PM Kisan Installment : पीएम किसान अंतर्गत ६ ऐवजी ८ हजार मिळणार ? निवडणुकांच्या तोंडावर निर्णयाची शक्यता
PM Kisan Installment : २०१९ पासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. याचबरोबर आगामी काळात ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे.
सरकार पीएम किसान योजनेंतर्गत मिळणारी ६ हजार रुपयांची रक्कम ८ हजार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार केंद्र सरकार मदत रकमेत एक तृतीयांश वाढ करण्याच्या योजनेवर विचार करत आहे. या विषयावरील चर्चेशी परिचित असलेल्या दोन अधिकार्यांच्या मते, पीएम किसान योजनेंतर्गत, सरकार शेतकर्यांसाठी वार्षिक ६ हजार रुपयांवरून ८ हजार रुपयांपर्यंत मदतीची रक्कम वाढवणार असल्याचे समजते.
पीएम किसान योजनेंतर्गत रक्कम वाढवण्याचा निर्णय मंजूर झाल्यास या योजनेवर सरकारला २० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पीएम किसानच्या रक्कमेत सध्या वाढ करण्याचा विचार तज्ज्ञांच्या मत आहे. अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते नानू भसीन यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.
डिसेंबर २०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून मोदी सरकारने ११ कोटी शेतकऱ्यांना एकूण २.४२ लाख कोटी रुपये दिले आहेत. तज्ञांनी सांगितले की अधिकारी आता थेट रोख हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत अधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी नियम शिथिल करण्याचा विचार करत आहेत. या प्रस्तावांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.