दूध उत्पादकांची लूट थांबणार ? मिल्कोमीटर वापरणे झाले बंधनकारक : वाचा संपूर्ण
दूध उत्पादकांची लूट
Milk Collection : दूध संकलन केंद्रांवर (Milk Collection Center) प्रमाणित केलेले मिल्कोमीटर वापरावे लागतील व वजन काटे आणि मिल्कोमीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे.
तसेच वजन काटे वैधता प्रमाणीकरण विभाग व अन्न व पुरवठा विभाग या दोन शासकीय विभागांना याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूटीला लगाम लागणार आहे.
दूध संकलन केंद्रांवर फॅट व एस.एन.एफ. मोजताना मिल्कोमीटर यंत्राचे चुकीचे सेटिंग करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. वजन करतानाही शेतकऱ्यांना कमी वजन दाखवून लुटले जाते.
या विरोधात किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध केंद्रावर मिल्कोमिट लावण्याची मागणी केली होती. अखेर मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. Milk Rate
अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या निर्णयाचे अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी स्वागत केले.
दूध संकलन केंद्रावरील मिल्कोमीटर व वजन काटे हे सरकारी यंत्रणेच्या मार्फत तपासले पाहिजेत व यासाठी स्वतंत्र निरीक्षकाची नियुक्ती केली पाहिजे, अशी मागणी सातत्याने किसान सभेने लावून धरली होती. त्याचा पाठपुरावाही सातत्याने राज्य सरकारकडे केला जात होता.
नाशिक ते मुंबई दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने मोर्चा काढला होता. या लॉंग मार्चमध्ये सुद्धा ही मागणी घेण्यात आलेली होती. लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेऊन यापुढे सर्व संकलन केंद्रावरील वजन काटे व मिल्कोमीटर शासकीय यंत्रणेमार्फत तपासले जातील, हे निश्चित करण्यात आले होते.
यापुढे दूध संकलन केंद्रांवर प्रमाणित केलेले मिल्कोमीटर वापरावे लागतील व वजन काटे आणि मिल्कोमीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी केली जाणार आहे.
source : agrowon