कृषी महाराष्ट्र

जगभरात गव्हावर नविन रोग ! वाचा सविस्तर माहिती

जगभरात गव्हावर नविन रोग ! वाचा सविस्तर माहिती

गव्हावर नविन रोग

गहू जागातील प्रमुख धान्य पीक आहे. त्यामुळे गव्हाला इतर धान्यापेक्षा जास्त मागणी असते. अलीकडे बदलते हवामान, कीड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे गहू उत्पादनावर (Wheat Production) परिणाम होत आहे. गहू पिकावर पडणाऱ्या अनेक रोगांपैकी तांबेरा (Rust) हा गव्हावरील प्रमुख नुकसानकारक रोग आहे.

पण आता यापेक्षाही अधिक नुकसानकारक असानाऱ्या नविन रोगाची भर पडली आहे. या रोगामुळे जगभरातील गहू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दक्षिण अमेरिकेत अनेक भागात पहिल्यांदाच गहू पिकावर मॅग्नापोर्ट ओरिझे या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला. या बुरशीमुळे गव्हावर व्हीट ब्लास्ट या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

एकदा का या बुरशीने पिकामध्ये शिरकाव केला की पूर्ण पीक जाळून टाकावे लागते. यावरुन या रोगाची भीषणता लक्षात येईल.

जगभरात ठिकठिकाणी गहू पिकावर या रोगाचा फैलाव होत आहे. या रोगाची सुरुवात नेमकी कुठून झाली, प्रसार कसा झाला याशिवाय यावर काय उपाययोजना करता येतील याविषयी जगभरातील शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.

व्हीट ब्लास्ट या रोगाच्या मॅग्नापोर्ट ओरिझे बुरशीच्या नमुन्यांचे जीनोमिक विश्लेषण केल्यावर असे दिसून आले की, ही बुरशी एकाच कुटुंबातील आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ११ एप्रिल २०२३ रोजी प्लॉस बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.

आता जगभरातील गहू पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा इशारा संशोधकांनी अभ्यासातून दिला आहे. या रोगाचे जिवाणू बुरशीनाशकांना देखील प्रतिरोधक आहेत.

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे या बुरशीचा परिणाम केवळ गहूच नाही तर इतर प्रमुख धान्य पिकांवरही होण्याची शक्यता आहे. या रोगामुळे गहू उत्पादक देशातील गहू लागवड धोक्यात येऊ शकते त्यामुळे जगातील गहू उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

असे, ब्रिटनमधील नॉर्विच येथील सेन्सबरी लॅबोरेटरीतील वनस्पती पॅथॉलॉजिस्ट निक टॅलबोट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Wheat Blast

जीनोमिक विश्लषणातून रोगाचे निदान

जीनोमिक विश्लषणातून या रोगाचे निदान लवकर आणि अचूकपणे करता येते, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव नेमका कुठून झाला याचा शोध लागू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय शोधण्यास मदत होऊ शकेल. मॅग्नापोर्थे ओरिजे बुरशी गवतवर्गीय विशेषत: भात आणि गहू पिकांमध्ये लवकर पसरते.

१९८० च्या दशकात ब्राझीलमध्ये गहू पिकांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर या बुरशीचा प्रादुर्भाव संपूर्ण दक्षिण अमेरिकेत झाला.

काही भागात तर या बुरशीमुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर २०१६ मध्ये आशिया खंडातील बांगलादेशात या व्हीट ब्लास्ट बुरशीजन्य रोगाचा पहिल्यांदा उद्रेक झाला होता. यामुळे गहू उत्पादनात ५१ टक्के घट झाली होती. Wheat Blast

दोन वर्षांनंतर झांबियातील गहू पिकांमध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव आढळून आला.नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासातून शास्त्रज्ञांनी बुरशीच्या ५०० हून अधिक नमुन्यांचे विश्लेषण करून रोगाच्या जिवाणूची उत्पत्ती समजून घेतली.

७१ नमुन्यांचे स्वतंत्र जीनोम सिक्वेंसिंग केल्याने २०१६ मध्ये बांगलादेश आणि २०१८ मध्ये झांबियामध्ये आढळलेल्या गव्हातील बुरशीजन्य रोगाचे जिवाणू हे दक्षिण अमेरिकेत अढळलेल्या रोगाचेच असल्याचे ओळखण्यास मदत झाली. मानवाद्वारेच या रोगाच्या जिवाणूचा प्रसार होत असण्याची शक्यता आहे.

रोगाचा प्रसार कसा झाला ?

रोगकारक बियाण्यामुळे ही या रोगाचा प्रसार झाला असावा. कारण बांगलादेशात प्रादुर्भाव होण्यापूर्वी ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात गव्हाचे बियाणे आयात करण्यात आले होते. यातूनही या रोगाचा प्रसार नेमका कुठून झाला हे स्पष्ट होत नाही.

संपूर्ण बांगलादेशात व्हीट ब्लास्ट रोगाच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी या रोगाच्या जगभऱातील जीनोमिक माहितीचा वापर केला जात आहे. या माहितीचा उपयोग व्हीट ब्लास्ट रोगाला प्रतिकारक वाण तयार करण्यासाठी होऊ शकतो.

हा रोग बुरशीनाशकास संवेदनशील आहे मात्र या रोगाचे जिवाणू लगेच म्युटेशनद्वारे प्रतिकार निर्माण करु शकतात असे संशोधनातून दिसून आले आहे. अशी माहिती बांगलादेशातील गाझीपूर येथील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान कृषी विद्यापीठातील पर्यावरण रसायनशास्त्रज्ञ तोफाजल इस्लाम यांनी दिली.

गहू पिकातील कीड व रोगांमुळे सरासरी उत्पादनात २१ टक्क्यांहून अधिक घट होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील वाढ यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, जगात अन्नसुरक्षेचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

वातावरणातील बदल आणि कीड, रोग या घटकांच्या एकत्रित परिणामामुळे कोट्यवधी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात. त्यामुळे उशीर होण्याआधीच व्हीट ब्लास्ट या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय शोधन्याची गरज आहे.

source:agrowon

new disease on wheat

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top