Market Update : सोयाबीनचे भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटलवर ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या
१) सोयाबीनचे भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटलवर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड बाजारातील सुधारणा आज दुपारपर्यंत कायम होती. सोयाबीनचे वायदे १३.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४०२ डाॅलरवर होते. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात विशेष बदल दिसला नाही. सोयाबीनचे भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलवर होते. आंतरराष्ट्रीय बाजाराला अमेरिकेतील स्थितीचा आधार मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढल्यास देशातील बाजारालाही आधार मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापूस भावावर दबाव कायम
देशातील बाजारात कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. सध्या कापूस आवक २५ हजार गाठींच्या दरम्यान आहे. सध्याची आवक सरासरीपेक्षा ६ ते ७ पटींनी अधिक आहे. त्यामुळे कापूस भावावर दबाव कायम आहे. सध्या कापसाचे भाव प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या कापूस, सूत आणि कापड निर्यात कमी होत आहे. त्याचा दबाव दरावर आहे. कापसाचे भाव पुढील काळातही स्थिर दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. Market Update
३) आल्याचे भाव तेजीतच
देशातील बाजारात सध्या आल्याचे भाव तेजीतच आहेत. मागील एक महिन्यापासून आल्याची आवक कमी झाली. तर यंदा आले उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. परिणामी आल्याचे भाव विक्रमी पातळीवर पोचले. सध्या आल्याला सरासरी ११ हजार ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळतोय. आल्याचा पुरवठा यंदा कमी असल्याने दरातील तेजी कायम राहू शकते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
४) बाजारातील कांद्याची आवक कमी
देशातील बाजारात मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा दिसत आहे. कांद्याच्या भावात मागील १५ दिवसांमध्ये १०० रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. दुसरीकडे बाजारातील कांद्याची आवक कमी झाली आहे. आवक घटल्यामुळेच दरात सुधारणा दिसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. Market Update
५) तुरीच्या दरातील तेजी कायम
देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तुरीला सध्या प्रति क्विंटल ९ हजार ते साडे दहा हजार रूपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचा पुरवठा कमी आहे. पण तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. तुरीची आयात खुली केली. स्टाॅक लिमिट लावले. व्यापारी आणि स्टाॅकीस्टवर दबावही वाढवला. पण असं करूनही तुरीच्या भावातील वाढ कमी झाली नाही. त्यामुळे इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशन म्हणजे आयपीजीएने ब्राझील आणि ऑस्ट्रेलियात तुरीचे उत्पादन घेऊन आयात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चालू हंगामात देशात मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. पुरवठ्यात यंदा १७ लाख टनांची तूट असल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले.
तुरीचा पुरवठा कमी असल्याने दरातील तेजी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीचा पुरवठा वाढवण्यासाठी आयपीजीएने पुढाकार घेतला. पण या देशांमध्ये किती तूर उत्पादन होईल आणि देशात किती आणि कोणत्या दराने तूर आयात होईल, हे आताच सांगता येत नाही. पण देशात तुरीचे भाव तेजीत असल्याशिवाय या देशांमधून तूर आयात करणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे लगेच देशातील बाजारावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. तुरीच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
source : agrowon