लम्पी मुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना तीन कोटींचे अनुदान !
लम्पी मुळे मृत
सोलापूर : लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin) मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना भरपाईपोटी अनुदान (Lumpy Skin Compensation) देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याला तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
राज्यासाठी पंधरा कोटींचा निधी मिळाला असून, त्यापैकी तीन कोटी रुपये एकट्या सोलापूर जिल्ह्याला मिळाले असून राज्यात सर्वाधिक निधी सोलापूरला मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंतच्या अहवालानुसार लम्पी स्कीनमुळे (Lumpy) तीन हजार २७६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ९१० प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख ६ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.
यासंबंधीच्या समितीने मंजूर केलेले, परंतु अनुदान वाटपासाठी प्रलंबित असलेले १ हजार ३७६ प्रस्ताव असून, या प्रस्तावासाठी ३ कोटी ३२ लाख १० हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे.
७८४ प्रस्ताव सध्या मंजुरीसाठी समितीकडे प्रलंबित आहेत. त्यांना आता ही मदत देण्यात येणार आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये २३८७ पशुधन बाधित आहेत. दिवसेंदिवस लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी होतो आहे. ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव अनुदानासाठी पाठवले होते. त्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या तीन-चार दिवसांत अनुदानाची रक्कम जमा होईल.
लम्पी स्किन रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा प्रमुख आहेत. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो. या किटकांच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील उपायांची शिफारस केली आहे.
सर्व साधारणपणे – जनावराला प्रखर उन्हात चरण्यासाठी सोडू नये. जनावरांना सकाळी १० ते ५ पर्यंत गोठयातच ठेवावे.
– शेणाचा उकिरडा किंवा खड्डा शेण टाकल्यानंतर प्लॅस्टिक पेपरने किंवा ताडपत्रीने झाकावा.
– गोठयात स्वच्छता ठेवावी.
– जनावराच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने ५ टक्के निम अर्क किंवा वनस्पतीजन्य १० मिली निम तेल + १० मिली निलगीरी तेल + १० मिली करंज तेल + २ ग्रॅम अंगाचा साबण १ लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण फवारावे.
गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावीत. गोठ्यातील पृष्ठभागावरिल व भिंतीवरिल भेगा फ्लेमगनने जाळाव्यात जेणेकरुन भेगांमध्ये किटकांनी घातलेली अंडी जाळली जातील.
– आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.
– रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावराचे लसीकरण करून घ्यावे.
source : agrowon.com