पाचट आच्छादनाचे फायदे
उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी शेतकरी उसाचे पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी होते.
उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी शेतकरी उसाचे पाचट (Sugarcane Trash) जाळून टाकतात. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी होते. ऊस पिकात रासायनिक खतांच्या असंतुलित वापर केल्यामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे.
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक सरी ठेवून कुजविल्यास पाण्याचा वापर ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा खर्चात बचत होते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून ओलावा जास्त काढण्यास मदत होते. पाचट शेतातच ठेवल्याने तणांचे व्यवस्थापन होते. पाचट आच्छादनाचे फायदे काय आहेत? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
एक हेक्टर क्षेत्रामधून सुमारे १० ते १२ टन वाळलेले पाचट मिळते. हे पाचट न जाळता ते कुजवल्यास सहा ते सात टन सेंद्रिय खत मिळते. यामुळे जमिनीची सुपीकता सातत्याने वाढते. पाचट आच्छादनाचे फायदे
पाचट तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता तीन ते चार वर्षे टिकून राहील तितकेच खोडव्याचे पीकही सातत्याने घेता येईल. यामुळे बेणे, मशागत व मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.
कोणत्याही निविष्ठावर विनाकारण खर्च न करता पाचट तंत्रज्ञानामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. पाचट शेतात ठेवल्यामुळे पाल्यातील मुख्य अन्नद्रव्य उदा. नत्र ४० ते ५० किलो, स्फुरद २० ते ३० किलो, पोटॅश ७५ ते १०० किलो तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, मंगल, तांबे, जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पाचटाचे विघटन होताना ऊस पिकास उपलब्ध होतात. त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम दिसून येतो.
जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जीवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.
दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून ते पिकास उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.