कृषी महाराष्ट्र

पाणथळ, क्षारवट, चोपण जमिन व्यवस्थापन तंत्रज्ञान

पाणथळ, क्षारवट, चोपण जमिन व्यवस्थापन तंत्रज्ञान

 

भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन सुपीक जमिनी क्षारपड व पाणथळ होऊन नापीक होत आहेत.

जमिनीच्या सामू नूसार जमिनीचे प्रकार पडतात. म्हणून कोणत्याही जमिनीचे व्यवस्थापन (Soil Management) करणे म्हणजे त्या जमिनीचा सामू नियंत्रित ठेवणे होय. आपल्याकडे वातावरणाप्रमाणे मातीतही विविधता आढळून येते. यात चोपण जमीन, (Saline Soil) क्षारपड जमीन यांसारखे प्रकार दिसून येतात. भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन सुपीक जमिनी क्षारपड व पाणथळ होऊन नापीक होत आहेत. अशा जमिनीची सुधारणा करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पाणथळ, क्षारवट आणि चोपण जमिन व्यवस्थापनाविषयी दिलेली माहिती पाहुया.

सुरुवातीला जमिनीला योग्य प्रमाणात उतार द्यावा. उतार ०.२ ते ०.४ टक्के या प्रमाणात देऊन जमिनीचे सपाटीकरण करून घ्यावे.

क्षारवट जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच ज्या जमिनी पाणथळ असतील त्या जमिनीतील जास्तीचे पाणी शेतातून बाहेर काढण्यासाठी जमिनीच्या उताराला ठराविक अंतरावर आडव्या नाल्या पाडून त्या उताराच्या दिशेने मुख्य सांड नाली काढून तिला जोडाव्यात. जेणेकरून शेतातील जास्तीचे पाणी जमिनीत न साठता शेताबाहेर निघून जाईल.

या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होणे आवश्यक असते. याकरिता जमिनीत १.३ मीटर खोलीवर, ७५ मीटर अंतराने, ८० मीमी व्यासाच्या सच्छिद्र वेटोळेयुक्त पीव्हीसी पाईप गाडून त्या पाईप भोवती सर्वसाधारण ५ सेमी गिट्टी, ७.५ सेमी जाड वाळू आणि ७.५ सेमी बारीक वाळूचे आच्छादन तयार करावे. खोदकामाच्या वेळी काढलेल्या मातीने बुजवून घेतल्याने जमिनीच्या पोटातून पाण्याचा निचरा चांगला होतो.

जेथे गिट्टी आणि वाळूची उपलब्धता मर्यादित असेल त्या ठिकाणी गिट्टी आणि वाळूच्या थराऐवजी जिओटेक्स्टाईल चा म्हणजेच तलम कापडाचा वापर केल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो.

चोपण जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सतत तीन वर्ष प्रती हेक्टरी पाच टन याप्रमाणे जमिनीत जिप्सम चा वापर करावा.

उन्हाळ्यात हिरवळीचे पीक घ्यावे. उसाचे पाचट हेक्टरी पाच टन बारीक करून जमिनीत मिसळावे .अशा जमिनीत पिकाला शिफारस केलेल्या मात्रे पेक्षा २५ टक्के जास्त नत्राची मात्रा द्यावी.

सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा. चोपण जमिनीत २५ किलो झिंक सल्फेट प्रती हेक्टरी द्यावे.

बियाण्याची उगवणशक्ती कमी होत असल्याने २५ ते ३० टक्के जास्त बियाणे वापरावे. अशा जमिनी सुधारण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागतो तेव्हा या काळात सुरुवातीला बरसिम, साळ, गहू, ढेंचा अशा पिकांची क्रमवारी सर्वात उपयुक्त ठरते. त्यानंतर मध्यम क्षार सहनशील पिके घ्यावीत. यामध्ये कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, मका, करडई, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी पिकांचा समावेश होतो.

श्रोत :- agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top