कृषी महाराष्ट्र

उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र

उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र

उसासाठी पाणी व्यवस्थापन

जमिनीमध्ये उसाच्या (Sugarcane) मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर व ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. पक्वतेच्या कालावधीत भरपूर पाणी दिल्यास उसाची शाखीय वाढ सुरू राहते व साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. हे लक्षात घेऊन उस पिकाला वाढीच्या टप्यानुसार पाणी देणे फायदेशीर ठरते.

ऊस पक्वतेच्या कालवधीत पिकास थोडा पाण्याचा ताण दिल्यास उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. या कालावधीमध्ये उसाच्या वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण ७४ ते ७६ टक्के असावे. पक्वतेच्या कालावधीत भरपूर पाणी दिल्यास उसाची शाखीय वाढ सुरू राहते व साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. पाण्याचा जास्त ताण पडल्यास ऊस वाढ खुंटते व साखर उत्पादन कमी होते. कमी पाण्यामुळे जमिनीस भेगा पडल्यास मुळांची वाढ खुंटते.

ठिबक सिंचनाखाली ऊस पिकाची पाण्याची गरज

उसाची पाण्याची गरज काढण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.

ईटीसी = ईटीओ × केसी

ईटीओ = पीई × के पॅन

जिथे,

ईटीसी = पिकाची पाण्याची गरज (मिमी /दिन)

ईटीओ = संदर्भीय बाष्पोत्सर्जन (मिमी /दिन)

केसी = पीक गुणांक (क्रॉप कोईफिशंट)

पीई = उघड्या यूएस क्लास ए पॅनमधील बाष्पीभवन (मिमी /दिन)

के प्यान = पॅन कोईफिशंट (याची किंमत सरासरी ०.८ पकडली जाते)

मुळांची वाढ आणि पाणी शोषण्याची क्रिया

पोषक वातवरणात ऊस लागण केल्याच्या तिसऱ्या दिवसापासून उसावरील डोळे फुगू लागतात व कांडीला मुळ्या सुटण्यास सुरुवात होते. सेटरूट्सची वाढ झपाट्याने म्हणजे २४ मि.मी. प्रति दिन या वेगाने होते, आणि या मुळांची लांबी १५० ते २५० मि.मी. झाल्यानंतर ही वाढ थांबते. ही मुळे कालांतराने काळी होतात, कुजून जातात व लागणीनंतर ८ आठवड्यांनी नाहीशी होतात.

उसाच्या उगवणीबरोबरच जमिनीमध्ये शूट रूट्स निघायला सुरुवात होते. पहिली निघालेली शूट रूट्स सेट रूट्सच्या मानाने जाड असतात. शूट रूट्स जमिनीमध्ये वेगाने वाढतात व नंतर त्यास फुटवे येऊन झपाट्याने त्यांची वाढ होते. शूट रूट्स वाढण्याचा जास्तीत जास्त वेग ७५ मि.मी. प्रति दिन इतका सुरुवातीच्या एक, दोन दिवसांत असतो व नंतर एक आठवड्याने तो ४० मि.मी. प्रति दिन इतका असतो.

जमिनीमध्ये मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर व ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. उदा. ३० सेंमी खोलीमध्ये ४८ ते ६८ टक्के मुळे, ३० ते ६० सेंमी खोलीवर १६ ते १८ टक्के मुळे, ६० ते ९० सेंमी वर ३ ते १२ टक्के मुळे, ९० ते १२० सेंमी वर ४ ते ७ टक्के मुळे, १२० ते १५० सेंमी वर १ ते ७ टक्के मुळे व १५० ते १८० सेंमी खोलीवर ० ते ४ टक्के मुळे असतात.

– अरुण देशमुख,
९५४५४५६९०२,
(उपसरव्यवस्थापक व प्रमुख,
कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)

श्रोत :- agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top