कृषी महाराष्ट्र

उत्पादनवाढीसाठी भुईमूगाची योग्य जात कोणती ठरेल ?

उत्पादनवाढीसाठी भुईमूगाची योग्य जात कोणती ठरेल ?

उत्पादनवाढीसाठी भुईमूगाची

विविध पिकासाठी हवामानानूसार, बियाण्यानूसार पिक पद्धती ठरवलेली असते. त्यानूसार पिकाचे व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळते. बियाण्याचा प्रकार आकारानूसार बियाण्याचे प्रमाण ठरवले जाते. तेलंगणा राज्यात सुमारे ०.३० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पीके घेतली जातात. यापैकी भुईमूगाचे (Groundnut Sector) क्षेत्र मोठे आहे. येथील मोठ्या आकाराच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. परंतु कमी उत्पादन, निकृष्ठ बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव तसेच कमी बाजारभावामुळे गेल्या काही वर्षात येथील भुईमूगाचे उत्पादन कमी झाले आहे.

भुईमूगाचे उत्पादन वाढविण्यासाठी तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ आणि हैद्राबाद येथील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंन्स्टीट्यूट फॉर द सेमी एरीड ट्रॉपीक्स (इक्रिसॅट) ने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत तेलंगणा राज्यातील विविध भागामध्ये भुईमूगाच्या कोणत्या जाती अधिक चांगल्या प्रकारे येऊ शकतात अशा जातींचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी राज्यातील ८० ठिकाणे प्रात्यक्षिकासाठी निवडण्यात आली आहेत. यातून ज्या भुईमूगाच्या जाती अधिक चांगल्या पद्धतीने येतील त्या जातींची शिफारस केली जाणार आहे.

भुईमूगाची एक एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी सुमारे ८०-१०० किलो बियाणे लागते. शेतकऱ्यांना लागवडीसाठी भुईमूगाचे शुद्ध बियाणे उपलब्ध होत नाही त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता हे प्रमुख आव्हान आहे. या समस्येवर उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. असे पालेम जि. नगरकुरनूल येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ सुजाता यांनी सांगीतले.

दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्था बियाणे उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करणार आहेत. सुरुवातीला दोन्ही संस्थांद्वारे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उत्पादन तंत्राची माहिती प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. इक्रिसॅट ने विकसीत केलेल्या भुईमूगाच्या गिरनार ४ आणि गिरनार ५ या जातींचाही या उपक्रमांतर्गत प्रसार केला जाणार आहे. भुईमूगाच्या गिरनार ४ आणि गिरनार ५ या भुईमूगाच्या जातींमध्ये ओलिक अॅसिड चे प्रमाण सर्वात जास्त आहे.

गिरनार ४ आणि गिरनार ५ या जातीच्या शेंगा आणि तेलाची शेल्फ लाईफ जास्त आहे. त्यामुळे या जातींच्या भुईमूगाच्या निर्यातीला चांगला वाव आहे. त्यामुळे दक्षिण तेलंगणामध्ये या जातींचा प्रसार होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. या जातींसाठी आवश्यक पीक व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम घेतले जातील. ज्यातून भुईमूग उत्पादनात वाढ होईल असे रार्स-पालमच्या दक्षिण तेलंगणा झोनचे संशोधन विभागाचे सहयोगी संचालक एम. गोवर्धन यांनी सांगितले.

लागवड माहिती

भुईमूग लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित व सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. अशा जमिनीत आऱ्या सहज जाऊन शेंगा चांगल्या पोसतात. जमिनीमध्ये हवा खेळती राहून, मुळांना भरपूर हवा मिळते. मुळावरील नत्रांच्या गाठींची वाढ होते. भारी चिकण मातीच्या जमिनी ओलसरपणा कमी झाल्यावर कडक होतात. तसेच काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहण्याची शक्‍यता असते. अशा जमिनीत भुईमुगाची लागवड करू नये.

रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. लागवडीसाठी एस.बी. – ११, टी.ए.जी. – २४, टी.जी. – २६ या जातींचे हेक्‍टरी १०० किलो बियाणे लागते. तर फुले प्रगती, फुले व्यास, फुले उनप, जे.एल. – ५०१, फुले भारती या जातींचे हेक्‍टरी १२० ते १२५ किलो बियाणे लागते. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून त्वरित पेरावे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागून उगवण चांगली होते.

source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top