कृषी महाराष्ट्र

यंदा मुगाचे भाव टिकून राहण्याचा अंदाज ? वाचा या माघचे कारण

यंदा मुगाचे भाव टिकून राहण्याचा अंदाज ? वाचा या माघचे कारण

यंदा मुगाचे भाव

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयापेंड (Soya meal) आणि सोयाबीनचे दर (Soybean Rate) तेजीत आहेत. आज सोयापेंडने चालू हंगामातील (Soya meal Season) उच्चांकी दराचा टप्पा गाठला. आज दुपारपर्यंत सोयापेंडचे वायदे ४८८ डाॅलरवर होते. तर सोयाबीन १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

देशातील दर मात्र आजही दबावात होते. आजही सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र पुढील काळात सोयाबीनचे दर वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दर दबावातच

देशातील कापूस बाजारात (Cotton Market) आजही दर (Cotton Rate) कायम होते. मात्र दुसरीकडे कापसाची आवक घटली आहे. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार कायम आहेत. सीबाॅटवरील वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

सध्या देशातील कापूस दर दबावात असले तरी पुढील काळात कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) चिंचेची आवक वाढतेय

राज्यातील काही बाजारांमध्ये सध्या चिंचेची आवक सुरु झाली. मात्र आवकेचे प्रमाण कमी आहे. तसेच थंडी आणि बदलत्या वातावरणामुळे चिंचेला मागणी कमीच असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

त्यामुळं सध्या चिंचेचे दर दबावात आहेत. सध्या चिंचेला प्रतिक्विंटल ५ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात चिंचेची आवक वाढण्याचा अंदाज असून दर कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) हिरव्या मिरचीचे दर तेजीत

हिरव्या मिरचीला सध्या चांगला दर मिळत आहे. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता हिरव्या मिरचीची आवक घटली आहे.

पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक या बाजार समत्या वगळता इतर बाजारांमधील आवक सरासरी २० क्विंटलपेक्षाही कमी आहे.

त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपये दर मिळतो आहे. पुढील काळात मिरचीचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) यंदा देशातील मूग उत्पादन किती होऊ शकते ?

देशातील बाजारात सध्या मुगाचे दर हमीभावाच्या दरम्यान आहेत. केंद्राने यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केला. यंदा देशात खरिपातील मूग लागवड गेल्यावर्षीपेक्षा काहीशी कमी होऊन ३३ लाख हेक्टरवर पोचली. लागवड कमी झाल्यानंतरही पावसाचा पिकाला फटका बसला होता.

महत्वाच्या मूग उत्पादक राज्यांमध्ये पिकाचं नुकसान वाढल्यानं यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. गेल्या खरिप हंगामात मुगाचे जवळपास १५ लाख टन उत्पादन झाले होते. तर यंदाचं उत्पादन वाढून १७ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला.

मात्र उद्योगांच्या मते यंदा उत्पादन कमीच राहील. तसचं रब्बी हंगामातील मूग उत्पादनाबाबतही सकारात्मक अशी स्थिती नाही. त्यामुळं यंदा मुगाची आयात वाढण्याचा अंदाज आहे. सध्या बाजारात मुगाला ६ हजार ८०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

चांगल्या गुणवत्तेच्या मुगाचा सध्या देशात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळं या मुगाला जास्त भाव मिळत आहे. तर पुढील काळातही गुणवत्तापूर्ण मुगाचे दर ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात.

सरासरी गुणवत्ता असलेला मुगाचे भाव यंदा हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top