कृषी महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ५१८ लाभार्थींना अनुदान ! वाचा संपूर्ण

डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ५१८ लाभार्थींना अनुदान ! वाचा संपूर्ण

आंबेडकर कृषी स्वावलंबन

Solapur News : अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्‍वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ५१८ लाभार्थींना लाभ दिला आहे.

त्याअंतर्गत रक्कम रुपये ४ कोटी ४३ लाख अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी परमेश्‍वर वाघमोडे यांनी दिली.

श्री. वाघमोडे म्हणाले, की राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजार रुपये, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण १ लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रुपये, इनवेल बोअरिंग व पंपसंचासाठी प्रत्येकी २० हजार रुपये, वीजजोडणी आकार १० हजार रुपये, तसेच सूक्ष्म सिंचन संच अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी ५० हजार रुपये किंवा तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपये या मर्यादेत अनुदान वितरित करण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध संवर्गातील असावा. शेतकऱ्याच्या नावे किमान ०.२० हेक्टर व कमाल ६ हेक्टर मर्यादित जमीन असावी. नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान ०.४० हेक्टर स्वतःच्या नावे किंवा एकत्रित कुटुंबाची सामूहिक जमीन असावी.

नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्याकरिता किमान ०.२० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न दीड लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीस प्रथम प्राधान्य राहील. Dr. Ambedkar Krishi Swavalban Yojana

प्रस्तावित विहिरीच्या ५०० फुटापर्यंत इतर विहीर नसावी. भूजल सर्वेक्षकांचा दाखला आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा १८ शेतकऱ्यांना लाभ

दरम्यान, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा २०२२-२३ या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील १८ लाभार्थींना लाभ देण्यात आला असून १०.९० लाख रुपये रुपयांचे अनुदान दिले आहे, असे श्री. वाघमोडे यांनी सांगितले.

source:agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top