MGNREGA Scheme : २७८० शेतकऱ्यांनी ‘मनरेगा’ योजनेमधून केली फळबाग लागवड
MGNREGA Scheme
Pune News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) असलेल्या फळबाग लागवडीचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात या योजनेतून पुणे जिल्ह्यातील दोन हजार ७८० शेतकऱ्यांनी दोन हजार २६५.३८ हेक्टरवर लागवड केल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. या योजनेत जाचक निकष असले तरी ‘मनरेगा’तून होणारा लाभ लक्षात घेता या योजनेकडे हळूहळू वळत आहेत.
गेल्या २०२१-२२ मध्ये या योजनेतून पुणे जिल्ह्यातून दोन हजार ६४१ शेतकऱ्यांनी एक हजार ९०० हेक्टरवर लागवड केल्याची नोंद कृषी विभागाकडे केली आहे. त्यातुलनेत गेल्या वर्षी शेतकरी संख्येत व फळबाग क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाल्याने या योजनेकडे शेतकऱ्यांची पसंती वाढत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे या योजनेतून फळबाग लागवडीच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. यंदाही या योजनेत अनेक शेतकरी सहभागी होऊन फळबाग लागवड करतील, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. MGNREGA
पुणे जिल्ह्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून डाळिंब, पेरू, आंबा, चिकू, सीताफळ, लिंबू अशा विविध फळपिकांची लागवड केली आहे. त्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र, रोजगार हमी योजनेतून मागील पाच ते सहा वर्षांपासून अनुदान बंद केले. त्यामुळे या योजनेतून फारशी लागवड झाली नाही.
या कालावधीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीवर भर दिला. परंतु या योजनेतील जाँबकार्ड सारख्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी लागवड करण्याचे सोडून दिले होते.
‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवड (हेक्टरमध्ये)
फळपीक – लागवड क्षेत्र, हेक्टर
आंबा – १४५४.३७
पेरू – १९.७८
डाळिंब- २३.२०
सीताफळ- ५०.४६
अंजीर- १५.२५
नारळ – ६११.२९
कागदी लिंबू- ५.४४
चिंच – ८.७८
बांबू – २०.१५
शेवगा – १६.२५
जांभूळ – ७.६५
निशिगंध – १७.३८
इतर – १५.३८
एकूण- २२६५.३८
मागील काही वर्षांपासून ‘मनरेगा’तून फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल कमी होता. परंतु आता या योजनेचे फायदे लक्षात येत असल्याने या योजनेतून लाभ घेण्याकडे वळत आहे. चालू वर्षी अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.
संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे