कृषी महाराष्ट्र

शेतीत बैलांचा वापर पुन्हा वाढतोय !

शेतीत बैलांचा वापर पुन्हा वाढतोय !

शेतीत बैलांचा वापर

शेतीमध्ये आता बैलांचा वापर कमी झालाय. बैलांऐवजी ट्रॅक्टर (Tractor) आणि इतर यंत्रांचा वापर वाढत चाललाय. पूर्वी शहरात बैलपोळ्याच्या दिवशी मातीचे बैल आणून घरात सण साजरा केला जायचा. आता अनेक शेतकऱ्यांच्याही दावणीला बैल उरलेला नाही….

गेल्या काही वर्षांत भारतीय शेतीचं हे वास्तव आहे. परंतु हे चित्र आता हळूहळू बदलू लागलं आहे. शेतीत पुन्हा बैलांचा वापर वाढू लागला आहे.

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् जिल्ह्यातील सांगरा गावातील सिंहाचलम या शेतकऱ्याचं उदाहरण बोलकं आहे. सिंहाचलम बैलचलित फवारणी आणि पेरणी यंत्राचा वापर करतात. ते प्रत्येक हंगामात आपली बैलजोडी घेऊन आजूबाजूच्या गावांत जातात. तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतात काम करतात. त्यातून त्यांना चांगला मोबदला मिळतो.

देशाच्या इतर भागांप्रमाणेच या आदिवासी खेड्यांतील बैलांचा वापर पारंपरिक पद्धतीने केवळ नांगरणी आणि वाहतुकीसाठी केला जातो. पण सिंहाचलम आपल्या बैलांचा उपयोग तण काढण्यासाठी आणि फवारणीसाठी करतात.सिंहाचलम यांनी २०१८ मध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमात बैलचलीत तण नियंत्रण यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

सिंहाचलन प्रत्येक हंगामात १५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तणनाशकाची फवारणी करतात. १ हेक्टर क्षेत्रावरील तण नियंत्रणासाठी ७५० रुपये मजुरी घेतली जाते. या कामासाठी त्यांना ६ तास लागतात. तर मजुरांकडून हे काम करुन घेण्यासाठी दोन दिवस लागतात.

तण काढण्यासाठी मजुरीवर सुमारे १६०० रुपये खर्च येतो. सिंहाचलम यांनी २०२१ साली बैलचलित पेरणी यंत्र चालविण्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. सिहाचलम यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनाही शेतीतील बैलाचे महत्व कळत आहे.

यांत्रिकीकरणाचा बैलांवर परिणामशेतीकामात ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांनी बैलांची जागा घेतली. त्यामुळे शेतीमध्ये बैलाचा वापर कमी होत गेला.

वॉटरशेड सपोर्ट सर्व्हिसेस अँड अॅक्टिव्हिटीज नेटवर्कचे (वासॅन) ही संस्था बैलचलित यंत्रांचा वापर करून विविध शेतीकामे करण्याचे प्रशिक्षण देते. या संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक एम.एल.सन्यासी राव म्हणतात की, विशाखापट्टणम् जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे बैल आहेत.

आम्ही शेतीमध्ये त्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे लहान शेतकऱ्यांना कमी खर्चात वेळेवर शेतीची कामं करणं शक्य होईल.

भारतीय शेतीचं तुकडीकरण झालं आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठी यंत्रे वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे पुन्हा शेतीमध्ये बैलाचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी सिंहाचलम सारखे शेतकरी मार्गदर्शक ठरत आहेत.

१९९७ ते २०१९ दरम्यान जाहीर झालेल्या पशुधन गणनेनूसार भारतात १९६१ साली शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण प्राण्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक संख्या बैलांची होती.

शेतीकामाठी खर्च होणाऱ्या एकूण ऊर्जेच्या गरजेच्या ७१ टक्के भाग बैलांकडून भागवला जात होता. १९९१ पर्यंत ही संख्या २३.३ टक्क्यांवर आली.

शेतीकामात बैलांचा वापर कमी झाल्यामुळे बैलांची संख्या सातत्याने घटत गेली. ताज्या पशुधन गणनेनुसार, भारतात ३० दशलक्षाहून अधिक बैलांकडून कष्टाची कामे करुन घेतली जात होती.

१९९७ च्या तुलनेत ही संख्या जवळपास निम्मी आहे. शेती आधुनिक करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला. त्यासाठी अनेक राज्यांमध्ये ट्रॅक्टर खरेदीवर सबसिडी देण्यात आली.

आज ट्रॅक्टर कंपन्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत. पण शेतीकामासाठी प्राण्यांचा वापर कमी झाल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन ग्रोथ युटिलायझेशन ऑफ अॅनिमल एनर्जी’ (एआयसीआरपी) या प्रकल्पाचे समन्वयक एम. दीन यांनी सांगितले.

मते यांत्रिकीकरणामुळे देशातील मोठ्या शेतकऱ्यांना फायदा झाला असला, तरी २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडणारे नाही.

बैलचलित यंत्र फायदेशीर

भारतात भरडधान्यांचा पेरा वाढत आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बैलांचा वापर वाढत आहे.

पूर्वी आदिवासी भागातच भरडधान्य घेतली जायची. आता मात्र अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी सरकारने भरडधान्य लोकप्रिय करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे भरडधान्यांचे क्षेत्र वाढत आहे.कर्नाटकातील रायचूर येथील कृषी विद्यापीठाने बैलांचा कार्यक्षम वापर करून अनेक अवजारे तयार केली आहेत.

बैलचलित फवारणी यंत्राविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या फवारणी यंत्राची किंमत ९० हजार रुपये असून राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान उपलब्ध आहे. रायचूरमध्ये आता पेरणीसाठी ३० टक्के क्षेत्रावर बैलांचा वापर केला जात आहे, असे सहायक कृषी अभियंता के.व्ही.प्रकाश यांनी सांगितले.

कापूस पिकामध्ये पारंपारिक फवारणीच्या तुलनेत मजुरीवरील खर्चात सुमारे ५६ टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील बीड आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्येही बैलचलित फवारणी यंत्र लोकप्रिय झाली आहेत. या यंत्राने एकाच वेळी ०.६ मीटर पर्यंत फवारणी करता येते.

०.४ हेक्टर क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी सुमारे २०-२५ मिनिटे लागतात. बीडमधील पाटण मांडवा गावातील शेतकरी महादेव रुद्राक्ष आपल्या १.६ हेक्टर शेतावर ज्वारी, सोयाबीन आणि तुरीची लागवड करतात. त्यांच्याप्रमाणेच गावातील सुमारे दोनशे अल्पभुधारक शेतकरी बैलचलित फवारणी यंत्र वापरत आहेत.

रायचूर येथील संशोधन केंद्राने बैलाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक आहार देखील विकसित केला आहे. बैलांना हा आहार दिल्यामुळे बैलांचा थकवा कमी होतो, असा या केंद्राचा दावा आहे. या केंद्राकडून बैलचलित बी पेरणी यंत्राच्याही चाचण्या घेतल्या जात आहेत.

त्याचा उपयोग लहान आकाराचे बियाणे पेरण्यासाठी होऊ शकतो. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी बैलचलित दालमील आणि पीठ गिरणीचा वापर करतात.

या कृषी उद्योजकांना स्थानिक बैलमालक आपले बैल भाड्याने देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात मदत होत आहे.

रायचूर येथील संशोधन केंद्राने एक बैलगाडी देखील विकसित केली आहे. जेव्हा ती फिरते तेव्हा वीज तयार होते. ही वीज गाडीखाली ठेवलेल्या बॅटरीमध्ये साठवली जाते. या बैलगाडीमध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top