असून, कायद्याचे शिक्षण ते घेत आहेत. त्यांची सुमारे साडेपाच एकर शेती आहे. ती वडील व बंधू सांभाळतात.

सन २०१० मध्ये प्रभू यांनी तीन कोंबड्यांपासून व्यवसाय सुरू केला. आज पाहता पाहता कोंबड्यांची संख्या एक हजारांपर्यंत पोहोचली आहे. मुक्तसंचार वातावरण ठेवल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहिले. साहजिकच मरतुक कमी झाली. सर्व पैदास शेडमधील आहे. बाहेरून एकही कोंबडी विकत घ्यावी लागली नसल्याचे प्रभू सांगतात.

कोंबडी पालनाची रचना

शेतात ६० बाय १८ फूट आकाराचे शेड बांधले आहे. कोंबड्यांची रात्रीच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. शेडच्या भोवती असलेल्या चारशे फूट जागेला सव्वा सहा फूट उंच जाळीचे तारेचे कुंपण केले आहे. कुंपणाच्या आतमध्ये काही झाडे असून, शेडच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या झाडांची सावली सतत शेडवर असते. शेडच्या आत अंडी उबवण्यासाठी एका रांगेत दुरड्या ठेवण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय गोणपाटात अंडी देऊ शकतील, अशीही व्यवस्था केली आहे. पत्र्याचे छप्पर व त्याखाली उंचावर बसण्यासाठी लाकडी खांबरूपी व्यवस्थाही केली आहे.

खाद्य व्यवस्थापन

दीर्घ अनुभवामुळे आता प्रभू यांना कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याचा अंदाज आला आहे. ते सांगतात की फार मोजूनमापून खाद्य देत नाही. दररोज एक किलो स्टार्टर, पाच किलो पीठ व गहू तांदूळ व अन्य धान्यातील चूर आदींचा भरडा मिळून जवळपास २१ ते २२ किलो खाद्य शेड परिसरात ठेवतो.

याशिवाय बांधावरील रुंद पानाच्या गवताचा पाला, मेथी घास यांचा वापर होतो. शिवाय भरडा,पीठ, द्रवरूप कॅल्शिअम व पशुवैद्यकांनी सुचवलेले टॉनिक यांचा गरजेनुसार वापर होतो. महिन्याला सात ते आठ हजार खर्च खाद्यासाठी येतो. गावाजवळून कुंडलिका नदी गेल्याने व विहिरीची साथ असल्याने पाणी कमी पडत नाही.

असे झाले फायदे

प्रभू सांगतात, की अर्धबंदिस्त कोंबडीपालनामुळे मुंगूस, बोके, कुत्रे यांच्यापासून कोंबड्यांचे संरक्षण करता येते. दिवसभर शेडमध्ये थांबवण्याची गरज नसते. सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तास असे दिवसातून चार तास कोंबडीपालनाला दिल्यास ते पुरेसे ठरतात. वेळेची बचत होते.

विक्री व्यवस्था व अर्थकारण

दररोज ७०, ८० ते ९० अंडी उपलब्ध होतात. गावरान असल्याने त्याला मागणी भरपूर असते. साहजिकच दररोज विक्री होते. प्रति अंडे १५ रुपये असा दर आहे. त्यामुळे दिवसाला किमान एक हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. प्रभू महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याने विद्यार्थी, व्यायामपटू तसेच अन्य ग्राहक मिळवणे त्यांना सोपे गेले.

शिवाय खणेपुरी हे गाव तीन हजार लोकसंख्येचे असून, चार गावे आजूबाजूला आहेत. त्यामुळे ग्राहकांचा तुटवडा भासत नाही. दर महिन्याला १५ ते २० मांसल कोंबड्यांची विक्री होते. हॉटेल, धाबे व्यावसायिक तसेच ग्राहक जागेवर येऊन खरेदी करतात. त्यास ४५० ते ५०० रुपये प्रति किलो दर मिळतो. अंडी व कोंबड्यांच्या एकूण विक्रीतून महिन्याला २५ हजार ते ३० हजार रुपये पदरात पडतात. शेतीला हा मोठा पूरक आधार ठरतो.

उत्पन्नाचा सक्षम मार्ग

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील मार्गदर्शनातून अनेक शेतकऱ्यांनी कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला आहे. यात चौधरी नगर, जालना येथील गजेंद्र शेंडगे, रामगव्हाण येथील दीपक बुनगे, खनेपुरी, वरुडी येथील परमेश्‍वर शिंदे व परमेश्‍वर काकडे, मोसा येथील नामदेव माथणे, पोकळवडगाव येथील प्रदीप मुरमे, गुळखन येथील प्रदीप मोगल आदी काही नावे सांगता येतील. या पद्धतीस शासनस्तरावरून योजनेच्या रूपाने प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून हवामान बदलामुळे संकटात असलेल्या बळीराजाला सक्षम उत्पन्नाचा मार्ग मिळेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

source:-agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top