Cotton Crop Bollworm : गुलाबी बोंडअळीला दूर ठेवण्यासाठी महत्वाचे तीन उपाय ! वाचा सविस्तर माहिती
Cotton Crop Bollworm :- गेल्या काही वर्षापासून कपाशीवर गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. कारण गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कितीही प्रमाणात उपाययोजना केल्या तरी सर्व निरर्थक ठरतात.कारण या अळ्या कपाशीच्या बोंडामध्ये राहतात व आतून त्या बोंडाचा गर खातात व कापसाचे प्रत खालावते. कपाशीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गुलाबी बोंडअळी ही सर्वात घातक कीटक समजली जाते.
म्हणून नुकसान टाळायचे असेल तर फवारणी शिवाय काही एकात्मिक व्यवस्थापनाच्या पद्धती अवलंबल्या तर नक्कीच फायदा मिळू शकतो. याच दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण गुलाबी बोंड आळीला फवारणी विना कसा अटकाव करता येऊ शकतो? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. Cotton Crop Bollworm
गुलाबी बोंडअळीचा अटकाव करण्यासाठी महत्त्वाचे उपाय
1- कामगंध सापळ्यांचा वापर-
सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस नाहीये परंतु ढगाळ वातावरण दिसून येत आहेत. अशा वातावरणामुळे बोंड आळीचे पतंग कपाशीमध्ये फिरताना दिसतात. कारण या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी कापसाला पाते व फुले तसेच बोंडे लागत असल्यामुळे यामध्ये या अळीचे मादी पतंग अंडी घालतात व त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
यावर नियंत्रण म्हणून कपाशीचे व्यवस्थित निरीक्षण करून गुलाबी बोंड अळी असलेल्या डोमकळ्या तोडणे व त्या जाळून किंवा जमीनीत पूर्ण नष्ट करणे हा एक चांगला उपाय आहे. तसेच एका हेक्टरमध्ये पाच कामगंध सापळे पिकाच्या उंची पेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावणे महत्त्वाचे ठरते. पतंगाचे प्रमाण जास्त असेल तर एक हेक्टरमध्ये आठ ते दहा कामगंध सापळे लावावेत.
2- जैविक नियंत्रण ठरेल महत्वाचे-
जैविक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जर ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटक बोंड अळ्या खातात. त्यामुळे हे कीटक देखील खूप महत्त्वाचे ठरतात. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर एका एकर मध्ये दोन किंवा तीन ट्रायको कार्ड लावले तरी फायदा मिळतो. परंतु कपाशी पिक साठ दिवसाचे झाल्यावर ट्रायकोकार्ड लावणे गरजेचे आहे. परंतु शेतामध्ये जर ट्रायकोकार्ड लावले तर दहा दिवस कुठल्याही प्रकारची फवारणी करू नये. हे कार्ड तुम्हाला तुमच्या विभागाच्या कृषी विद्यापीठात मिळू शकते.
3- शेतात पक्षीथांबे उभारावे-
बोंड आळीला रोखण्याचा एक सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे पक्षी थांबे लावणे हे होय. म्हणजे यावर पक्षी बसतात व शेतामधील अळ्या खातात. याशिवाय पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन 1500 पीपीएम 500 मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीमध्ये ओल आणि हवेमध्ये आद्रता असताना 800 ग्राम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.
source : krishijagran