Soybean Market : सोयाबीन किमान आधारभूत किमतीवर खरेदी सुरू करा
Soybean Market : सोयाबीनच्या उत्पादकतेत झालेली घट, किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असलेले सोयाबीनचे बाजारभाव आणि शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू करावी अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवून तात्काळ मान्यता देण्याची शिफारस केंद्र शासनास करावी, असेही मुनगंटीवार यांनी गुरुवारी (ता. २६) पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे. चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ६७ हजार ७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. Soybean Market
वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. मात्र, १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पीक काळवंडले. Soybean Market
याबाबत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी क्षेत्रीय भेट देऊन पाहणी केली होती. सोयाबीनसाठी चार हजार ६०० रुपये किमान आधारभूत मूल्य निश्चित केले आहे. मात्र, सध्या बाजारात किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी कमी उत्पन्न आणि कमी बाजारभाव अशा दुहेरी संकटात सापडला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी योजना सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
शेतक-यांना दिलासा देण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.