कृषी महाराष्ट्र

Chat GPT : ‘चॅट जीपीटी’ काय आहे ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा ?

Chat GPT : ‘चॅट जीपीटी’ काय आहे ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा ?

Chat GPT

अलीकडे तुम्ही ‘मशीन लर्निंग’ (Machine learning) असा शब्द ऐकला असाल किंवा ‘एआय’ (AI) हा शब्द तरी तुमच्या कानावर पडलाच असेल. ‘एआय’ म्हणजे ‘आर्टिफिशयल इंटेलिजन्स’ (Artificial Intelligence). याला मराठीत कृत्रिम बुद्धीमत्ता असे म्हणतात.

या मध्ये माहितीच्या साठ्याच्या आधारे तुम्हाला विशिष्ट माहिती अवघ्या सेकांदात मिळू शकते. किंवा एखादे कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे यंत्र तुम्ही दिलेल्या सुचनेनुसार काही तासांचे काम अवघ्या काही मिनिटात करू शकते. याचं उदाहरण म्हणजे ड्रोन फवारणी (Drone spraying).

अशाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘ओपन एआय’ (Open AI) या कंपनीने ‘चॅट जीपीटी’ (Chat GPT) हे संभाषण करणारे अॅप तयार केले आहे. यालाच इंग्रजीत चॅटबॉट (Chatbot) असेही म्हणतात. यामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही सेकंदात मिळते.

‘ओपनएआय’ कंपनी कुणाच्या मालकाची ?

इलॉन मस्क (Elon Musk) आणि आत्ताचे ओपनआयचे सीईओ सॅम अल्टमन (CEO Sam Altman) यांनी या कंपनीची स्थापना केली. परंतू २०१८ मध्ये काही कारणांमुळे मस्कला कंपनीमधून काढून टाकण्यात आले.

अलीकडेच म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये या कंपनीने चॅट जीपीटी ही अॅप वापरण्यासाठी खुले केले आहे.

‘चॅट जीपीटी’चा शेतीत वापर होऊ शकतो का ?

शेतकऱ्यांना किडरोगांची नावे, त्यावर फवारणी करायची किटकनाशकाची नावांची अनेकदा माहित नसतात. अशावेळी विक्रेता देईल तीच कीटकनाशके वापरण्यात येतात किंवा एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा लागतो.

मात्र यामध्ये बराच वेळ जातो. तसेच पिकांच्या अवस्थेनुसार कोणती खते किंवा पोषक घटक पिकाला दिले पाहिजे, अशा महत्त्वाची माहितीही वेळेवर मिळत नाही.

मात्र शेतकरी ‘चॅट जीपीटी’च्या मदतीने हवी ती माहिती सहज मिळवू शकतात. उदा. तुमच्या पिकावर एखाद्या किडरोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर कोणते कीटकनाशक फवारले पाहिजे, याचे उत्तर चॅट जीपीटी देऊ शकते.

त्यामुळे शेती क्षेत्रातही चॅट जीपीटीचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना माहितीचे भांडार खुले झाले आहे. (Chat GPT)

‘चॅट जीपीटी’चा वापर कसा करायचा ?

‘चॅट जीपीटी’ हा कृत्रिम बुद्धीमत्ता असणारा चॅटबॉट आहे. तो एक एआयचा प्रोग्राम आहे. त्यामुळे त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या साठयातून तो तुमच्या प्रश्नांवर उत्तरे देतो. https://chat.openai.com/chat या वेबसाईटवर जाऊन सर्वात आधी तुम्हाला तुमचं खातं उघडावं लागेल.

त्यानंतर पुन्हा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला याचा वापर कसा करावा याच्या काही सूचना दिसतील आणि नंतर खाली एक पट्टी दिसेल ज्यात तुम्ही या चॅटबॉटला हवे ते प्रश्न विचारू शकता. यामध्ये तुम्ही कोणत्याही विषयावरील प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळवू शकता.

अडचणी काय आहेत ?

सध्या ‘चॅट जीपीटी’ पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्याच्याकडे २०२१ च्या आधीची माहिती उपलब्ध आहे. तसेच त्याची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे.

त्यामुळे इंग्रजी भाषा समजत नाही अशा व्यक्तीना अॅप वापर करता येत नाही. मात्र किमान इंग्रजी भाषा समजत असेल तर गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून प्रश्न उत्तरे ट्रान्सलेट करून वापर करता येईल.

मात्र ओपनएआय या कंपनीने चॅट जीपीटी हळूहळू अधिक अपडेट करायचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आत्ता भेडसवणाऱ्या समस्या कमी होऊ शकतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

शेतीचे भविष्य एआय ?

हवामानबदल, मजूर टंचाई तसेच पाणी आणि रासायनिक खतांच्या वारेमाप वापरामुळे कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहेत.

यावर तोडगा काढण्यासाठी जगभर ‘एआय’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर महत्त्वपूर्ण मानला जात आहे. चॅट जीपीटी याच कृत्रिम बुद्धीमत्तेचा एक भाग आहे.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top