Cotton Market : कापूस दरात ३०० रुपयांची वाढ ! वायद्यांमध्ये सुधारणा
पुणेः देशातील बाजारात मागील चार दिवसांमध्ये कापूस दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार तसेच देशातही कापसाचे वायदे चांगलेच वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून येत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात मागील तीन दिवसांपासून कापूस दरात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने देशातील बाजाराला आधार मिळाल्याचे सांगितले जाते. देशातील बाजारात दीड महिन्यानंतर कापूस दराने ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार केला. तर दीड महिन्यानंतर वायद्यांमध्ये कापूस ५९ हजारांच्या पुढे गेला. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस वायद्यांनी तब्बल १० महिन्यानंतर ८८ सेंटचा टप्पा गाठला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. चीनमधून कापूस खरेदी वाढली. सुतालाही मागणी वाढत आहे. कापडाला उठाव वाढला. या कारणांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबरचे कापूस वायदे आज दुपापर्यंत ८८.६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. यापुर्वी २ ऑक्टोबरला ८८ सेंटपेक्षा अधिकचा भाव होता. डिसेंबरचे वायदे आज ८६.५६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. Cotton Market
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाल्याचा आधार देशातील बाजारालाही मिळाला. देशातील वायदेही दीड महिन्यानंतर ५९ हजारांच्या पुढे सरकले आहेत. देशातील कापूस वायदे आज दुपारपर्यंत ५९ हजार ५६० रुपयांवर होते. यापुर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस वायदे ५९ हजारांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांचा देशातील वायद्यांना आधार मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
देशातील बाजारात मागील चार दिवसांपासून सुताच्या दरात वाढ झाली. सुताचे भाव अनेक बाजारांमध्ये किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढले. यामुळे कापसालाही उठाव येत आहे. देशातही सणांमुळे कापडाला उठाव वाढत आहे. परिणामी सुताला मागणी आली. सुतगिरण्या जिनिंगकडून रुईचा उठाव वाढवत आहेत. यामुळेच कापसालाही आधार मिळत आहे. कापसाची मागणी पुढील काही महिने चांगली राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाल्याने देशातही वाढ झाली. प्रत्यक्ष कापसालाही उठाव मिळत असल्याने कापसाच्या भावात आधार मिळाला. यामुळे कापसाचे भाव मागील चार दिवसांमध्ये क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढले. कापसाला आज सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. ऑगस्ट महिन्यात कापसाला चांगला उठाव असतो. त्यामुळे कापसाच्या दरातील तेजी कायम दिसू शकते, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
source : agrowon