बीटी कापसाचे वाण निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ? वाचा सविस्तर
बीटी कापसाचे वाण
Kharif Season 2023 : महाराष्ट्रातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचे नगदी पीक (Cash Crop) म्हणून कापूस पिकाकडे (Cotton Crop) पाहील जातं. खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास २७ टक्के क्षेत्र एकट्या कापूस पिकाखाली येते.
राज्यातील कापसाचे जवळपास ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू लागवडीखाली येतं. शिवाय पावासाचा अनियमीतपणा, योग्य लागवड पद्धतीचा आभाव आणि कीड,रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कापूस पीकाची उत्पादकता (Crop Productivity) कमी येते.
सध्याच्या परिस्थितीत कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते.
यामध्ये कापसाच्या बीटी वाणाची निवड करताना काय काळजी घ्यायची आणि कपाशीतील कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्तापासूनच काय उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती आपण घेणार आहोत.
कापूस पिकाच्या लागवडीमध्ये शेतकरी सातत्याने एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे कापसाच्या कोणत्या बीटी वाणाची लागवड करावी? कापसाचे योग्य वाण निवडताना सर्वात महत्वाच म्हणजे बीटी वाण रसशोषक किडींना सहनशील असावं जेणेकरुन कीड व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येईल.
कोरडवाहू लागवडीसाठी कापसाचे बीटी वाण पाण्याचा ताण सहन करणारे असावे.
सघन लागवडीसाठी आटोपशीर ठेवण, उंची व फांद्यांची लांबी कमी असणारे कापसाचे वाण निवडावे. Cotton Variety
निवडलेले वाण आपल्या भागामध्ये अधिक उत्पादन देणारं असाव. याशिवाय त्याच्या धाग्याचे गुणधर्म सरस असावेत.
कोरडवाहू लागवडीसाठी बीटी कपाशीचे वाण कमी कालावधीचे म्हणजेच १४० ते १५० दिवसात तयार होणारे असावे. मध्यम कालावधीचे म्हणजेच १५० ते १६० दिवस कालावधीचे असावे. तर बागायती लागवडीसाठी बीटी वाणाचा कालावधी १६० ते १८० दिवसांचा असावा.
कपसाच्या बोंडाचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम म्हणजेच ३ ते ४ ग्रॅम तर बागायतीसाठी मोठा म्हणजेच ४ ग्रॅम असावा. Cotton Variety
आता पाहुया कपसातील किडींचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर काय खबरदारी घ्यायची ते…
कापसाच्या पऱ्हाट्या व अवशेषाची शेतात, बांधावर किंवा गावात साठवण केली असेल तर असे अवशेष लगेच नष्ट करावेत.
कपाशीच्या दीर्ष कालावधीच्या वाणाची लागवड करु नये.
पिकाची फेरपालट करावी. कारण बरेच शेतकरी एकाच जमिनीमध्ये दीर्घकाळापासून कापूस हे एकच पीक घेतात. त्यामुळे जमिनीमध्ये कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तसच पिकाचे उत्पादन देखील कमी येतं.
पिकामध्ये शिफारशीपेक्षा अधिक नत्राचा वापर टाळावा.
कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन,चवळी, झेंडू, मका,ज्वारी, राळा, भगर, एरंडी अशी आंतरपिके घ्यावीत.
निंबोळी अर्क बनविण्यासाठी आत्ताच कडुनिंबाच्या बिया म्हणजेच निंबोळ्या जमा करुन वाळवून ठेवाव्यात. अशा प्रकारे खबरदारी घेतल्यास कापसाचे चांगले उत्पादन मिळू शकेल.
रिपोर्ट – डॉ. अरविंद पांडागळे, कापूस संशोधन केंद्र, नांदेड